औरंगाबाद - कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या तीन महिन्यांपासून उपाय-योजना सुरू आहेत. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. दुसरीकडे कोरोनाचा कहर सुरूच आहे. नागरिक सुरक्षित अंतर, मास्कचा, सॅनिटायझरचा वापर हे नियम पाळत नसल्यामुळे कोरोनाचा फैलाव होत असल्याचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय सांगत आहेत. मात्र, लोकांना डिस्टन्सचे ज्ञान सांगणाऱ्या महापालिकेच्या दारातच मंगळवारी (ता.१६) सुरक्षित अंतराचा फज्जा उडाला. कोविड-१९ हॉस्पिटलपाठी आयोजित मुलाखतीसाठी शेकडो बेरोजगार जमा झाले. त्यांनी सुरक्षित अंतर ठेऊन थांबावे यासाठी प्रशासनाने कुठलीही खबरदारी घेतली नाही.
कोविड रूग्णालयासाठी भरती
चिकलठाणा एमआयडीसी परिसरात राज्य शासनाने २५० खाटांचे कोविड-१९ हॉस्पिटल उभारले आहे. या हॉस्पिटलचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले असून, हॉस्पिटल महापालिकेच्या ताब्यात देण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग असेपर्यंत हे रुग्णालय महापालिकेमार्फत चालविले जाणार आहे. त्यासाठी प्रशासनाने १४० जणांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात १३ एमडी डॉक्टरांसह वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, टेक्निशियन अशा पदांचा समावेश आहे. यातील काही पदांसाठी मंगळवारी मुलाखती ठेवण्यात आल्या होत्या.
सुरु झाली प्रक्रिया
यासंदर्भात आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले की, फिजीशियनच्या तेरा जागा असून, एक अर्ज प्राप्त झाला होता, त्यामुळे त्या उमेदवाराला पात्र ठरवण्यात आले. वैद्यकीय अधिकारिपदांच्या वीस जागा आहेत, १९ उमेदवारांनी अर्ज आले. बारा जणांना पात्र ठरवण्यात आले. स्टाफ नर्स (परिचारिका) पदासाठी ६३ जागा आहेत, १०८ जणांनी अर्ज केले, त्यापैकी १०४ जणांना पात्र ठरवण्यात आले. एक्स रे टेक्निशियनपदाच्या दोन जागांसाठी ३१ अर्ज केले, २९ जण पात्र ठरवण्यात आले. ईसीजी टेक्नीशियन पदासाठी दोन जागा होत्या. दोनच अर्ज प्राप्त झाले, दोघांनाही पात्र ठरवण्यात आले. लॅब टेक्नीशियन पदासाठी सहा जागा आहेत. ५४ अर्ज आले, ३४ जणांना पात्र ठरवण्यात आले. फार्मासिस्टच्या आठ जागा आहेत, १८४ अर्ज आले. १६२ जणांना पात्र ठरवण्यात आले. ११४ जागांसाठी ३४४ जणांना पात्र ठरवण्यात आले आहे. त्यांची निवड यादी तयार केली जाणार आहे. यादी प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्या मान्यतेने प्रसिद्ध केली जाईल.
अपुऱ्या यंत्रणेमुळे गोंधळ
सकाळपासून मुख्यालयासमोर गर्दी झाली. त्यांना रांगेत उभे करण्यात सुरक्षा रक्षकांना यश आले नाही. मुलाखतीच्या कक्षाबाहेर सॅनिटायझरचे यंत्र ठेवण्यात आले होते, पण त्यातून सॅनीटायझर बाहेर पडत नव्हते, असे उमेदवारांनी सांगितले. दरम्यान, हा गोंधळ लक्षात येताच प्रशासनाने तातडीने उमेदवारांच्या व्यवस्थित अंतरानुसार रांगा लावल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.