नवी मुंबई : शहराच्या विकासात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या प्रकल्पांनाच फेरनिविदांचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे सुरुवातीला वेग पकडलेल्या प्रकल्पांना आता संथगती मिळाली आहे. सुमारे 80 कोटी रुपये खर्चून नेरूळ येथे उभारण्यात येणारे सायन्स पार्क, जुईनगर व सानपाड्याला जोडणारे 70 कोटींचे उड्डाणपूल, ऐरोली येथील 80 कोटी खर्च करून उभारण्यात येणारे नाट्यगृह आणि वाशी सेक्टर 12 येथील जलतरण तलाव कम बस डेपो असे सुमारे 370 कोटींच्या कामांना सध्या ब्रेक लागला आहे.
नवी मुंबई शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या सायन्स पार्कचा विकास आणखीन लांबणीवर पडत चालला आहे. या प्रकल्पाचा जागतिक पातळीवरील आराखडा मंजूर झाला आहे. मात्र, त्यानुसार बांधकाम करणारा कंत्राटदार अद्याप पालिकेला सापडला नाही. या प्रकल्पाच्या निर्मितीसाठी अभियांत्रिकी विभागामार्फत जागतिक निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती; परंतु काही अटी व शर्तींमुळे दोन वेळा निविदा प्रक्रिया राबवूनही अपेक्षित कंत्राटदारांचा प्रतिसाद लाभलेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा प्रशासनातर्फे आता तिसऱ्यांदा फेरनिविदा राबवण्यात येत आहेत. या प्रकल्पांप्रमाणेच वाशी येथे एनएमएमटी बस डेपो वाणिज्य इमारतीसोबत उभारण्यात येत असलेले जलतरण तलावाच्या बांधकामाला अद्याप प्रशासनाला मुहूर्त सापडलेला नाही. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी महापालिकेला 150 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मात्र, या विकासकामासाठी दोन वेळा निविदा प्रक्रिया राबवून प्रतिसाद न लाभल्यामुळे पुन्हा फेरनिविदा राबवण्यात येत आहे.
ऐरोलीचे नाट्यगृह आणि जुईनगर सानपाड्याला जोडणारा उड्डाणपूल हे दोन प्रकल्पही निविदा प्रक्रियेत कंत्राटदार न आल्यामुळे कागदावरच राहिले आहेत. नाट्यगृह उभारण्यासाठी महापालिकेला 80 कोटी रुपये, तर उड्डाणपूल उभारण्यासाठी 70 कोटींचा खर्च येणार आहे. उड्डाणपुलाचा प्रस्ताव रखडल्यामुळे जुईनगर व सानपाडा येथील रहिवाशांना जीव मुठीत घेऊन रेल्वेरूळ ओलांडावे लागत आहे.
नाट्यगृहाला मुहूर्त कधी?
ऐरोलीत नाट्यगृह उभारण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. त्याकरीता महापालिकेने एका कंत्राटदाराला नेमले होते. मात्र कंत्राटदार कंपनी दिवाळखोरीत अडकल्याने त्याला नाट्यगृहाचे बांधकाम करता आले नाही. तेव्हापासून महापालिकेतर्फे अभियांत्रिकी विभाग कंत्राटदाराच्या शोधात आहे; परंतु अद्यापही निविदा प्रक्रिया राबवून नाट्यगृह उभारणीला कंत्राटदार सापडलेला नाही. त्यामुळे ऐरोलीतील नाट्यगृहाची वीट कधी रचणा,÷िअसा प्रश्न नाट्यकर्मींकडून केला जात आहे.
सायन्स पार्क - 80 कोटी
जलतरण तलाव/ वाणिज्य संकुल - 150 कोटी
जुईनगर उड्डाणपूल - 70 कोटी
ऐरोली नाट्यगृह - 80 कोटी
सायन्स पार्क, जलतरण तलाव, जुईनगर उड्डाणपूल आणि नाट्यगृह हे चारही प्रकल्प शहराच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रकल्प आहेत; परंतु काही कंत्राटदार अटी- शर्तींमुळे अपात्र ठरत आहेत. त्यामुळे कंत्राटदार मिळालेला नाही. मात्र, आता पुन्हा फेरनिविदा राबवून प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई महापालिका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.