महिलांच्या आत्मसन्मानावर घाला!
ठाण्यात विनयभंग, बलात्काराच्या घटना वाढल्या; सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
हेमलता वाडकर ः सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : अश्लील हावभाव, शेरेबाजी, नकोसा वाटणारा स्पर्श... केवळ मनाला लज्जा उत्पन्न करणाऱ्या नव्हे तर आत्मसन्मानावर घाला घालणाऱ्या अशा घटनांना महिलांना, मुलींना दररोज सामोरे जावे लागत आहे. ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रामध्ये रोज विनयभंगाच्या सरासरी दोन गुन्ह्यांची, तर बलात्काराच्या एका घटनेची नोंद होत आहे. आरोपींना पकडण्यात पोलिसांना यशही येत आहे, पण मुंब्य्रात १८ वर्षीय तरुणीने छेडछाडला कंटाळून आपले जीवन संपवल्याने पुन्हा एकदा चिंतेची घंटा वाजली वाजली आहे.
दीड वर्षांपूर्वी घडलेल्या बदलापूर घटनेनंतरही महिला अत्याचाराच्या घटना थांबत नसल्याचे दिसून येत आहे. ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असल्याची माहिती पोलिस दप्तरी नोंद झालेल्या आकडेवारीवरून मिळते. रस्त्यावर, कार्यस्थळावर आणि घरातसुद्धा महिला असुरक्षित असल्याचे चित्र दिसत आहे. २०२५ च्या गेल्या सहा महिन्यांत ठाण्यात ३१८ विनयभंग आणि २०८ बलात्कार प्रकरणांची नोंद झाली आहे. मागील वर्षी २०२४ या काळात २९७ विनयभंग आणि १७० बलात्कार प्रकरणे नोंदली गेली होती, तर संपूर्ण २०२३ मध्ये ६२५ विनयभंग आणि ३९० बलात्कार प्रकरणे झाली होती. यावरून गुन्ह्यांचा वेग कमी न होता वाढत असल्याचे स्पष्ट होते.
ठाणे शहराचा झपाट्याने विकास होत आहे. त्यासोबतच जिल्ह्यातील प्रमुख शहरेही स्मार्ट सिटीकडे झेप घेत आहेत. पुरुषांच्या बरोबरीने महिला सर्वच कार्यक्षेत्रात आपले कर्तुत्व गाजत आहे. एकीकडे महिलांच्या विकासासाठी पोषक वातावरण, तर दुसरीकडे काही मूठभर विकृतांमुळे असुरक्षिततेची भीत अशीच काहीशी अवस्था जाणवत आहे. वाढलेल्या नागरिकरणामुळे ठाण्यातील रस्ते, शाळा, महाविद्यालये, रेल्वेस्थानके आणि सार्वजनिक ठिकाणे महिलांसाठी अधिकाधिक असुरक्षित होत असल्याच्या काही घटना अलीकडच्या काळात घडल्या आहेत.
मागील काळात घटनेच्या घटनांचा मागोवा
१
चार दिवसांपूर्वी मुंब्रा येथे छेडछाड सहन न झाल्याने एका १८ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याच्या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त झाला. ही तरुणी ज्या परिसरात राहत होती तेथीलच काही तरुण तिला त्रास देत होते. रोज होणाऱ्या या मानसिक कुचंबनेतून तिने आत्महत्येचा मार्ग निवडला. या घटनेनंतर तिच्या सुसाईड नोटवरून पोलिसांनी आरोपी तरुणांना अटक केली आहे.
२
१४ जुलैला वर्तकनगर भागात शाळेतून घरी परतणाऱ्या विद्यार्थिनीचा रस्त्यात विनयभंग झाला. पालकांना हा सर्व प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी तातडीने वर्तकनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्या वेळी असे गैरकृत्य त्या विकृताने अन्य पाच मुलींसोबतही केल्याचे धक्कादायक बाब उघडकीस आली. त्या नराधमाला पोलिसांनी एक महिन्याने शोधून काढत बेड्या ठोकल्या.
३
४ नोव्हेबरला ७० वर्षीय डॉक्टरने केअरटेकरचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली. तिने दाखवलेल्या हिमतीनंतर त्या डॉक्टरसोबत काम करणाऱ्या इतर महिलांनीही पुढे येऊन तक्रार नोंदवली.
४
कामानिमित्त २८ ऑक्टोबरला नेरूळहून ठाण्यात आलेल्या तरुणीवर रेल्वे प्रवासात झालेल्या गैरवर्तनाची तक्रारही नोंद झाली आहे.
ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रातील महिला अत्याचारांची आकडेवारी (एप्रिल ते सप्टेंबर २०२५)
महिना विनयभंग घटना विनयभंग उकल बलात्कार घटना बलात्कार उकल
एप्रिल ८१ ७६ ४२ ४०
मे ४३ ४१ २४ २४
जून ५९ ५७ ३८ ३८
जुलै ५३ ५१ ३६ ३५
ऑगस्ट ५८ ५७ २९ २९
सप्टेंबर २४ २४ ३९ ३७
एकूण (६ महिने) ३१८ ३०६ २०८ २०३
वार्षिक तुलना
वर्ष विनयभंग घटना बलात्कार घटना
२०२३ ६२५ ३९०
२०२४ (पहिले सहा महिने) २९७ १७०
२०२५ (पहिले सहा महिने) ३१८ २०८
आकडे काय सांगतात?
* २०२५ मध्ये विनयभंग आणि बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ दिसते.
* सहा महिन्यांत ५२६ गुन्ह्यांची नोंद म्हणजे दररोज जवळपास तीन महिला अत्याचार प्रकरणे.
* बहुतेक प्रकरणांमध्ये पोलिसांनी उकल केली असली, तरी प्रतिबंधात्मक उपायांचा अभाव जाणवतो.
* ठाण्यातील रस्ते, शिक्षणसंस्था आणि सार्वजनिक वाहतूक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेबाबत कडक पावले उचलण्याची गरज आहे.
धीरासोबत हिंमत द्या
गेल्या २० ते २५ वर्षांमध्ये मानसिक स्वास्थ्य घसरले आहेत. त्यांना जो धीर मिळाला पाहिजे तो चांगल्या पद्धतीने मिळायला पाहिजे. जे घडले त्यात तुझी चूक नाही, हे समजावून सांगणे गरजेचे आहे. सध्या पालकांमध्ये हा समजूतदारपणा आला असला तरी याची व्याप्ती खूप कमी आहे. मुळात आहे ती परिस्थिती स्वीकारण्यापेक्षा त्याचा सामना कसा केला पाहिजे याची शिकवण देणेही गरजेचे आहे. मुलींना बेधड, निडर बनवण्याची गरज आहे. असुरक्षिततेच्या भावनेतून बाहेर काढून कुणी चुकीचे वर्तन करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला तेथेच रोखण्याची हिंमत दिली पाहिजे, असा सल्ला मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शैलेश उमाटे यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.