बीड - शहरातील छेडछाडीचे गुन्हे रोखण्यासाठी पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दोन ऑक्टोबरला शक्ती पथकाची स्थापना केली. या पथकाकडून आतापर्यंत शहरातील 20 रोडरोमिओंवर कारवाई करण्यात आली आहे. पथकाकडून शहरातील महाविद्यालय, शाळांसह इतर ठिकाणी जाऊन युवती, मुली व महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात येत आहे.
हेही वाचा - कन्या शाळेत लैंगिक समस्यांची हीच ती जाहिरात
पूर्वी जिल्ह्यात 12 दामिनी पथकांची नियुक्ती करण्यात आली होती; परंतु जिल्ह्यातील सर्व दामिनी पथक बंद करून त्या जागी शहरासाठी एक शक्ती पथक नियुक्त केले आहे. पथकाकडून शहरातील शैक्षणिक ठिकाणी जाऊन तेथील मुलींना कायद्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येत आहे. यामुळे छेडछाडीच्या घटना रोखण्यास काही प्रमाणात मदत मिळत आहे.
शहरातील काही शिकवणी वर्गास अचानक भेटीही देण्यात येत आहेत. टवाळगिरी करणाऱ्यांवर तत्काळ कारवाया सुरू आहेत. आतापर्यंत शहरातील 20 रोडरोमिओंवर शक्ती पथकाने कारवाई केली आहे. पथकामुळे शहरातील छेडछाडीच्या घटनांना काही प्रमाणात आळा बसला आहे. या कारवाया शक्ती पथकप्रमुख पोलिस उपनिरीक्षक अश्विनी कुंभार व पथकातील ज्योती सानप, काजल वीर, प्रतिभा चाटे यांनी केल्या आहेत. जिल्ह्यातील इतर ठिकाणीही शक्ती पथक नियुक्त करण्याची मागणी होत आहे.
युवती व महिलांनी हे करावे
बीड शहरातील महाविद्यालय, शाळा, बसस्थानक, शिकवणी वर्गासह इतर ठिकाणी पथकाकडून भेटी देण्यात येत आहेत. युवती व मुलींना आम्ही कायद्यासंदर्भात मार्गदर्शन करीत आहोत. शहरातील मुली व महिलांनी छेडछाडीसंदर्भात काही तक्रारी असतील, तर त्यांनी न घाबरता आमच्याशी संपर्क साधावा.
- ज्योती सानप, शक्ती पथक, बीड
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.