औरंगाबाद - विद्यार्थ्यांना शिस्त लागावी, यासाठी शाळेत शिक्षक छडी वापरीत होते. त्या छडीच्या धाकाने विद्यार्थ्यांना शिस्त लागे आणि अभ्यास करीत. त्यामुळेच कदाचित "छडी लागे छम छम... विद्या येई घम घम...' अशी म्हण पूर्वी प्रचलित होती; मात्र राष्ट्रीय शिक्षण आयोगाच्या आदेशानुसार शाळेतून छडी हद्दपार झाली. याचे चांगले, वाईट दोन्ही परिणाम सध्या दिसत आहेत.
शिक्षण हक्क कायदा आणि प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमामुळे विद्यार्थी सहजरीत्या पुढच्या वर्गात जाऊ लागल्याने गुणवत्तेवर नकारात्मक परिणाम होऊ लागला आहे. गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी प्रयत्न केले तरीही त्याला पालकांकडून पाठिंबा मिळेलच याची खात्री राहिलेली नाही. पालकांनी अपेक्षांचे ओझे मुलांवर लादल्याचे चित्र घराघहिंत पाहायला मिळत आहे. आपल्या मुलाने सर्वाधिक गुण मिळवावेत, अशी इच्छा पालकांची असते; परंतु त्यासाठी शिक्षकांनी मुलांना शिक्षा करायची नाही असेही बहुतांश पालकांना वाटते.
हे ही वाचा - बापरे... तोंडात सुतळी बॉम्ब फोडला आणि...
पूर्वी एखाद्या मुलाची शैक्षणिक प्रगती होत नसेल तर त्याचे पालकच शाळेत येऊन "माझ्या मुलाला शिक्षा करा अन् त्याच्यात सुधारणा करा' असे सांगायचे; मात्र आता पालकांची भूमिका बदलत असल्याने विद्यार्थ्यांना घडविताना शिक्षकांना आणि पालकांनाही कसरत करावी लागत आहे. त्यातील काही शिक्षक केवळ अध्यापनाचे काम बजावितात. विद्यार्थी लक्ष देतात का? गृहपाठ लिहिला का? लिहून घेतात का? पाठांतर करतात का? अशा गोष्टींकडे पूर्णपणे लक्ष देणे बंद केले आहे.
राष्ट्रीय शिक्षण बालहक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांना शारीरिक किंवा मानसिक छळाला सोमोरे जाऊ नये, अशी तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार शाळांमध्ये छडी मारण्यासह अनेक शिक्षा वगळण्यात आल्या. या आदेशानुसार वर्गात मुलांना रागवायचं नाही, छडी मारायची नाही, शारीरिक, मानसिक, शाब्दिक अशा सर्व प्रकारच्या शिक्षेवर निर्बंध घालण्यात आले. इतकेच नव्हे, तर बेंचवर उभे करणे, अंगठे धरायला लावणे, शाळेच्या ग्राउंडला फेऱ्या मारणे यापूर्वीच्या सौम्य शिक्षा; तसेच तू मठ्ठ किंवा "ढ' आहेस, तुला कळत नाही का? असे रागावून विद्यार्थ्याला सर्व वर्गात बोलायचे नाही असे बोलणे म्हणजे "शाब्दिक' शिक्षांवरही बंदी घालण्यात आली आहे.
परिस्थितीनुसार बदल
बऱ्याच ठिकाणी विद्यार्थ्यांना अनावश्यक कठोर शिक्षा केल्याचे प्रकार समोर आले. यात सर्व मित्रांसमोर छडी मारल्याने विद्यार्थ्यांचे स्वास्थ्य बिघडणे, सर्वांसमोर अपमानास्पद बोलल्याने शाळा सोडणे, शाळेत बेंचवर उभे केल्याने आत्महत्येचा प्रयत्न करणे असे प्रकार समोर आले होते. त्यामुळे मोफत शिक्षण बालहक्क आयोगानुसार विद्यार्थ्यांना शाळेत मानसिक, शारीरिक त्रास होणार नाही, याची दखल घेणे शाळांना सक्तीचे केले आहे. त्यामुळे शिक्षकांनी मुलांना शिक्षा करणे सोडून दिले.
पूर्वी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांबद्दल आदरयुक्त भीती असे. विद्यार्थीही शिस्तप्रिय शिक्षकांसमोर जाण्यास धजावत नव्हते; मात्र आता परिस्थिती बदललेली आहे. शिक्षक आपल्याला शिक्षा करणार नसल्याची खात्री विद्यार्थ्यांना असते. त्यामुळे विद्यार्थी बिनधास्त आहेत. शिक्षकांचा जो पूर्वी आदर आसायचा तो आताच्या विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत नाही.
- व्ही. एस. कदम (ज्येष्ठ शिक्षक)
आम्ही आता डीएड, डीटीएड करून शिक्षक पदावर रुजू झालो आहे. मनात खूप इच्छा आहे, की माझा विद्यार्थी खूप मोठा व्हावा; पण शिकवण्याच्या तळमळीतून त्याला कधी रागावलो किंवा एखादी सौम्य शिक्षा केली तर आहे ती नोकरी जायची. त्यामुळे आपले ज्ञानदान करायचे.
- सी. के. देशमुख, शिक्षिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.