Dahaad Review
Dahaad Review Esakal
मनोरंजन

Dahaad Review: पुरुषसत्ताक जातिव्यवस्थेने केलेले खून! ओटीटीवर सोनाक्षी सिन्हा आणि विजय वर्माची 'दहाड'

सकाळ डिजिटल टीम

युवराज माने

ओटीटीच्या जगतात गुन्हेगारीविषयक कथांचे कायमच वर्चस्व राहिले आहे. अशा प्रकारच्या कथा पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक असतात; परंतु त्या मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत. यातील एकसूरीपणा टाळण्यासाठी या कथांचे सादरीकरण महत्त्वाचे ठरते.

कथेतील व्यक्तिरेखा, त्यांचा प्रवास, त्यांना जोडून ठेवणारी पटकथा याकडे कटाक्षाने लक्ष ठेवावे लागते. जेव्हा रीमा कागती आणि झोया अख्तरसारख्या कथाकार एखादी कथा सादर करतात, तेव्हा त्यात नक्कीच काहीतरी वेगळे बघायला मिळणार, अशी अपेक्षा ठेवता येते. ही अपेक्षापूर्ती करणारी वेबसीरिज म्हणजे ‘दहाड’ नुकतीच अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाली आहे.

राजस्थानातील मंडावा पोलिस ठाण्यात काम करणारी अंजली भाटी (सोनाक्षी सिन्हा) एका बेपत्ता मुलीच्या शोधात असताना तिला अशाच आणखी काही मुली बेपत्ता झाल्याचे समजते.

या मुलींचा मागोवा काढताना बेपत्ता मुलींची संख्या २७ पर्यंत जाऊन पोहोचते. या सगळ्या मुली प्रेमविवाह करण्यासाठी घरातून पळून गेलेल्या असतात. त्यामुळे यांचा ठावठिकाणा शोधण्यात त्यांच्या घरच्यांनाही रस नसतो.

‘आमच्यासाठी आमची मुलगी मेली’ असाच त्यांचा सूर असतो. विशेष म्हणजे या सर्व मुली खरंच मृत्यू पावलेल्या असतात. अंजलीला हे एका ‘सीरियल किलर’चे काम असल्याचे लक्षात येते.

पण वरिष्ठ अधिकारी देवी सिंग (गुलशन देवैय्या) आणि सहकारी कैलाश परघी (सोहम शाह) तिला ठोस पुरावे असल्याशिवाय असा निष्कर्ष काढता येणार नाही, असे बजावतात.

या दरम्यान शिक्षक आनंद स्वर्णकार (विजय वर्मा) त्यांच्या तपासाच्या परिघात येतो. यानंतर घडणारी कथा सीरिजमध्ये पाहणे श्रेयस्कर.

रीमा कागती आणि झोया अख्तर यांनी सीरिज लिहिली आहे. रीमा कागतीने रुचिका ओबेरॉयबरोबर सीरिजचे दिग्दर्शनही केले आहे. सीरिजची खासियत म्हणजे हे सगळे खून कोण करते याचा उलगडा लवकर होत नाही.

या सर्व मुली आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आहेत. हा निव्वळ योगायोग नसून, एका नियोजित कटाचा भाग आहे. खून्याला हे चांगले ठाऊक आहे की, या मुलींच्या नसण्याने कोणाला फरक पडणार नाही.

त्याचे हे विचार मुलींच्या घरचेच खरे करून दाखवतात. अगदी पोलिसांनाही या मुलींचा तपास करण्यात अजिबात स्वारस्य नाही.

नाईलाजाने त्यांना हे करावे लागते आणि एकीचा तपास दुसऱ्या मुलीपर्यंत येऊन पोहोचतो. खुद्द तपास अधिकारी असणाऱ्या अंजली भाटीला आपल्या जातीमुळे कित्येकांची बोलणी आणि असहनीय वागणूक सहन करावी लागते.

जातीचा प्रश्न आणि त्यात एक मुलगी असल्याने मिळणारे कित्येक टोमणे झेलत अंजली पुढे जात राहते. सोनाक्षी सिन्हा प्रामाणिकपणे अंजली भाटी उभी करते.

देवी सिंगच्या भूमिकेतील गुलशन देवैय्या एका इमानदार पोलिस अधिकाऱ्यापासून एक सजग बाप असण्याचा प्रवास सहजपणे उलगडतो. सोहम शाहची व्यक्तिरेखा मात्र प्रभावीपणे उभी राहत नाही.

आनंदच्या भूमिकेतील विजय वर्मा व्यक्तिरेखेचे तमाम पैलू निष्णातपणे समोर मांडतो. कास्टिंग चांगले असल्याने इतर अभिनेतेही लक्षात राहतात. सीरिजचे संवाद परिणामकारक असल्याने व्यक्तिरेखा प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते.

याचे श्रेय संवादलेखक सुमित अरोरा यांना द्यायला हवे. काही ठिकाणी सीरिज रेंगाळते; पण प्रभावी संवादांमुळे प्रेक्षक कथेत गुंतून राहतात.

सीरिजचा शेवट मात्र गुंडाळल्यासारखा वाटतो. एखादी व्यक्ती सलग इतके खून करत असेल, तर त्या व्यक्तीची मानसिकता जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. यात मात्र सीरिज कमी पडते.

हल्ली उगाच समलिंगी संबंध दाखवणारी आणि मोडकळीस आलेली लग्न दाखवणारी कथानके ओटीटीवर दिसून येतात. विनाकारण वादग्रस्त विषयात अडकून न राहता दहाड सजगपणे आपले म्हणणे मांडते. जाती-धर्मातील विषमता आणि स्त्री-पुरुष यांच्यातील वर्चस्ववाद यावर ही सीरिज परखड भाष्य करते.

दिग्दर्शक: रीमा कागती आणि रुचिका ओबेरॉय

कलाकार: सोनाक्षी सिन्हा, विजय वर्मा, गुलशन देवैया, सोहम शाह

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूला दुसरा धक्का! अर्धशतकानंतर डू प्लेसिस आऊट, पण विकेटमुळे झाला ड्रामा

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT