लातूर : आमच्या येथे बालकामगार काम करत नाहीत, अशा पाट्या अनेक ठिकाणी पहायला मिळतात. पण कधी-कधी आपल्या डोळ्यादेखत लहान मुले काम करताना दिसतात. हे चित्र बदलण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील सर्वच हॉटेल, धाबे, किराणा दूकान चालकांकडून ‘आमच्या येथे बालकामगार नाहीत’ असे हमीपत्र लिहून घेतले जाणार आहे.
महाराष्ट्र बालकामगार मुक्त व्हावा म्हणून सरकारच्या वतीने ७ नोव्हेबर ते ७ डिसेंबर या कालावधीत राज्यभरात बालकामगार जनजागृती अभियान राबविले जात आहे. या अभियानात स्वाक्षरी मोहिम, जनजागृती फेरी, निबंध स्पर्धा, व्यापाऱ्यांसोबत बैठका, भित्तीपत्रके लावणे अशा विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. या बरोबरच हॉटेल, धाबे, किराणा दुकानांच्या चालकांकडून आमच्याकडे बालकामगार नाही, मुलांनी कामावर ठेवणार नाही असे हमीपत्र लिहून घेतले जाणार आहे. शिवाय, बालकामगार आढळून आल्यानंतर होणाऱ्या दंडाची आणि शिक्षेची माहितीही त्यांच्यापर्यंत पोचवली जाणार आहे. या उपक्रमाला लातूर जिल्ह्यात लवकरच सुरवात होणार आहे.
यासदंर्भात सहाय्यक कामगार आयुक्त एस. जी. मुंडे म्हणाले, सध्या अनेकजन बालकामगार ठेवणे टाळत आहेत. काही प्रमाणात जनजागृती झाली आहे. पण महाराष्ट्र बालकामगार मुक्त झाला पाहीजे. त्यासाठी हमीपत्र लिहून घेण्याची मोहिम लवकरच सुरू होणार आहे. त्यानंतरही बालकामगार आढळून आला तर २० ते ५० हजार रुपयांचा दंड आणि सहा महिने ते दोन वर्षापर्यंतचा कारावास, अशी शिक्षा केली जाते. आता संबंधीत बालकाच्या पालकांनाही शिक्षा केली जात आहे. पालकांना पहिल्या गुन्ह्यात माफी आहे. तर दुसऱ्या गुन्ह्यात १० हजार रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.
२१ मुले झाली मुक्त
नागरिकांनी बालकामगार निदर्शनास आणून दिला तर आम्ही तातडीने संबंधीत दुकानांवर धाड टाकू. आत्तापर्यंत कार्यालयाने ६५ धाड टाकल्या आहेत. त्यातून २१ बालकांना मुक्त करण्यात आले आहे. बालकामगार आहेत का? हे पाहण्यासाठी जवळजवळ १ हजार ४४२ आस्थापनांना भेटी दिल्या आहेत. या भेटींची आणि धाडसत्रांची संख्या यापुढे वाढत जाणार आहे, असे मुंडे यांनी सांगितले.
व्हिडिओ पहा आणि वाचा - का फोडताहेत हे तरुण बीएमडब्ल्यू
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.