धावती लोकल पकडताना तरुणीचा मृत्यू
बदलापूर रेल्वेस्थानकावर धक्कादायक अपघात
सकाळ वृत्तसेवा
बदलापूर, ता. ३१ : मध्य रेल्वेच्या बदलापूर रेल्वेस्थानकावर थरकाप उडवणारी घटना शनिवारी (ता. ३१) सकाळी घडली. धावती लोकल पकडण्याच्या प्रयत्नात २८ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. चेतना चंद्रशेखर देवरुखकर (वय २८) असे मृत तरुणीचे नाव आहे. ही संपूर्ण घटना स्थानकावरील सीसीटीव्ही फुजेटमध्ये चित्रित झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चेतना शनिवारी सकाळी ८ वाजून ११ मिनिटांची बदलापूरहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे (सीएसएमटी) जाणारी लोकल पकडत होती. बदलापूर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ३ वर धावती लोकल पकडताना तिचा तोल गेला आणि फलाट संपताच ती घसरून थेट धावत्या लोकलखाली आली. या अपघातात ती गंभीर जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच बदलापूर लोहमार्ग पोलिस व आरपीएफ यांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने मदतकार्य केले. जखमी चेतना हिला तत्काळ ग्रामीण रुग्णालय, बदलापूर येथे दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. चेतना ही जुवेली येथील जगन्नाथ गॅलेक्सी या इमारतीत वास्तव्यास होती. अवघ्या वर्षभरापूर्वी तिचा विवाह झाला होता. अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे देवरुखकर कुटुंबावर मोठा आघात झाला असून, कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
रेल्वे प्रशासनाचे आवाहन
बदलापूर रेल्वेस्थानकातील या घटनेची नोंद बदलापूर रेल्वे पोलिसांकडून करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. धावती लोकल पकडण्याचे वाढते प्रकार गंभीर अपघातांना कारणीभूत ठरत असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रवाशांनी सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे तसेच धावती लोकल पकडण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.