Pankaja Munde
Pankaja Munde Sakal
महाराष्ट्र

दरवेळी चर्चा होते पण Pankaja Munde भाजप सोडणार तरी कधी ?

वैष्णवी कारंजकर

पंकजा मुंडे नाराज आहेत, पंकजा मुंडे भाजपा सोडणार का, देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यात काहीतरी बिनसलंय...महाराष्ट्राला या चर्चा नव्या नाहीत. गेल्या जवळपास सात ते आठ वर्षांपासून पंकजा मुंडेंविषयीच्या या चर्चा सातत्याने होत आहेत. अधेमधे याला हवाही दिली जाते आणि शमत चाललेली आग पुन्हा एकदा पेटत जाते. पण या चर्चा केवळ पोकळ नाहीयेत. याला काही ठोस कारणंही सांगता येतील. 'राज्याच्या जनतेच्या मनातली मुख्यमंत्री' असं म्हणवणाऱ्या पंकजांच्या मनात नाराजीची ठिणगी कुठे पडली, राज्याच्या राजकारणासाठी त्यांनी नाराजी इतकी का महत्त्वाची आहे, या नाराजीचे परिणाम भाजपा आणि राज्याच्या राजकारणाला कितपत तीव्रतेने भोगावे लागतील, या सगळ्याचा आढावा या लेखातून घेऊ.

भाजपा नेत्या आणि पक्षाच्या राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे वारंवार आपल्या मनातली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवत असतात. नुकतंच चर्चेत आलेलं त्यांचं विधान म्हणजे 'माझं राजकीय करियर मोदीही संपवू शकत नाहीत'. या विधानानंतर पंकजांनी आता भाजपाला अगदीच शिंगावर घेतलं आहे. पंकजांची ही नाराजी आजची नाहीय. थोडं मागं गेलं तर आपल्याला लक्षात येईल. देशात भाजपाचं सरकार आलं आणि तिथूनच या नाराजी नाट्याचीही सुरुवात झाली.

'जनतेच्या मनातली मुख्यमंत्री' म्हणत पदाची इच्छा प्रकट केली!

२०१४ साली देशात भाजपाचं आणि राज्यात भाजपा शिवसेना युतीचं सरकार आलं. या निवडणुकीचे निकाल जाहीर होत असतानाच पंकजा मुंडे यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी आपणच मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार असल्याची घोषणा केली. आपणच मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार आहोत आणि ही जबाबदारी घेण्यास आपण तयार आहोत, असं पंकजा म्हणाल्या होत्या. कोणत्या आधारावर? तर त्यांचं म्हणणं होतं की, भाजपातले इतर सगळे नेते एका ठराविक शहरी प्रदेशातच प्रभावशाली आहेत, पण आपण लोकनेत्या आहोत. त्यावेळच्या इतर उमेदवारांनाही अनुभव नाही, असा युक्तिवाद करत आपल्याकडे असलेल्या कमी अनुभवाचा मुद्दाही त्यांनी खोडून काढला.

मुख्यमंत्री पदावर दावा सांगण्याचा आणखी एक आधार म्हणजे वडिलांचा राजकीय वारसा. वडील गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्या सहानुभुतीच्या लाटेचा पंकजा आणि प्रीतम या दोन्ही मुलींना मोठा फायदा झाला. गोपीनाथ मुंडे लोकनेते होते. ते जिवंत असते, तर ते नक्कीच मुख्यमंत्री पदाचे उमेदवार होते आणि भाजपाकडून कदाचित ते मुख्यमंत्री झाले असते. पण त्याआधीच त्यांचं अपघाती निधन झालं. आता वडील तर नाहीत मात्र त्यांच्याऐवजी आपल्याला मुख्यमंत्री होण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षा पंकजा मुंडे यांना होती. त्यावेळचे मुख्यमंत्री पदाचे इतर उमेदवार अगदीच स्थानिक पातळीवर कार्यरत होते. देवेंद्र फडणवीसांचा करिष्मा त्यावेळी महाराष्ट्राला अगदीच अपरिचित होता. त्यामुळे मुख्यमंत्री पद आपल्याकडेच यावं, अशी त्यांची इच्छा आणि अपेक्षा होती. पण तसं झालं नाही. त्यामुळे तेव्हापासून पंकजा वारंवार आपली नाराजी प्रकट करून दाखवत असतात.

दरम्यान, मुख्यमंत्री पद तर मिळालं नाही, पण भाजपाने पंकजांना भाजपा - शिवसेना सरकारमध्ये मंत्रीपद मात्र दिलं. पण त्यानंतर लागोपाठ भाजपाकडून त्यांचा अपेक्षाभंग होतच होता. राज्यसभेसाठी उमेदवारी न देणं, विधानपरिषदेतही डावललं जाणं, केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना पर्याय म्हणून डॉ. भागवत कराडांना समोर करणं, या सगळ्यामुळे पंकजा नाराज असणं साहजिक होतं आणि त्यांनी ते वेळोवेळी बोलूनही दाखवलं. पण एवढं स्पष्ट सांगूनही भाजपाने त्यांच्यावर कोणतीच कारवाई का केली नाही?याचं कारण म्हणजे गोपीनाथ मुंडे. मुंडेंच्या मृत्यूच्या जवळपास १० वर्षांनंतरही अजूनही त्यांच्या नावे असलेली सहानुभुतीची लाट पंकजा यांच्या पाठीशी कायम आहे. बीडची जनता आजही गोपीनाथ मुंडेंना सर्वोच्च स्थानी मानते. आता भाजपाने जर पंकजा मुंडेंवर कारवाई केली, तर मात्र त्यांच्या हातातून बीड निसटण्याचा मोठा धोका आहे. शिवाय, महाराष्ट्रातल्या इतर भागांमध्येही यामुळे नाराजी पसरण्याची शक्यता आहे.

स्थानिक समीकरणं काय सांगतात?

आता पंकजा मुंडे यांच्या राजकीय करियरला काहीही धोका निर्माण झाला, तरी धनंजय मुंडे त्याठिकाणी नेम धरुनच आहेत. परळी मतदारसंघातून लढलेल्या पंकजा मुंडेंना आधीच त्यांची चुलत भाऊ असलेल्या धनंजय मुंडेंनी पराभूत केलं आहे. आता जिल्ह्यामध्ये प्रत्येक सामना धनंजय विरुद्ध पंकजा असाच होतो. भाजपामधून राष्ट्रवादीत गेलेल्या धनंजय मुंडेंचाही करिष्मा काही कमी नाही. ठाकरे सरकारच्या काळात धनंजय मुंडे मंत्रीही होते. नुकतेच मंत्रिपद गमावलेले धनंजय मुंडे आता स्थानिक राजकारणात अधिक सक्रिय होणार आणि त्यामुळे पंकजा मुंडेंना आणि पर्यायाने भाजपाला अस्तित्वाचा सामना करण्यासाठी अधिक कडवी झुंज द्यावी लागणार यामध्ये काही शंका नाही. त्यामुळे पंकजा मुंडेंवर कोणतीही कारवाई करणं किंवा त्यांना दुखावणं भाजपाला चांगलंच महागात पडणार आहे. त्यामुळे भाजपा सावध पवित्र्यात आहे. थेट मोदींसारख्या सर्वोच्च नेत्याविषयी घरचा आहेर मिळूनही भाजपा शांत आहे. हे वक्तव्य फारसं कोणीच वाढू दिलं नाही.

पंकजा मुंडे भाजपा सोडून गेल्या तर?

भाजपावरच्या अशाच नाराजीमुळे एकेकाळी गोपीनाथ मुंडेही नाराज होते, ते काँग्रेसच्या वाटेवर जाणार, अशा चर्चाही चांगल्याच रंगल्या होत्या यामागे नितीन गडकरींशी त्यांचे वारंवार उडणारे खटके, विलासराव देशमुखांसोबतची मुंडेंची मैत्री, तसंच प्रमोद महाजनांच्या निधनानंतर मुंडेंना वारंवार डावललं जाणं अशी अनेक कारणं होती. आता गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये जाणार यावर जवळपास शिक्कामोर्तब झालं होतं. मात्र मनमोहन सिंग यांनी विरोध केला आणि मुंडेंचं भाजपा सोडणं टळलं. आता त्यांच्याच वाटेवर चालणाऱ्या पंकजाही पक्ष सोडण्याची शक्यता अगदीच कमी आहे. पहिली गोष्ट पंकजा यांचं 'पंकजा गोपीनाथ मुंडे' या नावाव्यतिरिक्त कोणतीच विशेष ठळक ओळख जनतेच्या मनामध्ये नाही. मुंडेंच्या निधनानंतरच्या सहानुभुतीच्या लाटेवर स्वार होऊन त्या राजकारणात आल्या खऱ्या. पण आता त्याच लाटेला ओहोटी लागल्याचं चित्र आहे. मात्र तरीही, गटांगळ्या खाऊनही हीच लाट आपल्याला तरुन नेणार याची पूर्ण जाणीव पंकजा मुंडेंना आहे. शिवाय, आपल्या मंत्रिपदाच्या काळामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या, घोटाळ्यांच्या आरोपांमुळे त्यांची प्रतिमा चांगलीच मलिन झाली आहे. त्यामुळे ती सुधारण्यासाठी पंकजांनी प्राधान्य देणं गरजेचं आहे. अशामध्ये पक्ष सोडल्यास त्यांच्या प्रतिमेवर आणखी एक डाग लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंकजा मुंडे भाजपा सोडण्याच्या शक्यता अगदीच नगण्य आहेत. पण भविष्यात काय होईल, त्यांचं मन बदलेल की नाही, नाराजी उच्चांक गाठेल की नाही, याबद्दल तरी आपण ठामपणे आत्ताच काही सांगू शकत नाही. मात्र तोपर्यंत पंकजा वारंवार जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त करतच राहतील आणि भाजपा त्याकडे दुर्लक्ष करतच राहील, हे वर्तुळ तुटणं अवघड आहे, एवढं मात्र नक्की.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export: कांदा उत्पादकांना मोठा दिलासा! केंद्र सरकारची कांदा निर्यातीला परवानगी

IPL 2024 DC vs MI Live Score : 'राजधानी'त भिडणार दिल्ली-मुंबई, कोण जिंकणार?

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींचा पुन्हा अपघात! हेलिकॉप्टरमध्ये जाताना पाय निसटला अन्..; पाहा व्हिडिओ

'श..श...शशांक...', KKR विरुद्ध विजयानंतर पंजाबच्या पठ्ठ्यानं शाहरुखच्या स्टाईलमध्ये ईडन गार्डन्सचे मानले आभार, पाहा Video

Bank Crisis: मोठ्या आर्थिक संकटाची सुरुवात? अमेरिकेत आणखी एक बँक दिवाळखोर; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT