सुधागडात ठाकरे सेना, शिंदे सेनेला खिंडार
वऱ्हाड जांभूळपाडा सरपंच आणि उपसरपंचांनी घेतले ‘कमळ’ हाती
सकाळ वृत्तसेवा
पाली, ता. ३१ (वार्ताहर) : सुधागड तालुक्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. शनिवारी (ता. ३१) वऱ्हाड-जांभूळपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंचांसह शिंदेंची शिवसेना व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या मोठ्या पक्षांतरामुळे सुधागडात शिवसेना आणि उबाठा गटाला धक्का बसला असून, भाजपची ताकद वाढली आहे. खासदार धैर्यशील पाटील, प्रकाश देसाईंची भूमिका या पक्षप्रवेशासाठी महत्त्वाची ठरली आहे.
भाजप जिल्हाध्यक्ष तथा खासदार धैर्यशील पाटील, भाजप नेते प्रकाश देसाई, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. नीलिमा पाटील, मिलिंद देशमुख, रवींद्र देशमुख आणि तालुकाध्यक्ष श्रीकांत ठोंबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. गिरीश गोविंद दळवी यांच्या नेतृत्वाखाली जांभूळपाडा ग्रामपंचायतीचे सरपंच पांडुरंग लिंबाजी शेंडे, उपसरपंच अरुणा गिरीश दळवी आणि सात सदस्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला.
या वेळी कार्यकर्त्यांचे स्वागत करताना खासदार धैर्यशील पाटील म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जनता भाजपमध्ये सामील होत आहे. विकासाचे व्हिजन अधिक गतिमान करून जनतेला न्याय देण्याचे काम आम्ही करू. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांत जनतेने विकासासाठी भाजपला साथ द्यावी.
सुधागडसह संपूर्ण जिल्ह्यात भाजप संघटनात्मकदृष्ट्या भक्कम होत आहे. कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता शाश्वत आणि सर्वांगीण विकास घडवून आणला जाईल, असे भाजप नेते प्रकाश देसाई म्हणाले.
या वेळी सतीश देसाई, ॲड. सुभाष पाटील, विलास पालवे, विशाल गुरव आणि संदेश लोंढे यांसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
वऱ्हाड-जांभूळपाडा सरपंच पांडुरंग लिंबाजी शेंडे, उपसरपंच अरुणा गिरीश दळवी, सदस्य प्रभाकर खंडागळे, सुशील मालुसरे, सविता बामगुडे, सुषमा वाघमारे, रमेश पवार, मनीषा गोरे, धोंडी पवार तसेच राजेश शितोळे, धनंजय काकडे, योगेश खंडागळे, सुरेश चव्हाण, विशाल देशमुख आणि इतर शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.