Lookback 2022
Lookback 2022 esakal
मनोरंजन

Lookback 2022: ...म्हणून टॉलीवूड ठरलं 'बाप' अन् बॉलीवूड झालं 'फ्लॉप'! का मिळाली टॉलीवूडला प्रेक्षकांची दाद

सकाळ डिजिटल टीम

- प्रा. संदीप गिऱ्हे

भारतीय फिल्म इंडस्ट्री संख्यात्मक निर्मितीच्या निकषांवर जवळपास जगातील सर्वात मोठी इंडस्ट्री आहे, त्यात बॉलीवूड, टॉलीवूड आणि  इतर सर्व आले. भारतात दरवर्षी १२०० पेक्षा जास्त चित्रपट प्रदर्शित होतात. कोरोनाकाळाचा अपवाद सोडला तर ही संख्या वाढतच चालली आहे. आज भारतीय फिल्म इंडस्ट्रीची साधारण दहा हजार करोड रुपयांची वार्षिक उलाढाल आहे. या एकंदरीत वर्णनाच्या तपशिलात गेले तर खूप विरोधाभास आहे असं लक्षात येईल. मुळात बॉलीवूड आणि  टॉलीवूड या दोन स्वंतंत्र उद्योग व्यवस्था आहेत.

भारतात जवळपास दहा हजार स्क्रीन्स म्हणजे चित्रपट गृहे आहेत. यात मल्टीप्लेक्स आणि एक पडदा म्हणजे सिंगल स्क्रीन हे सर्व मिळून ही संख्या आहे. यातील सात हजारच्या आसपास स्क्रीन्स दक्षिन भारतात तर उरलेल्या तीन हजार इतर भारतात आहेत. म्हणजेच हिंदी आणि इतर भाषीय चित्रपटापेक्षा दक्षिण भारतीय भाषांसाठी जास्त प्रेक्षकवर्ग आहे. हेच प्रमाण चित्रपट निर्मिती बाबतीतही आहे. हिंदी भाषेत दरवर्षी २०० ते २५० चित्रपट प्रदर्शित होतात. तर तेलगु, तमिळ आणि कन्नड भाषेत प्रत्येकी दरवर्षी २०० ते २५० आणि मल्ल्यालम भाषेमध्ये १५० ते २०० चित्रपट प्रदर्शित होतात. जानेवारी २०२२ ते नोव्हेंबर २०२२ पर्यंत भारतात नऊ हजार कोटींची कमीई सर्व चित्रपटांनी मिळून केली. यात केजीएफ २, आरआरआर आणि कांतारा या तीन चित्रपटांचाच वाटा जवळपास तीन हजार करोड रुपयांचा आहे.

Also Read: सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

हिंदीमध्ये सर्वात जास्त बॉक्स ऑफिसवर कमाई करणारा चित्रपट या चित्रपटांच्या जवळपासही पोहचू शकलेला नाही. त्यांच्यातील आकड्यांची तफावत मोठी आहे. संख्यात्मक आणि आर्थिक निकषांच्या पलीकडे जाऊन गुणवत्तेच्या आधारे तुलना केली तर हा विरोधाभास आणखी तीव्र होताना दिसतो. हिंदी मधील ब्रम्हास्त्र आणि तेलगु मधील आरआरआर या दोन्ही चित्रपटातील दृशात्मक्ता मोठ्या पडद्यावर अचंभित करणारी आहे. ब्रम्हास्त्रचे कथानक पौराणिक आणि आरआरआरचे ऐतिहासिक. ब्रम्हास्त्र हा व्हिजुअल इफेक्ट्सचा एक सर्वसाधारण पातळीपर्यंतचा अनुभव आहे, तर आरआरआर हा त्यातील साहसी दृशात्मक्ता आणि व्हिजुअल इफेक्ट्सचा स्तिमित करणारा अनुभव आहे. हाच अनुभव केजीएफ २, कांतारा, पीएस १ अशा अनेक दक्षिणात्य चित्रपटाच्या बाबतीतही सारखाच आहे.

कांतारा चित्रपटातील रंग, वेशभूषा आणि संगीत याची तुलना कुठल्याही हिंदी चित्रपटाशी होऊ शकत नाही. हिंदी चित्रपट प्रसिद्धी आणि जाहिरातीभोवती केंद्रित झालेला आहे. तर दक्षिणात्य चित्रपट प्रेक्षकांवर पकड मिळवतो आहे. कथानकाच्या बाबतीतही हीच परिस्थिती आहे. हिंदी चित्रपटांनी आपले कथाविश्व फक्त शहरी आणि मल्टीप्लेक्समधील प्रक्षाकांभोवती केंद्रित केलेले दिसते. एक पडदा म्हणजे सिंगल स्क्रीन आणि पर्यायाने निमशहरी आणि ग्रामीण भागातील प्रेक्षक हिंदी चित्रपटांनी आपल्या परिघाबाहेर नेऊन ठेवलेला आहे. याउलट दक्षिण भारतीय भाषेच्या चित्रपटांचे कथानक निमशहरी आणि ग्रामीण सांस्कृतिक परिघातून आलेले दिसतात. त्यांचे चित्रणही अधिक वैशिष्ट्यपूर्ण आणि विविधांगी पद्धतीने केलेले दिसते. हिंदी चित्रपटांच्या त्याच त्याच पठडीतील चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवलेली दिसते.

इतके दिवस स्टार चेहऱ्यांच्या बळावर हिंदी चित्रपटांचा व्यवसाय होत राहिला, परंतु ओटीटी मुळे चोखंदळ झालेला प्रेक्षक आता फक्त स्टार चेहऱ्यांसाठी चित्रपट बघायला तयार नाही. त्याला व्यामिश्र कथानक हवे आहे. हीच बाब दक्षिणात्य चित्रपटाच्या बाबतीत प्रभासच्या राधेश्याम सारख्या चित्रपटांनाही लागू होते. कुठलाही प्रेक्षक आता अधिक सजगपणे कुठला चित्रपट पहायचा हे निवडू लागला आहे. दक्षिण भारतीय भाषेच्या निर्माता - दिग्दर्शकांनी ही बाब सहज लक्षात घेतली. हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील मोठ्या निर्मिती संस्था ही वस्तुस्थिती लक्षात घायला तयार नाही. ही मोठी बॅनर स्वतःच्याच स्टारडम आणि नेपोटीझमच्या जाळ्यात अडकलेली आहेत.

दक्षिणात्य चित्रपटांच्या बाबतीतही मोठी बॅनर, स्टारडम आणि नेपोटीझम हा भाग आहेच, मात्र त्याचा कथानक आणि त्याच्या चित्रणाच्या गुणवत्तेवर परिणाम होताना दिसत नाही. कथानकातील वैविध्य, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वैशिष्ट्यपूर्ण आणि कलात्मक वापर, प्रायोगिक अविष्कार या बाबतीत ते हिंदी चित्रपटांपेक्षा सरसच ठरतात. यामुळेच यशस्वी दक्षिणात्य चित्रपटांचे रिमेक म्हणजे नक्कल करण्यची वेळ हिंदी चित्रपट सृष्टीवर आलेली आहे.

मागील काही वर्षांपासून हिंदी चित्रपटांमध्ये प्रोपगांडा आणि प्रचारकी चित्रपटांचे प्रमाण खूप वाढले आहे. ऐतिहासिक चित्रपटांची आणि विशिष्ट राजकीय विचारांचा प्रचार-प्रसार करणाऱ्या चित्रपटांची रीघ लागलेली दिसत आहे. अक्षय कुमार हा या चळवळीचा म्होरक्या म्हणता येईल. तो एकटाच मात्र नाही. तर एक मोठी फळी दिसेल एवढी संख्या नक्कीच सापडेल. हिंदी चित्रपटाचा प्रेक्षकवर्ग हळूहळू यापासून दूर जाताना दिसत आहे. याबाबतीत हिंदी चित्रपट सृष्टी काही विचारमंथन करतांना दिसत नाही. या प्रचारकी चित्रपटांना विरोध करणारा व पर्यायी निर्मिती करणारा एक वर्ग आहे. मात्र तो फार सशक्त असल्याचे दिसत नाही. हा वर्ग अडगळीत पडल्यासारखा आपली चित्रपट निर्मिती सुरु ठेवतो आहे. मात्र हा आवाज फारच क्षीण होत जात असलेला दिसतोय. कश्मीर फाईल्स, झुंड, बायकॉट लालसिंग चढ्ढा, कंगना आणि अनुराग कश्यपचे ट्विटर युद्ध अशा पद्धतीने हा अंतर्विरोध समोर येतो, तोही तेवढ्यापुरताच.

दक्षिण भारतीय भाषेच्या चित्रपटांमध्येही प्रोपगंडा आणि प्रचारकी चित्रपटांचे प्रमाण आहेच. मात्र पर्यायी तसेच विविधांगी विषयाच्या कथानकाच्या चित्रपटांची संख्याही जास्त आहे. यामुळे हिंदी चित्रपट सृष्टी मागे पडत जाताना तर दक्षिणात्य चित्रपट सृष्टी वेगाने देशभर आपला प्रेक्षकवर्ग तयार करतांना दिसत आहे. हा हिंदी चित्रपट सृष्टी आणि दक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील फरक किंवा विरोधाभास एवढ्यावरच थांबणारा नाही. या विषयाला इतर अनेक बाजूही आहेत. मात्र सध्या तरी याच बाबतीत हिंदी विरुद्ध दक्षिणात्य चित्रपट हा भाग असा लक्षात घेता येईल.

- प्रा. संदीप गिऱ्हे ( या लेखाचे लेखक हे न्यु आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज ऑफ अहमदनगर महाविद्यालयातील संज्ञापन अभ्यास विभागाचे प्रमुख आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

Latest Marathi News Update : झारखंडमध्ये ईडीचे छापे, मंत्र्याच्या कर्मचाऱ्याकडून करोडोंची रोकड जप्त

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT