करमाळा : करमाळा पंचायत समितीवर माजी आमदार नारायण पाटील यांनी आपले वर्चस्व कायम ठेवण्यात यश मिळविले आहे. नारायण पाटील यांची पंचायत समितीतील सत्ता घालवण्यासाठी आमदार संजय शिंदे गट, माजी आमदार जयवंतराव जगताप गट व बागल गट यांनी जोरदार प्रयत्न केले. मात्र, यशस्वी खेळीमुळे बागल गटाच्या दोनपैकी एका सदस्याने थेट नारायण पाटील गटात सामील होण्याचा निर्णय घेतला व पाटील यांची पंचायत समितीतील सत्ता कायम राहिली. त्यात सभापती म्हणून गहिनीनाथ ननवरे तर उपसभापती म्हणून दत्ता सरडे यांची बिनविरोध निवड झाली.
यामुळे झाली पाटील गटाची सदस संख्या सहा
2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत येथील पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकविण्यात यश आले. त्या वेळी त्यांनी 25 वर्षांची बागल गटाची सत्ता घालवली. त्या वेळी त्यांना जगताप गटाचा पाठिंबा होता. मात्र, दोन वर्षांत झालेली राजकीय उलथापालथ पाहता पाटील यांच्यासमोर सत्ता कायम राखण्याचे आव्हान होते. त्यात ते यशस्वी झाले आहेत. आमदार शिंदे गट, जगताप गट व बागल गटाचा एकही पंचायत समिती सदस्य या निवड प्रक्रियेच्या वेळी उपस्थित नव्हता. शिंदे व जगताप गटाकडून ऍड. राहुल सावंत हे सभापतिपदासाठी इच्छुक होते; मात्र पुरेसे संख्याबळ जुळत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी उमेदवारी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला. पाटील गटाकडे पाच, बागल गटाकडे दोन, शिंदे गटाकडे दोन तर जगताप गटाकडे एक पंचायत समिती सदस्य होता. बागल गटाच्या रायगाव गणातील पंचायत समिती सदस्या स्वाती मुळे यांनी पाटील गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पाटील गटाची सदस्यसंख्या सहा झाली.
हेही वाचा : भारीच... जुळे सोलापूरकरांनी मानले "सकाळ'चे आभार
विरोधकांनी केला शेवटपर्यंत पाटील गटाशी संपर्क
सभापतिपदासाठी गहिनीनाथ ननवरे, दत्ता सरडे व नारायण पाटील यांचे पुतणे डबल उपमहाराष्ट्र केसरी अतुल पाटील हे इच्छुक होते. या तिघांपैकी कोण नाराज होतोय का, यावर शिंदे-जगताप व बागल गट लक्ष ठेवून होते. काहीही करून नारायण पाटील यांचा सभापती होऊ द्यायचा नाही, असा चंग विरोधकांनी बांधला होता. विरोधकांनी शेवटपर्यंत पाटील गटातील सदस्यांशी संपर्क केला. पाटील गटाकडील पाचही सदस्यांना "तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला सभापती करतो' म्हणून फोन केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 15 मिनिटे वेळ असतानाही दिग्विजय बागल, ऍड. सावंत, दत्ता जाधव हे पाटील गटातील सदस्यांना फोन करत होते; मात्र त्यांच्या या प्रयत्नाला यश आले नाही.
ऍड. सावंत यांची संधी हुकली
विधानसभा निवडणुकीच्या वेळी ऍड. सावंत यांना नारायण पाटील यांनी सभापती पदाची ऑफर दिली होती. मात्र, सावंत यांनी पाटील यांच्याऐवजी आमदार शिंदे यांना पाठिंबा दिला. जर सावंत यांनी पाटील यांना पाठिंबा दिला असता तर सभापती पदाची सावंत यांना संधी मिळाली असती, अशी चर्चा उपस्थितांनी केली. दुसरीकडे साडे गणातून शिवसेनेकडून विजयी झालेल्या जया जाधव या शिंदे गटात गेल्याने त्यांचीही संधी हुकली आहे.
...तर आली असती चिठ्ठीवर निवडीची वेळ
एकूण 10 सदस्य असलेल्या करमाळा पंचायत समितीत शिंदे, जगताप व बागल गटाने एकत्र येत पाच सदस्य जुळवण्याचा प्रयत्न केला. मात्र बागल गटाच्या स्वाती मुळे फुटल्याने त्यांचा मेळ बसला नाही. जर शिंदे, जगताप व बागल गटाचे पाच सदस्य एकत्र आले असते तर पाच-पाच अशी समान संख्या होऊन सभापती व उपसभापती निवड चिठ्ठीवर घेण्याची वेळ आली असती.
हेही वाचा : सोलापुरात शिवसैनिकाने केले स्वखर्चाने शिवभोजन
मी गेली तीन वर्षे उपसभापतिपद भूषविले आहे. नारायण आबा पाटील यांच्या आशीर्वादाने मला सभापती पदाची संधी मिळाली आहे. माझ्यासाठी माजी आमदार नारायण पाटील हेच पक्ष आहेत. करमाळा पंचायत समितीच्या माध्यमातून गोरगरीब, गरजू लोकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
- गहिनीनाथ ननवरे, सभापती, पंचायत समिती, करमाळा
माजी आमदार नारायणआबा यांच्यामुळे उपसभापती पदापर्यंत माझा राजकीय प्रवास झाला आहे. माझ्यासाठीच आबांचा निर्णय अंतिम आहे. भविष्यात पंचायत समितीत नारायण आबांच्या आदेशाने काम करणार आहे.
- दत्ता सरडे, उपसभापती, पंचायत समिती, करमाळा
महाराष्ट्र
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.