जागतिक अन्न दिवस विशेष
औरंगाबाद : उरलेले अन्न आपण किती सहजतेनं फेकून देतो; पण आता हे करताना एकदा तरी भुकेने व्याकूळ असलेला चेहरा आठवा. शेतकऱ्याने घाम गाळून धान्य पिकविण्यासाठी घेतलेले परिश्रम आठवा. हे आवाहन करण्यामागचे कारण म्हणजे भारतात भूकबळींची स्थिती गंभीर असल्याचे दिसून आले आहे. याला अन्न-धान्याचा तुटवडा हेच कारण जबाबदार नसून अन्नाची मोठ्या प्रमाणावर होणारी नासाडी कारणीभूत आहे. ‘ग्लोबल हंगर इंडेक्स’चा २०२२ चा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. यामध्ये ही बाब स्पष्ट झाली आहे.
भारतात जवळपास ५० टक्के अन्न वाया जाते. या खाण्याचे रूपांतर पैशात केले तर रक्कम दररोज साधारणतः २५० कोटी रुपयांचे अन्न फेकून दिले जाते. अहवालानुसार भारतात अन्नधान्याचे पुरेसे उत्पादन होते. परंतु, ते गरजूंपर्यंत नियोजित पद्धतीने पोचत नाही. अन्नाची नासाडी म्हणजेच केवळ अन्न वाया जात नाही, तर पैसा, पाणी, ऊर्जा, वाहतूक, जमीन आणि पर्यावरणाची देखील हानी होते.
कुठे होते अन्नाची नासाडी?
घरांसह हॉटेल्स, लग्नसोहळे, कौटुंबिक समारंभ
साठवणुकीची पुरेशी सुविधा नसल्याचा परिणाम.
पुरवठा यंत्रणेत त्रुटी, दरामधील चढउतारामुळे समस्या.
उदरभरण नोहे...
‘वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे... हा श्लोक रोज जेवणाआधी म्हटला पाहिजे. कारण अन्नातून शरीराला ऊर्जा मिळते. शारीरिक क्रियांसाठी म्हणजे श्वास, हृदय, मेंदू आणि पचनसंस्थेची कार्य चालण्यासाठी आपल्याला ऊर्जा लागते. ही सर्व ऊर्जा अन्नातून मिळते. त्यामुळे खाण्यासाठी जगू नये, तर जगण्यासाठी खावे. पोट भरणे हा जेवणाचा हेतू नाही, तर शरीर कार्यान्वित ठेवण्यासाठी जेवढे अन्न लागते तेवढेच ग्रहण करावे. अतिरिक्त अन्न ग्रहण केल्यास आळस चढतो, असा विज्ञानासह आणि ग्रंथामध्ये देखील उल्लेख आहे.
पर्यावरणावर परिणाम
फेकलेल्या अन्नातून मिथेन वायू तयार होतो. हा वायू हरितगृह परिणामांना जबाबदार आहे. कार्बन डायऑक्साइडपेक्षा तो २३ पट जास्त घातक आहे. त्यामुळे वातावरणाचे तापमान वाढते. त्याचा परिणाम पर्यावरणावर होऊन पर्जन्यमान घटते. म्हणजेच वाया गेलेले अन्न ‘ग्लोबल वॉर्मिंग’ला देखील कारणीभूत ठरते. शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याचा कष्टाचा सन्मान करायचा असेल तर ताटातील अन्न टाकून देताना किमान एकदा तरी भुकेने काळवंडलेल्या मुलाचा चेहरा आपल्या डोळ्यांसमोर आणावा असे ‘अन्न वाचवा’चे नंदकुमार कुलकर्णी म्हणाले. तसेच अन्नाचा अपव्यय हे भारतातल्या भूकबळी समस्येचे मुख्य कारण असल्याचे अन्न वाचवा समितीचे अनंत मोताळे यांचे म्हणणे आहे.
अन्न नासाडी रोखण्यासाठी राष्ट्रीय व राज्यस्तरावर अन्नसुरक्षा समिती बळकट करावी .अन्न आणि पोषण सुरक्षेबद्दल समाजात जनजागृती जितकं गरजेचं आहे तितकंच अन्नपदार्थाचे साहित्य खरेदी करा.कॅन्टीनमध्ये, हॉटेल, समारंभात लागतं तितकंच अन्न घ्या.नासलल्या अन्नापासून बायोगॅसची निर्मिती करावी.शिळ्या फळभाज्या, अन्न फेकून देण्यापेक्षा त्याचे कंपोस्ट खत बनवा. अन्नप्रक्रिया उद्योगावर भर द्यावा. रोटी बॅंकेच्या माध्यमातून गरजूंपर्यंत अन्न पोचावे.
देशाची स्थिती
‘ग्लोबर हंगर इंडेक्स २०२२’ च्या अहवालानुसार १२१ देशांमध्ये भारताचा क्रमांक १०७ वा आहे. मागील वर्षी भारताचा क्रमांक १०२ वा होता. चीन (४), श्रीलंका (६४), नेपाळ (८१), बांगलादेश (८४) आणि पाकिस्तान (९९) या देशांच्या मागे आपला देश आहे. भारतात एकीकडे ५० टक्के बालकुपोषण आहे, तर एकीकडे ५० टक्के अन्नाची नासाडी होत आहे. बालकुपोषणामुळे भारताची स्थिती आणखी ढासळलेली असल्याचे अहवालात म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.