gofan article esakal
महाराष्ट्र बातम्या

गोफण | आठ महिन्यांनंतर खुर्ची कुणाची? कार्यकर्त्यांनी फोडले फटाके

दादारावांच्या शेजारीच त्यांचे काका रहात होते. आख्खा गाव घराबाहेर पडला पण काका घरातच थांबले. फक्त जागचं उठून खिडकीतून सगळं न्याहाळीत राहिले.

संतोष कानडे

दादाराव दणगटे गाढ झोपलेले व्हते. ज्या हेतूपाई त्यांनी सहा महिन्याअगुदर घरच्यांसंग उभा दावा मांडला होता, त्ये त्यांचं सपान काय पुरं व्हत नव्हतं. त्यामुळं त्यांच्या जीवाला घोर लागल्याला. त्या घोरापोटीच दादाराव झोपेत घराघर्S घोरत होते. असंबी पहाटंच्या पहाटपणाला लाजवंल अशा टायमाला उठण्याची सव असल्यामुळं रात्रीतून झोप लागायचीच की..

अशा ढराम्Sढूर झुपीत असताना अचानक त्यांची झोपमोड झाली. त्यांनी खाडकन् डोळे उघडले. त्यांचं कारण होतं फटाके. दारात धडाधड् अन् फडाफड् फटाके फुटत असताना कुणाला झोप लागंल हो.. आख्खा गाव जागा झाला व्हता. सगळ्यांना वाटलं दादा जहागीरदार झाले.. म्हणून गावकरी दादारावांच्या दारात गोळा झाले.

'मी असा झुपीत आस्ताना कुणी फटाके फोडले..!' असं म्हणत दादाराव घराबाहेर आले. सुटलेली लुंगी सावरत हातात दंडुकं घेऊन ते पोरांच्या मागं लागले. दादारावांच्या शेजारीच त्यांचे काका रहात होते. आख्खा गाव घराबाहेर पडला पण काका घरातच थांबले. फक्त जागचं उठून खिडकीतून सगळं न्याहाळीत राहिले.

दादाराव जसं बाहेर आले तसं पोरांच्या घोळक्याकडं धावले. ''कारं लै माताळलात व्हय.. फटाके फोडाया माझंच दार सापडलं तुमाला..'' असं म्हणत त्यांनी कवायतीत काठी फिरवतात तशी काठीबाजी करायला सुरुवात केली. पाण्यात काठी मारल्यावर जसं पाणी तेवढ्यापुरतं पांगतं तसंच पोरंबी तेवढ्यापुरती पांगायची पुन्हा चिटकायची. जणू कबड्डीचा खेळ लावलाय.

तेवढ्यात एक इपरित घडलं. इजल्याली एक लड अचानक पेटली.. तीबी थेट दादारावांच्या लुंगीखालीच... फाड्..फाड्SS...फाड्.S.SS.. दादाराव निस्त्या उड्या घ्यायला लागले.. त्यात लुंगी निस्टायचं भ्याव.. पुरा धिंगाणा. पोरं पोट धरुधरु हसायला लागली. तवाच कुण्यातरी आगाव पोट्ट्यानं सुतळी बॉम्ब लावला. धडाम्S आवाजाने दादाराव पुन्हा भानावर आले.

''कंच्या खुशीपायी फटके वाजवायलात रं बेण्यांनोS.. तुमाला रातन्-दिस कळती का न्हाय? का वर त्वांड करुन लाव कुणाच्याबी दारापुढं फटाके.. तिकडं जा की जरा, लावा तिकडं सुतूळी बॉम'' हे बोलताना दादारावांनी काकांच्या घराकडं इशारा केला होता. काका घरात अंधार करुन खिडकीतून सगळं बघत होते.

गर्दीतला एक त्यातल्या त्यात वयानं थोरला असल्याला कार्यकर्ता पुढं आला. म्हण्ला, ''दादारावS आमाच्यावर का कावता? तुमची जहागिरी पक्की झाल्याची खुशी झालीय आमाला.. आता आपली गरिबी हाटणार. फकस्त आठ महिने दम धरा.. आपलं काम पक्क झालं. एकच रावSS दादाSराव..'' अशी एक घोषणा त्याने शेवटी दिली.

आनंद, अधिक आश्चर्य, अधिक कुतूहल, अधिक टेन्शन; अस्ले मिक्स व्हेज भाजीसारखे भाव दादारावांच्या चेहऱ्यावर होते. ज्या क्षणाची ते आतुरतेने वाट बघत होते, तो क्षण जवळ आलाय.. हे त्यांना कळलं होतं. तसे दादाराव झटक्यात बोलले, ''खरं म्हण्तो का काय.. झालं आपलं काम? कोण बोल्लं? कधी घ्यायची शपथ? आज पहाटच्याला-''

तसा घोळक्यातला दुसरा कार्यकर्ता बोलला, ''कोण काय कोण.. स्वत्ता नाथाभाई जहागीरदार बोलले- आपुन आता आठच महिने पदावर राहणार म्हणून.. त्यामुळं पुढचा नंबर आपलाच. हाय का न्हाई मजा? ''

हे ऐकून दादावारांच्या चेहऱ्यावरचे भाव टिपण्यासारखे होते. क्वचितच उमटणारी गालावरची खळी अलगदपणे खुलली होती. दादारावांचा आनंद गगनात मावत नव्हता. आकाशातल्या टपोऱ्या चांदण्यांकडं त्यांनी एकटक बघितलं.. कृतकृत्य झाल्याचे भाव चेहऱ्यावर व्हते. कुणी पियानोवर सननन्..ची म्युझिक वाजवली असती तर लुंगीचं टोक धरुन दादारावांनी आनंदाच्या गोलगोल भिंगोऱ्या घेतल्या असत्या.

'याजसाठी केला होता अट्टहास' असे भाव घेऊन दादाराव खुशीतच घरात गेले. 'आठ महिन्यांनी त आठ महिन्यांनी.. त्यात काय ह्यवढं?' असं मनाशी बोलत पहुडत राहिले. पण त्यापूर्वी निवडणुका होत्या, हे त्यांच्या लवकर ध्यानात आलंच नव्हतं.

हा सगळा आनंदाचा सोहळा तिकडून काका बघत होते. त्यांनी निस्तं 'हूं' करुन खाडकन् खिडकी लावली. झालेल्या जागरणामुळे दादारावांना उठायला उशीर झाला होता. शेजारी काका मात्र सकाळीच उठून निघून गेले होते. त्यांनी दिल्लीत कुणाशीतरी मीटिंग फिक्स केली होती म्हणे. त्याच बैठकीत आठ महिन्यांच्या मुद्द्यावर चर्चा होणार होती.

समाप्त!

santosh.kanade@esakal.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! सततच्या पावसामुळे नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; सततचा पाऊस म्हणजे काय?, सोलापुरातील ‘या’ ३ तालुक्यातच अतिवृष्टी झाल्याची नोंद

दैव की कर्म?

आजचे राशिभविष्य - 24 ऑगस्ट 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 ऑगस्ट 2025

टेबल टेनिसमध्ये भारताला ऑलिंपिक पदकाची आशा

SCROLL FOR NEXT