4Bibtya_0_0 
मराठवाडा

आष्टी तालुक्यात बिबट्याच्या शोधासाठी पथकासह ग्रामस्थांनी जागविली रात्र

अनिरुद्ध धर्माधिकारी

आष्टी (जि.बीड) : नरभक्षक बिबट्याने आष्टी तालुक्यातील किन्ही येथे दहावर्षीय मुलाचा बळी घेतल्यानंतर तातडीने पावले उचलत तज्ज्ञांच्या पथकासह विविध ठिकाणचे वन अधिकारी-कर्मचारी बिबट्याच्या बंदोबस्तासाठी किन्ही परिसरात दाखल झाले आहेत. शुक्रवार (ता.२७) रात्री दाखल झालेल्या या सुमारे सव्वाशे जणांच्या पथकासह परिसरातील ग्रामस्थांनी रात्रभर जागून बिबट्याचा शोध घेतला. परंतु बिबट्याने दुसरा बळी घेऊन चोवीस तास उलटूनही अद्याप त्याचा शोध घेण्यात यश आलेले नाही.


आष्टी तालुक्यात नरभक्षक बिबट्याने या आठवड्यात तीन दिवसांच्या अंतराने दोन बळी घेतले. प्रथम मंगळवारी (ता.२४) बिबट्याने सुरुडी येथील तरुण शेतकरी व मोराळा पंचायत समिती गणाच्या सदस्या आशा गर्जे यांचे पती नागनाथ गर्जे यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार केले. शेतात दुपारच्या वेळी तुरीला पाणी देत असताना हा प्रकार घडला. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत म्हणजे शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास बिबट्याने सुरुडी परिसरातीलच किन्ही (काकडेची) येथे स्वराज ऊर्फ यश सुनील भापकर या दहा वर्षीय बालकाच्या नरडीचा घोट घेतला. श्रीगोंदा तालुक्यातील रहिवासी व आजोळी आलेला स्वराज आजी व मावशीच्या पतीबरोबर शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेला होता.

यावेळी तुरीच्या पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याने झडप घालून स्वराजला उचलून नेले. काही वेळात शेजारील माळरानात त्याचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, अवघ्या तीन दिवसांत नरभक्षक बिबट्याने दोन बळी घेतल्याने सुरुडी परिसरासह तालुक्यातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. किन्हीतील घटनेची दखल घेत वन विभागाने तातडीने पावले उचलली. त्यानुसार रात्रीपर्यंत औरंगाबाद, यवतमाळ, नंदूरबार, नाशिक, नगर व बीड जिल्ह्यातील वन विभागाचे  सुमारे १०० अधिकारी-कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले.

बिबट्याला पकडण्यासाठी रात्रीपासून शोधमोहीम (कोम्बिंग ऑपरेशन) सुरू करण्यात आले आहे. सुरुडी परिसरात यापूर्वी तीन पिंजरे बसविण्यात आलेले आहेत. शुक्रवारपासून या भागात आणखी सात पिंजरे बसविण्यात आले आहेत. वन विभागाच्या या सर्व सुमारे सव्वाशे अधिकारी-कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थांनी शुक्रवारची रात्र जागून काढली. परंतु बिबट्याचा ठावठिकाणा लागू शकलेला नाही. आजही दिवसभर ही मोहीम सुरू होती.

तज्ज्ञांचे पथक, अत्याधुनिक साधने
नरभक्षक बनलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी असे बिबटे पकडण्याचा अनुभव असलेले तज्ज्ञांचे पथक दाखल झाले आहे. प्रत्येक पथकात चार-पाच तज्ज्ञांचा समावेश आहे. शुक्रवारी औरंगाबाद येथील दोन पथके व अमरावतीचे एक पथक असे बारा-पंधराजण दाखल झाले. आज नांदेडचेही एक पथक दाखल झाले आहे. या सुमारे वीस तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येत आहे. त्यासाठी बीड व शेजारील नगर जिल्ह्यातील सुमारे शंभर ते सव्वाशे वन अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. ड्रोन कॅमेरा, सीसीटीव्ही व इतर अत्याधुनिक साधनांची मदतही घेण्यात आली आहे.

पथकाच्या जवळून बिबट्याने ठोकली धूम
दुसरा बळी गेल्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी स्थानिक वन कर्मचाऱ्‍यांचे पथक तातडीने दाखल झाले. तेथे पिंजरा लावण्यात आला. तसेच शोधमोहीमही सुरू करण्यात आली. या दरम्यान, झुडुपात लपलेल्या बिबट्याने पथकाच्या अतिशय जवळून धूम ठोकली. सोशल मीडियावर मात्र वन कर्मचार्‍यांवर बिबट्याने हल्ला केल्याची अफवा पसरली होती.

आमदार धस यांनी ठोकला तळ
तालुक्यात तीन दिवसांत बिबट्याने दोन बळी घेतल्याने आमदार सुरेश धस आक्रमक झाले. त्यांनी प्रशासनाला जाब विचारून आणखी किती बळी जाण्याची वाट पाहणार असा जाब विचारला. वन विभागाचे पथक रात्री दाखल झाल्यानंतर धस यांनी या सर्वांची जेवणाचीही व्यवस्था केली. शिवाय मोहिमेची व त्यातील विविध उपकरणांची सर्व माहिती घेत पथकाबरोबर किन्ही परिसरात तळ ठोकला. धस यांची ही तळमळ तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे.

चर्चा-अफवांनी दहशतीत भर
शेजारील पाथर्डी (जि.नगर) परिसरात तीन बळी घेणारा नरभक्षक बिबट्या आष्टी तालुक्यातील सावरगाव (मायंबा) पट्ट्यात आल्याची चर्चा होती. वन विभागाने मायंबा परिसरात एक मादी बिबट्या जेरबंद केला. तसेच पाथर्डीतही दोन बिबटे पकडण्यात आले. दरम्यान, बिबट्याने पहिला बळी घेतलेल्या सुरुडी परिसर या भागापासून सुमारे तीस किलोमीटरवर आहे. तेथे हल्ला होण्यापूर्वी शेजारील पाटसरा गावात बिबट्या दिसल्याची चर्चा होती. त्यानंतर सुरुडी व तीनच दिवसांत सात-आठ किलोमीटरवरील किन्हीत बिबट्याने दोन बळी घेतले. शनिवारी शहरानजीक मंगरूळमध्ये मायलेकावर हल्ला केला. कड्याजवळील शेरी येथेही शनिवारी बिबट्या दिसल्याची चर्चा आहे. वरचे वर बिबट्याच्या दर्शनाने व चर्चा-अफवांनी दहशतीत भर पडत आहे.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तान UAE ला पराभूत करत 'सुपर फोर'मध्ये! भारताविरुद्ध पुन्हा होणार सामना, पण कधी अन् केव्हा? जाणून घ्या

Athletics Championship 2025: नीरज चोप्रा विरुद्ध अर्शद नदीम लढत होणार! जाणून घ्या कुठे अन् किती वाजता पाहाता येणार फायनल

PAK vs UAE: पाकिस्तानी विकेटकिपरच्या थ्रोमुळे अंपायरला मोठी दुखापत, मैदानंच सोडावं लागलं; जाणून घ्या नेमकं काय घडलं

Meenatai Thackeray statue case Update: मोठी बातमी! मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यास २४ तासांच्या आत अटक; गुन्हाही केला कबूल

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

SCROLL FOR NEXT