hingoli photo
hingoli photo 
मराठवाडा

हिंगोलीची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

सकाळ वृत्तसेवा

 हिंगोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डामध्ये उपचार घेणाऱ्या राज्य राखीव पोलिस बलाच्या सात जवानांसह सेनगाव येथील एका रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने बुधवारी (ता. १३) त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्‍हा शल्यचिकित्‍सक डॉ. किशोरप्रसाद श्रीबास यांनी दिली. दरम्यान, मागील चार दिवसांपासून एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नसून आतापर्यंत ४६ रुग्ण बरे झाले असून कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

जिल्‍ह्यात एकूण ९१ कोरोनाबाधित होते. त्‍यापैकी ४६ रुग्ण बरे झाल्याने त्‍यांना घरी सोडण्यात आले. सद्य:स्‍थितीला ४५ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. जिल्‍हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वार्डात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती स्‍थिर असून कोणतीही गंभीर लक्षणे नाहीत. 

एक हजार ३०३ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह

उर्वरित नऊ रुग्ण औरंगाबाद येथील धूत हॉस्‍पिटलमध्ये भरती आहेत. दरम्यान, एक हजार ४०२ संशयित रुग्णांना भरती करण्यात आले होते. त्‍यापैकी एक हजार ३०३ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यातील एक हजार २५७ व्यक्‍तींना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या १३५ संशयित रुग्ण उपचार घेत असून १४ जणांचे अहवाल येणे प्रलंबित असल्याची माहिती डॉ. श्रीबास व वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम यांनी दिली.

आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन

 नागरिकांनी सतर्क राहून कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करावे. घराबाहेर पडू नये, घरी थांबून आपले आणि आपल्या कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

टेंपो-दुचाकी अपघात शेतकरी ठार

आखाडा बाळापूर : पीकविम्याचे पैसे काढून गावाकडे परतणाऱ्या शेतकऱ्यांच्या दुचाकीला टेंपोने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक शेतकरी ठार झाल्याची घटना बुधवारी (ता. १३) दुपारी भाटेगाव शिवारात घडली. यातील दुसरा शेतकरी जखमी असून त्यांच्यावर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बँकेत पैसे काढण्यासाठी गेले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंडलवाडी (ता. कळमनुरी) येथील कोंडबा दत्ता खोकले (वय ३८ ) व पागोजी श्यामराव डवरे हे बुधवारी सकाळी त्यांच्या दुचाकीवर (एमएच २६ -एडी ३३८७) गुंडलवाडी येथून डोंगरकडा येथे बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते. दुपारी बँकेतून पैसे काढल्यानंतर दोन वाजण्याच्या सुमारास दोघेही दुचाकीवरून गुंडलवाडीकडे निघाले. 

जखमीवर नांदेड येथे उपचार

त्यांची दुचाकी भाटेगाव शिवारात आले असता नांदेडकडे जाणाऱ्या टेम्पोने ( एमएच २६ - एडी ८९८५) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातामध्ये कोंडबा खोकले यांचा जागीच मृत्यू झाला, तर पागोजी डवरे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच आखाडा बाळापूरचे सहायक पोलिस निरीक्षक रवी हुंडेकर यांनी जमादार भगवान वडकिले, शेख बाबर, प्रभाकर भोंग यांना घटनास्थळी पाठविले. 

गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

पोलिस कर्मचारी घटनास्थळी आल्यानंतर जखमी पागोजी डवरे यांना तातडीने उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलवले. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये होणार कैद

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Dr. Amol Kolhe : आढळराव पाटील शब्द पाळणार का?

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

SCROLL FOR NEXT