Surat's First Loot : शिवाजी महाराजांनी जानेवारी 1664 मध्ये मोगल साम्राज्यातील अतिश्रीमंत शहर सुरतेवर हल्ला करून ते शहर लुटून नेले. सूरत हे त्या काळात मुघलांची आर्थिक राजवट चालवण्याच केंद्र स्थान होतं. अनेक परदेशी व्यवहार हे तेव्हा सूरत वरून व्हायचे, त्यामुळे सुरतेच्या बचावासाठी मोगलांनी 5,000 सैनिकांची तरतूद केलेली कागदोपत्री केली गेलेली होती. पण त्या वेळी तिथे पूर्ण 1000 सैनिक सुद्धा नव्हते.
बहिर्जी नाईक आणि त्यांच्या साथीदारांसाठी ही माहिती काढणं कठीण नव्हतं. त्यांनी ही माहिती काढली आणि महाराजांना दिली, महाराजांनी ठरवलं; तीन वर्ष महाराष्ट्रात तळ ठोकून बसलेल्या शाहिस्तेखानाला अद्दल घडवण्याची आणि स्वराज्याची संपत्ती सुधारण्याची हीच एक संधी आहे.
तेव्हा सुरतेच्या किल्ल्याचा किल्लेदार इनायतखान होता; महाराजांनी राजगडावरून खानदेशातून सूरतला जाण्याचा निर्णय घेतला जेणेकरून शाहिस्तेखानाला ते कळणार नाही. मराठे गणदेवीस आले आहेत हे कळताच इनायतखान घाबरून गेला व त्याने सामोरे येऊन लढाई करण्याऐवजी सुरतेच्या किल्ल्यात पळ काढला.
5 जानेवारीला दुपारी त्याच्या काही तुकड्या मराठ्यांसमोर उभ्या राहिल्या. 20 दिवस घोडदौड करीत आलेले असूनही मराठ्यांनी त्यांचा धुव्वा उडवला व उधन्यास रात्रीकरता तळ न ठोकता रातोरात सुरत गाठले. किल्ल्यात लपून बसलेल्या इनायतखानाकडून कोणताच प्रतिकार झाला नाही, मराठे शहरात घुसले व त्यांनी जागोजागी चौक्या बसविल्या.
त्याचबरोबर त्यांनी सुरतेच्या बंदरावर हल्ला केला व तेथील धक्क्याला आग लावून टाकली. मोगल आरमाराने समुद्रातून हल्ला करायला नको म्हणून ही चाल होती. जरी बंदर नष्ट केले तरी मराठ्यांनी कोणत्याही युरोपीय वकिलाती, किल्ले किंवा आरमारांना धक्का लावला नाही.
त्या वारुळात हात खुपसून लढाई जुंपली तर मराठ्यांचा मुख्य हेतू, जो भराभर सुरत लुटून नेण्याचा होता, तो बाजूलाच राहू नये म्हणूनची ही धूर्त चाल होती. मराठे असे अचानक येऊन धडकलेले पाहून युरोपीय सरदार दबकलेले होते व त्यांनीही मराठ्यांची कुरापत काढली नाही.
शहराबाहेरून तसेच आतूनदेखील होणाऱ्या हल्ल्यांविरुद्ध बंदोबस्त करतानाच मराठ्यांनी शहराची लूट सुरू केली. मोगल ठाणेदार व महसूलदप्तरांचे खजिने पुरते रिकामे केले गेले. दरम्यान पोर्तुगीजांकडे स्वतःचा बचाव किंवा हल्ला करण्यासाठी पुरेसी शिबंदी नाही हे लक्षात येताच त्यांनी पोर्तुगीजांकडूनही खजिना मिळवला. त्याचबरोबर तीन दिवस सतत मराठा सैनिकांनी शहरातील सावकारांच्या वाड्यांतून अमाप संपत्ती गोळा केली.
शक्य तितक्या कमी वेळात शक्य तितकी संपत्ती गोळा करून मोगलांच्या इतर ठाण्यांवरून कुमक येण्याआधी सुरतेतून पसार होणे मराठ्यांना अत्यावश्यक होते. अखेर गोळा केलेला मुबलक खजिना घेउन 10 जानेवारीला मराठ्यांनी सुरतेतून काढता पाय घेतला आणि औरंगजेबाचे अप्रत्यक्षरित्या वस्त्रहरण केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.