महात्मा बसवेश्वर जयंती 
मराठवाडा

जयंती विशेष : सामाजिक क्रांतीचे उद्गाते- महात्मा बसवेश्वर

बाराव्या शतकात कर्नाटक राज्यात विजापूर जिल्ह्यातील बागेवाडी या छोट्याशा गावी अक्षय शुद्ध तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सन 1131 मध्ये थोर शिवभक्त मादिराज व मादलंबिका यांच्या पोटी बसवेश्वर यांचा जन्म झाला.

प्रल्हाद कांबळे

नांदेड : 'काय कवे कैलास' हा श्रममंत्र ज्या थोर क्रांतिकारी महापुरुषांनी (Mahatma Basweshwar jayanti) दिला, पिढ्यानपिढ्या बहुजन समाजाला अज्ञानात ठेवून कर्मकांडाचे पांघरून घालून पद्धतशीरपणे शोषण करणाऱ्या वैदिक कर्मठांच्या विषमतावादी समाजरचनेच्या चिरेबंदी बुरुजास ज्यानी सुरुंग लावला. वंचित, उपेक्षित शुद्रातीशुद्राना एकत्र करुन त्यांच्याशी विचार विनिमय करण्यासाठी अनुभव मंटप ही लोकसंसद यांनी बाराव्या शतकात स्थापन केली. खऱ्या अर्थाने महिलांना 50 टक्के (ladies reservation in 50 percentage) आरक्षण बाराव्या शतकात दिले. अनिष्ट प्रथा, परंपरा,अज्ञान, अंधश्रद्धा, जातीभेद व वर्णभेद यावर ज्यानी प्रहार केला त्यांचे नाव महात्मा बसवेश्वर. (Anniversary Special: The Originator of Social Revolution - Mahatma Basaveshwar)

बाराव्या शतकात कर्नाटक राज्यात विजापूर जिल्ह्यातील बागेवाडी या छोट्याशा गावी अक्षय शुद्ध तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सन 1131 मध्ये थोर शिवभक्त मादिराज व मादलंबिका यांच्या पोटी बसवेश्वर यांचा जन्म झाला. तत्कालीन सामाजिक धार्मिक, आर्थिक परिस्थितीचा अभ्यास जर केला तर चातुर्वर्ण्य व्यवस्था होती. आणि माणसामाणसांमध्ये भेदभाव केला जात होता. जातीव्यवस्था ही वर्णव्यवस्थेचे परीणीती होती. वर्णव्यवस्थेचे विकृत विद्रूप रुप म्हणजेच जातीव्यवस्था. स्त्री- पुरुष भेदाभेद होता. लोक जाती- पाती, वर्णव्यवस्थेत व अंधश्रद्धेत गुरफटून गेले होते. विशेषत: वीरशैव धर्माला ग्लानी आली होती. या धर्माचे अनुयायांवर इतर धर्मांच्या विचाराचा व आचरणाचा पगडा वीरशैव धर्मांवर पडू लागला होता. अशा कालावधीत महात्मा बसवेश्वर यांचा जन्म झाला.

हेही वाचा - कोरोनामुळे मुलांचे भवितव्य होतेय अंधकारमय; पालकांत चिंतेचे वातावरण

विकृत व कर्मठ मनोवृत्तीच्या समाजव्यवस्थेचा त्यांना तीव्र संताप येत होता

जन्मताच महात्मा बसवेश्वर शांत, चिंतनशील, विवेकनिष्ठ व चिकित्सक वृत्तीचे असल्याने त्यांना बालपणापासूनच समाजातील अंधश्रद्धा, वाईट चालीरीती, पशुहत्या, जातीभेद या गोष्टींना विरोध होता. यज्ञात दूध- तूप का बरे टाकायचे, निष्पाप प्राण्यांचा बळी का घ्यायचा, माणसामाणसांत भेद का करायचा, स्त्रियांना विषमतेची वागणूक का व कशासाठी अशा अनेक प्रश्नांची उत्तरे बाल बसवेश्वर विचारु लागले. घरात व बाहेर त्यांना वरील प्रश्नांची समाधानकारक उत्तरे कोणीही देऊ शकले नाही. विकृत व कर्मठ मनोवृत्तीच्या समाजव्यवस्थेचा त्यांना तीव्र संताप येत होता. बाल बसवेश्वर अनिष्ट रूढी व परंपरा याबाबतीत त्यांच्या आई- वडिलांनाही अनेक वेळा याबाबतीत विरोध करत होते. मुलगा व मुलगी असा भेद करणारा संस्कार म्हणजे व्रतबंधन असे महात्मा बसवेश्वर यांनी सांगितले. माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असणार्‍या बहिणीचे वृत्तबंधन होत नसेल तर मला असा संस्कार नको म्हणून त्यांनी विरोध केला. नातेवाईक व गुरूंनी त्यांना वृत्त बंधन नाकारल्यास जननी व जन्मभूमीचा त्याग करावा लागेल अन्यथा संस्कार स्वीकारावा लागेल असा पर्याय ठेवल्यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न करता बालपणीच क्रांतीचा पहिला झेंडा रोवला व जातवेद मुनींचे कुंडलसंगम स्थित आश्रमात ते राहू लागले.

सतत बारा वर्ष धर्मदर्शनाचा अभ्यास केला

तेथे त्यांनी सर्व शास्त्रांचा अभ्यास केला. सतत बारा वर्ष धर्मदर्शनाचा अभ्यास केला. स्वचिंतनामुळे महात्मा बसवेश्वर स्वतंत्र विचारांची मांडणी करू लागले. अज्ञान अंधकारात पिचलेल्या समाजाला जागे करत नवसमाज घडविण्याचा विचार मनाशी बाळगू लागले. अशाच एका यात्रेच्या दिवशी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढे या गावची मंडळी यात्रेच्या निमित्ताने कुडलसंगम येथे आली. त्यावेळी महात्मा बसवेश्वर यांचे नाव सर्वतोमुखी झाले होते. प्रकांड ज्ञानी, मितभाषी, प्रसन्न चेहरा आणि नम्र स्वभाव, मधुर बोलणे इत्यादी गुणांमुळे महात्मा बसवेश्वर सर्वांना आवडत. कालांतराने त्यांची कीर्ती हळूहळू कुडलसंगम च्या पंचक्रोशीत पसरु लागली. प्रत्येक जण महात्मा बसवेश्वर यांची कीर्ती गाऊ लागले. त्यावेळी मंगळवेढ्यात चालुक्य राजाचा सामंत म्हणून राजा बिज्जल राज्य करीत होता. त्या राजाच्या पदरी महात्मा बसवेश्वर यांचे मामा बलदेव दंडाधिकारी म्हणून नोकरीस होते. त्यांची सुकन्या गंगाबिका उपवर झाली होती आणि आपल्या कन्येला असा पती लाभावा या विचारात बलदेव होते. त्यांनी आपली मुलगी महात्मा बसवेश्वरांना देऊन त्यांना मंगळवेढ्यात आणले. महात्मा बसवेश्वर यांचे तत्वज्ञान त्याकाळी महाराष्ट्र- कर्नाटक यांना जोडणारा दुवा ठरले होते.

महात्मा बसवेश्वर यांचा दुसरा विवाह म्हणजे आंतरजातीय विवाह होता

राजा बिज्जलानी त्यांना सरकारी सेवेत सामावून घेतले. एक निस्पृह आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून महात्मा बसवेश्वर यांचा लौकिक पसरला. काही काळानंतर दंडाधिकारी बलदेव मृत्यू पावल्यानंतर बिज्जल राजानी त्या जागेवर महात्मा बसवेश्वर यांची नेमणूक केली. ताम्रपटावर लेखांच्या आधारित महात्मा बसवेश्वरांनी एका खजिन्याचा शोध लावून दिला त्यामुळे राजाच्या कोषागारात कित्येक कोटीची भर पडली. राजाचा विश्वास महात्मा बसवेश्वरावर मोठ्या प्रमाणात बसला. त्यांनी आपली मानलेली बहीण सिद्धरस यांची कन्या निलांबिका ही महात्मा बसवेश्वर यांना देऊन त्यांचा विवाह केला. गंगाबीका व निलांबिका अशा महात्मा बसवेश्वर यांना दोन पत्नी होत्या. इतिहास काळात राजे, सामंत, सरदार यांच्यात अनेक विवाह करण्याची प्रथा रुढ होती. दुसरे म्हणजे त्यांच्या दरबारातील सिद्धरस हे क्षत्रिय होते. महात्मा बसवेश्वर यांचा दुसरा विवाह म्हणजे आंतरजातीय विवाह होता.

येथे क्लिक करा - नांदेड : कोरोनामुक्‍तीचा भोसी पॅटर्न जिल्‍ह्यात राबविण्‍यात येणार- वर्षा ठाकूर

महात्मा बसवेश्वरांचा सरळ आणि नम्र स्वभाव

पुढील काळात महात्मा बसवेश्वर यांचे सारे आयुष्य सामाजिक समतेचा ध्वज उभारण्यात गेले. त्यांच्या या कार्यात गंगाबिका व निलांबिका यांनी महात्मा बसवेश्वरांना पूर्ण सहकार्य केले. महात्मा बसवेश्वरांच्या समाज परिवर्तनाच्या ऐतिहासिक महत्त्वाच्या कार्यात त्या दोघींचा सहभाग अत्यंत मौलिक स्वरूपाचा होता. महात्मा बसवेश्वरांच्या सरळ आणि नम्र स्वभावामुळे प्रजाजनांत देखील त्यांची प्रतिमा उज्वल झाली. समाजसुधारणेचे आपले क्रांती कार्य पुढे नेण्यासाठी त्यांना या पदाचा उपयोग झाला. नकळतच महात्मा बसवेश्वर यांच्या कार्याला सामाजिक आणि राजकीय प्रतिष्ठा प्राप्त झाली. बाराव्या शतकात कर्नाटक आणि महाराष्ट्र यांना जवळ आणण्याचं कार्य महात्मा बसवेश्वरांनी केलं हे एक ऐतिहासिक सत्य आहे. त्याच काळात चालुक्य राजे दुबळे व कार्यक्षम झाले त्याचा फायदा त्यांच्या सामंतांनी आणि मंडलिकांनी घेतला मंगळवेढ्याचे सामंत राजे बिज्जल स्वतंत्र झाले आणि चालुक्यांची सत्ता झुगारुन दिली आणि आपल्या सार्वभौमत्वाची घोषणा केली. मंगळवेढ्याहून बिज्जलानी आपली राजधानी हलविली आणि कर्नाटकात कल्याण- नगरीत बसवली.

समता, प्रेम आणि बंधुत्व त्यांनी शिकविले

प्रधानमंत्री म्हणून महात्मा बसेश्वर यांना नेमण्यात आले. तेव्हापासून महात्मा बसवेश्वरांचे कार्यक्षेत्र मंगळवेढा ऐवजी कल्याण झाले. पुढील काम वीरशैव-लिंगायत धर्माची सुत्रे याच शहरातून हलू लागली. समता, प्रेम आणि बंधुत्व त्यांनी शिकविले. त्यांनी अपरिग्रह, माणुसकी, बंधुप्रेम शिकवले. महात्मा बसवेश्वर नेहमी सांगत की परंपरेने जन्मावरून ठरविण्यात आलेल्या जाती आणि वर्ण हे सर्व खोटे आहे. म्हणून माणसामाणसात स्पृश्य- अस्पृश्य असा कोणताही भेदभाव करु नये. स्त्री- पुरुषांना समान वागणूक द्यावी, विधवांना सन्मानाने वागवावे आणि त्यांना पुनर्विवाह करण्यास संधी द्यावी. सती जाण्याची अमानुष प्रथा बंद करावी. बालविवाह करण्यास त्यांचा विरोध होता. परोपजीवी असे कोणी राहू नये, प्रत्येकाने कष्ट करून आपली उपजीविका करावी, आपल्या कुटुंब पोषणासाठी आवश्यक असणारे धन ठेऊन उरलेले सर्व धन समाजासाठी खर्च करावे. ते इस्टलिंगाची पूजा करावी. अंधश्रद्धा महात्मा बसवेश्वरांना मुळीच मान्य नव्हती.

जुने जाऊ द्या मरणालागुनी

जाळूनी किंवा पुरुनी टाका

ही कवी केशवसुतांनी फुंकलेली तुतारी महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकातच जोमाने फुंकली होती. त्या तुतारीने तळागाळातला सारा बहुजन समाज त्यांनी खडबडून जागा केला होता.

अनुभव मंडपाची स्थापना

धार्मिक आणि सामाजिक सुधारणा हे महात्मा बसवेश्वर यांचे मुख्य कार्य होते. महात्मा बसवेश्वर यांच्या प्रेरणेने कल्याण नगरीत अनुभव मंटपाची स्थापना करण्यात आली होती. महान तत्वज्ञानी अल्लम देव प्रभू हे त्या मंटपाचे अध्यक्ष होते. निरनिराळ्या भागांतून आलेल्या शिवशरणानी लिहिलेली वचने येथे वाचून दाखविण्यात येत होते. अचूक आणि निर्दोष असलेली वचने वीरशैवांच्या साहित्यात या वचनांना अढळस्थान प्राप्त होई. अशी वचने रचणारे जाणकार सर्व जातीतून या मंटपात सभासद म्हणून सामील करून घेतलेले असतात. त्यापैकी मडिवाळ माचीदेव ( धोबी ) मेदार केतय्या (बुरुड), मादर चनैया (मांग ), किन्नरी बोमैया ( सोनार), शिवनाथ मय्यार (महार ), शंकर दासीमय्या (शिंपी), ढोर कक्कय्या (ढोर ), समगार हारळया (चांभार), मधुवरस (ब्राह्मण), इत्यादी या अनुभव मंटपात पुरुष शरण होते. पुरुष शरणांच्या बरोबरीने शेकडो महिला देखील होत्या. त्या काळात सार्वजनिक कार्यात महिलांना अनेक ठिकाणी संधी नव्हती. त्या काळात अनुभव मंटपात महिलांना 50 टक्के आरक्षण महात्मा बसवेश्वरांनी दिले.

हे उघडून तर पहा - 'मंत्री भुमरेंविरोधात काय कारवाई केली?' खंडपीठाचा प्रश्न

अनुभव मंडपाची वैशिष्ट्ये :

जातीयता व उच्चनिचतेचे निर्मूलन करणे, इंद्रिय निग्रह नाकारणे, देवालय निर्मितीस विरोध, स्थावर लिंग, मूर्ती पूजेचे खंडन, यज्ञ- याग, होम- हवन इत्यादी कर्मकांडास विरोध, इष्ट लिंग परीकल्पनेचा स्वीकार, जन्म- मरण इत्यादी पंच सुतके नाकारणे,अंधश्रद्धा निर्मूलन करणे, बहूदेवोपासनेचे खंडन, एकेश्वरवादाचे मंडन, श्रम कायकाचे गौरवीकरण, मानवी हक्क आर्थिक- धार्मिक व सामाजिक स्वातंत्र्य, सद्गुण- सदाचारारास प्राधान्य, गुणकर्मावरुन व्यक्तीस श्रेष्ठत्व, दासोह तत्वाचा प्रसार, स्त्री- पुरुष समानता, सर्वांना मूल्यशिक्षण काल्पनिक स्वर्ग- नरकाचे निवारण, शुभ- अशुभ ग्रहतिथी, पंचांग, भविष्याचे खंडन, दलित उद्धाराचे कार्य करणे, कल्याण राज्य निर्माण करण्याचे कार्य, जन्मत: सर्व स्त्री-पुरुष समान आहेत. जन्म, लिंग जात, वर्णाधारीत विषमता नष्ट करणे, प्रत्येकाला विषय व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य, प्रत्येकाचे व्यवसाय समान दर्जाचे व समाज उपयोगी आहेत, प्रत्येकाने आपापला कायदा करूनच उदरनिर्वाह करावा. परस्परात रोटीबेटी व्यवहार करावेत व अस्पृश्यता निर्मूलन करावेत. लोकभाषेत वचन साहित्य निर्मिती प्रपंच परमार्थ यांचा समन्वय ठेवावा. सांसारिक जीवनात अधिक प्राधान्य सर्व प्राणीमात्रांविषयी दयाभाव ठेवावा. अष्टावरण- पंचाचार षटस्थलाचे आचरण करावे, विश्वबंधुत्वाची भावना वृद्धिंगत करावी, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व व सामाजिक न्याय या तत्त्वप्रणाली चा प्रसार करणे अनुभव मंटप म्हणजे वीरशैव लिंगायत धर्माचे ज्ञानपीठ होते. त्यांचे सदस्यत्व प्राप्त झालेले शरण मोठे कर्तुत्ववान, ज्ञानी, व्यासंगी आणि निष्ठावंत होते. अर्थातच महात्मा बसवेश्वर यांची प्रेरणा यामध्ये होती. खऱ्या अर्थाने महिला आरक्षणाचे उद्गाते किंवा जनक म्हणून महात्मा बसवेश्वर यांचे नाव घ्यावे लागेल. यामध्ये अक्कमहादेवी याही होत्या. त्याची तुलनाच करायची झाली तर संत मीराबाईशी करावी लागेल. मराठी भाषेत देखील वीरशैव संतानी मोलाची भर घातली.

महात्मा बसवेश्वर अस्पृश्यता मानत नव्हते

कल्याण नगरीत प्रधानमंत्री पद भूषविणारे महात्मा बसवेश्वर कसे वागत याचे एकच अत्यंत उद्बोधक उदाहरण मी या ठिकाणी आपणाला सांगणार आहे, एकदा कल्याण नगरीत शिवशरण ढोर कक्कय्याची पत्नी चालली असताना तिने पाहिले की महात्मा बसवेश्वर घोड्यावर स्वार होऊन आपल्याच दिशेने येत आहेत, तिने महात्मा बसवेश्वरांना थांबावयास सांगून आपल्या घरी जेवणाचे निमंत्रण दिले. पण राजदरबारात कामाला जाण्याची घाई असल्याने ते थांबवू शकले नाहीत, काम आटोपून परत जाताना ढोर कक्कय्या याच्या पत्नीने दिलेल्या आमंत्रणाची त्यांना आठवण झाली व ते त्याच्या घरी येऊन थडकले. पण बोलावलेल्या वेळी महात्मा बसवेश्वर आले नाहीत म्हणून कक्कयाच्या पत्नीने दार उघडले नाही व आतूनच प्रसाद देणार नाही असे बजावले. महात्मा बसवेश्वर घोड्यावरून खाली उतरून दरवाज्याकडे पहात उभे राहिले. दरवाजा उघडायचे लक्षण काही दिसेना एवढ्यात दाराच्या फटीतून भाताची शिते घेऊन बाहेर पडणार्‍या मुंग्यांची रांग त्यांना दिसली. त्यांना वाटले की या मुंग्यांच आपल्यासाठी आपल्यासाठी प्रसाद आणत आहेत पण ती शिते मुंग्याकडून काढून घेणे त्यांना योग्य वाटले नाही, लगेच ते दुकानात गेले आणि तेथून गुळ आणला व तो मुंग्यांसमोर ठेवला गुळाच्या वासाने मुंग्यांनी भाताची शिते सोडली व त्या गुळाला चिकटल्या, महात्मा बसवेश्वरांनी ती शिते जमा केली. स्नान पूजा करून हा प्रसाद ग्रहण करावा म्हणून ते घरी गेले व घरी जाऊन स्नान पूजा करून त्यांनी प्रसाद घेतला. या एकाच उदाहरणावरून महात्मा बसवेश्वर अस्पृश्यता मानत नव्हते हे स्पष्ट होते. वर्णाश्रम धर्म म्हणजे शूद्रांच्या सामाजिक गुलामगिरीचे सनदच असे त्यांचे मत होते. ही गुलामगिरी नष्ट करून समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न महात्मा बसवेश्वरांनी आयुष्यभर केला. विचार आणि अनुभव यांचे भांडवल घेऊन महात्मा बसवेश्वरांनी धर्मसुधारणेची चळवळ केली ही चळवळ म्हणजे प्रत्यक्ष धर्म क्रांतीच होती. कर्नाटकाच्या इतिहासात ती *कल्याण क्रांती* म्हणून ओळखली जाते.

मानवावरचे प्रेम हे महात्मा बसवेश्वरांच्या तत्वज्ञानाचा हे मूलतत्त्व

महात्मा बसवेश्वरांच्या अशा विचारांमुळेच त्यांना सर्व जाती उपजाती पंथ, शूद्र अतिशूद्र इत्यादीतून भरपूर अनुयायी मिळाले त्या सर्वांनी वीरशैव- लिंगायत धर्म वाढवला म्हणून महात्मा बसवेश्वरांना वीरशैव- लिंगायत धर्माचे प्रसारक आणि प्रचारक म्हटले जाते. यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्रात बहुजन समाजाचा धर्म म्हणजे वीरशैव- लिंगायत धर्म झाला. कल्याण नगरीत दोन नामवंत वीरशैव शरण राहत होते. एकाचे नाव होते हरळव्या चांभार आणि दुसऱ्याचं नाव होतं मधूवय्या ब्राह्मण. दोघेही महात्मा बसवेश्वर यांचे सच्चे अनुयायी या दोघांच्या मुला मुलीच्या लग्नाला महात्मा बसवेश्वरांनी व अनुभव मंडप आणि संमती देखील दिली परंतु काही सनातन्यांनी या प्रसंगावरून उचल खाल्ली त्यांनी लोकाना भडकावुन दिलं. रोज दंगे होऊ लागले. रक्तपात होऊ लागला अशा प्रकारची हिंसा महात्मा बसवेश्वर यांना मान्य नव्हते त्यांनी नैतिकता समजून प्रधानमंत्री पद व कल्याण नगरी कायमची सोडली व सन 1168 मध्ये कुडलसंगमी समाधी घेतली. महात्मा बसवेश्वर यांचे तत्कालीन सर्व स्तरांवरील काम पाहता ते एक थोर समाज सुधारक होते.

हे वाचलेच पाहिजे - शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! बियाणे अनुदानाच्या अर्जासाठी २० मेपर्यंत मुदतवाढ

आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन

आज 21 व्या शतकातही आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन म्हणून शासनाला अनुदान व संसारोपयोगी भेटवस्तू द्याव्या लागतात. तेच काम महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात केले असे हे थोर महात्मा असूनही त्यांना कर्नाटक आणि महाराष्ट्रात शासकीय पातळीवर त्यांची म्हणावी तशी दखल घेतली गेली नव्हती शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांच्या अथक परिश्रमामुळे वैशाख शुद्ध अक्षय तृतीया 26 एप्रिल 2001 पासून महात्मा बसवेश्वर यांची शासकीय जयंती दोन्ही राज्यात मोठ्या दिमाखाने साजरी होताना दिसते. तेव्हापासूनच या जयंतीला सार्वजनिक जयंती उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तसेच महात्मा बसवेश्वर यांचे चरित्र इयत्ता पाचवी, इयत्ता सातवी, इयत्ता नववी आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समाविष्ट झाले आहे. थोर क्रांतिकारी महामानव महात्मा बसवेश्वरांच्या समग्र विचार क्रांतीची आजही जगाला गरज आहे.

शिवा संघटनेमुळेच महात्मा बसवेश्वर यांची जयंती

शिवा संघटने मुळेच महाराष्ट्र हे महात्मा बसवेश्वर यांची शासकीय जयंती साजरी करणारे देशातील पहिले राज्य ठरले. जिथे 26 एप्रिल 2001 पासून महात्मा बसवेश्वर यांची शासकीय जयंती करणं महाराष्ट्रात सुरू झाली असून जयंतीला राज्यभर सार्वजनिक जयंती उत्सवाचं स्वरूप आले आहे. एवढेच नाही तर शिवा संघटनेमुळे देशात पहिल्यांदा महाराष्ट्रात सन 2001 मध्ये शासकीय जयंती सुरू झाल्यानंतर आपल्या जीआरचा आधार घेऊन सन 2002 मध्ये कर्नाटक राज्यात 2003 मध्ये तेलंगणात 2016 पासून आंध्र प्रदेशात महात्मा बसवेश्वर यांची शासकीय जयंती सुरू झाली आहे हे शिवा संघटनेचे मोठे यश आहे. मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथे महात्मा बसवेश्वर यांचे राष्ट्रीय स्मारक उभे करण्याची शिवा संघटनेची प्रलंबित मागणी महाराष्ट्र शासनाने मंजूर केली असून त्यासाठी अर्थसंकल्पात 31 कोटी रुपयांची तरतूद घोषित करण्यात आली आहे. शिवा संघटनेचे मुळेच देशाच्या संसद भवनात महात्मा बसवेश्वर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे उद्घाटन तत्कालीन राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते ता. 28 एप्रिल 2003 रोजी शिवा संघटनेचे संस्थापक प्रा. मनोहर धोंडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले आहे. यातूनच लंडनचे तत्कालीन महापौर डॉ. नीरज पाटील यांनी प्रेरणा घेऊन लंडनमध्ये पंतप्रधान नरेंद्र नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 14 नोव्हेंबर 2015 रोजी महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याचे उद्घाटन केले आहे. शिवा संघटनेच्या मागणीमुळे व अथक प्रयत्नामुळे प्रतिवर्षी अक्षय तृतीयेला महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त दलित मित्र पुरस्कार या प्रमाणेच *महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कार* महाराष्ट्र शासनाकडून देण्यासाठी शिवा संघटने मुळेच मंजुरी मिळाली असून सन 2016 पासून महाराष्ट्रातील एक व्यक्ती व एका संस्थेची निवड करून महाराष्ट्र शासनाकडून गौरवित करण्यात येते. अशा थोर महामानवाच्या विचाराला व कार्याला विनम्र अभिवादन!

लेखक- संजय कोठाळे- मराठवाडा अध्यक्ष -शिवा कर्मचारी महासंघ तथा विभागीय अध्यक्ष-शिक्षक परिषद.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT