छत्रपती संभाजीनगर

महापालिकेत आल्यापासून आमचा फुटबॉल झाला

शेखलाल शेख

औरंगाबाद : ग्रामपंचायत, नगरपालिका ते महापालिका असा प्रवास झाल्यानंतही देवळाई गावाची स्थिती अद्यापही बकाल आहे. महापालिकेत समाविष्ट होऊनही येथील नागरिकांना रस्ते, पाणी, ड्रेनेज, कचरा, स्ट्रीट लाईट अशा पायाभूत सुविधांसाठी रोज संघर्ष करावा लागत आहे. मागील काही वर्षांत आमचा फुटबॉल झाला. यापेक्षा ग्रामपंचायत बरी होती असे म्हणण्याची वेळ येथील रहिवाशांवर आली आहे.

देवळाई गाव, सातारा तांडा हा जुना वॉर्ड ११४ होता. नवीन रचनेत वॉर्ड क्रमांक ११५ झाला आहे. सध्या ‘डीपीआर’व्यतिरिक्त काहीच केले जात नाही. पक्‍के रस्ते, पाणी, पथदिवे, कचऱ्याची विल्हेवाट, मलनिस्सारण वाहिन्या, उद्याने, तसेच क्रीडांगण अशा सुविधांचा प्रश्‍न कायम आहे.

हेही वाचा - लग्न ठरले, पत्रिका छापल्या हळद लागल्यापुर्वीच डॉक्टर तरुणीची आत्महत्या

ग्रामपंचायत असताना दिले जात होते लक्ष 

देवळाई गाव व सातारा तांडा ही गावे जुनी असली, तरी या गावांना लागून नव्याने विकसित झालेली वसाहत, अधिकारी, कर्मचारी, व्यावसायिकांच्या निवासाचे केंद्र बनले; तसेच दूध व्यावसायिकांचे गाव म्हणूनही देवळाई परिचित आहे. १९६२ मध्ये स्थानिक स्वराज संस्था अस्तित्वात आली. यावेळी सातारा-देवळाई या दोन्ही गावांची गटग्रामपंचायत होती. १९७९ मध्ये देवळाई या स्वतंत्र ग्रामपंचायतीची निर्मिती झाली. देवळाईचे पहिले सरपंच होण्याचा मान श्‍यामराव हिवाळे यांना मिळाला होता. १९८४ मध्ये मोहंमद हनिफ शेख फत्तू, १९८९ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत करीम पटेल सरपंच झाले. सलग २५ वर्षे देवळाईचे सरपंच म्हणून त्यांनी काम पाहिले.


नगरपालिकेवर झाले मोठे राजकारण 

तत्कालीन आघाडी शासनाने २८ ऑगस्ट २०१४ ला सातारा-देवळाई नगरपालिका स्थापनेची अधिसूचना काढली होती. यावर मोठे राजकारण झाले. सातारा-देवळाई परिसर महापालिकेत समाविष्ट करण्याच्या अधिसूचनेपर्यंत या नगरपालिकेचे अस्तित्व फक्त १६८ दिवसांचे राहिले. विशेष म्हणजे, २७ जानेवारी २०१५ ला नगरपरिषदेबाबतचा सविस्तर प्रस्ताव नगरपरिषद प्रशासन संचालनालयाला सादर झाला होता. तीन फेब्रुवारीला सातारा-देवळाई नगरपालिकेतील वॉर्डांसाठी आरक्षण सोडत होती. नगरपालिका कार्यालयात आरक्षण सोडत निघत असताना इकडे शहरात महापालिकेच्या सभागृहात सातारा-देवळाई परिसराचा महापालिकेत समावेश करण्याचा ठराव घेण्यात आला होता. त्यानंतर तीन दिवसांनी महापालिका पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ मंत्रालयात धडकले. त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. त्यानंतर सातारा-देवळाईचा भाग महापालिकेत समाविष्ट करण्यात आला.

देवळाई ग्रामपंचायतीच्या परिसरात पक्की घरे, मोठे अपार्टमेंट, शाळा, महाविद्यालये येथे उभी राहत गेली; मात्र त्या तुलनेत सुविधा काही वाढल्या नाहीत. सातारा-देवळाई ग्रामपंचायतींची नगरपालिका आणि त्यानंतर १४ मे २०१५ ला महापालिकेत समाविष्ट करण्याची अधिसूचना काढण्यात आली होती. चांगल्या सुविधा मिळतील, अशी सर्वांनाच अपेक्षा होती; मात्र ही अपेक्षा फोल ठरली. बहुतांश नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागते. महापालिकेत समावेश होऊन पाच वर्षे होतील; मात्र नागरिकांचे हाल महापालिकेतसुद्धा आहेत. 

ग्रामपंचायत ते महापालिकेत समावेश

- १९६२ मध्ये सातारा-देवळाई ग्रामपंचायतीची स्थापना 
- २८ ऑगस्ट २०१४ - शासनाकडून सातारा-देवळाई नगरपालिका स्थापनेची अधिसूचना 
- २३ फेब्रुवारी २०१५ - जिल्हाधिकाऱ्यांकडून अंतिम अधिसूचना, नगरपालिका स्थापनेनंतर निवडणूक घेण्याचे आयोगाचे निर्देश. 
- २४ एप्रिल २०१५ - महापालिकेत समाविष्ट करण्याबाबतचे दोन आक्षेप आयुक्‍तांकडे वर्ग. सुनावणी घेऊन अहवाल देण्याची सूचना. 
- २ मे २०१५ - विभागीय आयुक्‍तांकडून सुनावणी, शासनाला अहवाल सादर 
- १४ मे २०१५ - नगरपालिका महापालिकेत समाविष्ट करण्याची अधिसूचना काढण्यात आली होती. 

काय म्हणतात नागरिक...

साधारण वीस वर्षांपूर्वी देवळाई व देवळाई परिसरात सर्वत्र हिरवळ दाटलेली असायची. शहराला दुधाचा पुरवठा केला जात असे. त्यामुळे गाव समृद्ध होते. कालांतराने लोकसंख्या वाढत गेली. इमारती उभ्या राहिल्या; पण विकासकामे ज्या पद्धतीने व्हायला हवी होती ती झाली नाहीत. 
- हकीम पटेल 

महानगरपालिकेत गावाचा समावेश झाला. गावपातळीवरील निर्माण होणाऱ्या समस्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्वरित सोडविल्या जात असत; परंतु आज परिस्थितीला आठ ते दहा दिवस पाणी येत नाही. कोणीच गावाकडे लक्ष देत नाही. आता असे वाटते, की ग्रामपंचायतच बरी होती. 
- शिवाजी जाधव 

पूर्वी ग्रामपंचायत असताना गावातील नाल्यांची स्वच्छता नियमित केली जात असे; परंतु मनपात समावेश झाल्यापासून नालेसफाई व डास फवारणी केली जात नाही. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून आरोग्यास धोका आहे. येथील नाल्यात कचरा पडलेला आहे. 
- खलील खान 

नवीन भाग विकसित झाल्यामुळे टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या; परंतु परिसराचा विकास मात्र रखडला आहे. पाणी, रस्ता या कायमच्या समस्या होऊन बसल्या आहेत. कधी समस्या सोडविल्या जातील याची फक्‍त प्रतीक्षाच उरली आहे. काही ठिकाणी तर पाणी विकत घ्यावे लागते. 
- ज्ञानदेव हिवाळे 

या परिसरात सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पाणी समस्या आहे, एकवेळ खराब रस्त्यावरून जाणे परवडले; परंतु पाण्याचे सोंग करता येत नाही. महिन्याकाठी हजारो रुपये नुसते पाण्यासाठी खर्चावे लागतात. याचा विचार करून प्रशासनातर्फे पाणी समस्या त्वरित सोडवावी. 
- हाजी रज्जाक पटेल 

परिसरातील नागरिकांसाठी रस्ता, पाणी, ड्रेनेजलाइन या प्राथमिक सुविधा तर आवश्यक आहेतच. जोपर्यंत त्या सुरळीतपणे मिळत नाही, तोपर्यंत या परिसरातील नागरिकांचे जीवन विस्कळित असेल. काही जण तर उघड्यावर शौचास जातात. येथे चांगल्या ड्रेनेजलाइन गरजेची आहे. 
- नसीर पटेल 

म्हाडा कॉलनी, देवळाईत पाणी, रस्ता, ड्रेनेज, पथदिव्यांची सुविधा हवी. यासाठी महापालिका आयुक्तांना वारंवार निवेदन दिलेले आहे; मात्र त्याकडे लक्ष दिले जात नाही. नागरिकांना किमान मूलभूत सुविधा तरी हव्यात. 
- आनंद बोर्डे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT