नवी मुंबई : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) परिसरात काही अज्ञात हल्लेखोरांनी विद्यार्थी आणि प्राध्यापकांवर अमानुषपणे हल्ला केला. रविवारी (ता. 5) रात्री घडलेली ही घटना म्हणजे एखाद्या दहशतवादी हल्ल्याप्रमाणे असून, विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणारी असल्याचे मत नवी मुंबईतील विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. तसेच विद्यापीठ हे शिक्षणाचेच माहेरघर आहे. तिथे कुठल्याही प्रकारची हिंसा शोभत नाही, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
मुंबई, पुण्यात या हल्ल्याच्या निषेधार्थ विद्यार्थी एकवटले असून, कॅंडल मार्च, साखळी आंदोलन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांनी देखील जेएनयू हल्ल्याविरोधात निषेध व्यक्त केला. जेएनयूच्या परिसरामध्ये अनेक आंदोलने शांततापूर्ण मार्गाने होत असतात. काही दिवसांपूर्वीच फी वाढीविरोधात त्यांचे आंदोलन झाले. नागरिकत्व कायद्याविरोधातही त्यांनी आवाज उठवला होता. मात्र, यापूर्वी कधीही विद्यार्थ्यांवर वा प्राध्यापकांवर असा भ्याड हल्ला झाला नव्हता. या हल्ल्याचा निषेध करतो, असे मत एसआयईएस महाविद्यालयातील त्रिशायनी करुणाकरन या विद्यार्थिनीने व्यक्त केले.
डीएव्ही कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी सुनेत्रा महाडेश्वर म्हणाली, हा केवळ विद्यार्थ्यांवरील नाही तर लोकशाहीवरील अतिशय निंदनीय, क्रूर हल्ला आहे. जेएनयूचे विद्यार्थी शांततेने आपल्या हक्कांसाठी लढत होते. त्यांचा लढा अशारितीने दडपला जात असेल तर भारताचे भविष्य उज्ज्वल असेल, असे आपण कोणत्या "युवा' ताकदीच्या जोरावर म्हणायचे, असा प्रश्न पडतो. विद्यापीठ विद्येचे मंदिर आहे, त्याला असे हिंसेचे ठिकाण बनवू नका. मॉडर्न कॉलेजचा विद्यार्थी सुजित पाटील म्हणतो, या हल्ल्याचा व्हिडीओ पाहून धक्का बसला. सकाळी कॉलेजच्या ग्रुपवर चर्चा सुरू असल्याने जेएनयू हल्ल्याबद्दल समजले. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये शिरून विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापकांना मारणे म्हणजे... सोशल मीडियावर हा हल्ला पूर्व नियोजित असल्याची पोस्ट फिरत आहे. त्या खऱ्या असतील तर या हल्लेखोरांवर क्षुल्लक कारवाई करून लोकांच्या तोंडाला पाने पुसली जातील असे वाटते.
जेएनयूमधील विद्यार्थी, प्राध्यापकांवरील हल्ला हा शैक्षणिक क्षेत्रासाठी आणि लोकशाहीच्या दृष्टीने लज्जास्पद बाब आहे. या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो.
- सविनय म्हात्रे, शहर अध्यक्ष, नवी मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना.
एखाद्या निर्णयाविरोधातील एकजूट दाखवण्याकरीता आंदोलने होतात. या आंदोलनानंतर संबंधित प्रशासनाने त्या निर्णयाबाबत विचार करून प्रश्न सामंजस्याने सोडवता येतो का, ते पाहायचे असते. पण येथे दडपशाहीचा मार्ग अवलंबला जात आहे. हे चुकीचे आहे. या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो.
- रामेश्वरी पाटील, सरचिटणीस, नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.