मुंबई

वसई-विरारमध्ये ‘धानीव बाग’ नावाचा मतदार

CD

विरार, ता. २२ (बातमीदार) : गेल्या काही दिवसांपासून बोगस मतदारांच्या दाव्यांमुळे निवडणूक आयोग सातत्याने अडचणीत येत आहे. आता वसई-विरारमध्येही मतदार याद्यांमधील घोळ समोर आला आहे. महापालिकेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या मतदार याद्यांमध्ये अक्षम्य चुका आणि संशयास्पद नोंदी आढळून आल्याने संताप व्यक्त होत आहे. काही मतदारांची नावे कन्नडमध्ये लिहिण्यात आली असून ‘धानीव बाग’ असे मतदाराला नाव दिल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

नालासोपारा पूर्व परिसरात धानीव बाग आहे; मात्र मतदार यादीत चक्क ‘धानीव बाग’ अशा मतदाराच्या नावाची नोंद आढळल्याचा प्रकार मनसेचे माजी नगरसेवक प्रफुल पाटील यांनी उघडकीस आणला आहे. एका व्यक्तीचे नाव आणि आडनाव ‘धानीव बाग’ कसे असू शकते, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. इतकेच नव्हे, तर काही मतदारांची नावे चक्क कन्नड भाषेमध्ये छापण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील निवडणुकीत कन्नड लिपीचा वापर कसा, हे प्रशासनाचे डोळे बंद आहेत की जाणीवपूर्वक बोगस मतदारांची घुसखोरी केली जात आहे? हा प्रकार संतापजनक आहे, असे प्रफुल पाटील यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीच्या वेळीही असाच प्रकार उघडकीस आला होता. त्या वेळी बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. त्यावर पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हे प्रकरण एकाच व्यक्तीने सहा वेळा अर्ज केल्याने झालेली तांत्रिक चूक असल्याचे सांगत सारवासारव केली होती. सुषमा गुप्ता या मतदाराचे नाव सहा ठिकाणी आल्याचे मान्य करत पाच नावे वगळल्याचे स्पष्टीकरण दिले होते; मात्र आता समोर आलेले धानीव बाग आणि कन्नड भाषेतील नावे हे प्रकार पाहता, प्रशासनाची ती ‘शुद्धीकरणाची मोहीम’ केवळ एक फार्स होती का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पारदर्शक काम आवश्यक!
सध्या देशभरात ईव्हीएम आणि मतदार यादीतील घोळाचा काही पक्षांकडून मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. वसई-विरारमधील ही प्रकरणे पाहता, हा प्रकार स्थानिक पातळीवरील निष्काळजी आहे. निवडणूक आयोगाचे काम पारदर्शक असावे, अशी अपेक्षा असताना वसई-विरारमध्ये अंधाधुंदी कारभार सुरू आहे.

‘तांत्रिक चूक’ सुधारावी!
जर या बोगस नोंदी आणि चुका तातडीने सुधारल्या नाहीत, तर हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार ठरेल. प्रशासनाने ही ‘तांत्रिक चूक’ असल्याचे गुळगुळीत उत्तर देणे बंद करून, यामागील सत्य जनतेसमोर मांडावे, अन्यथा जनक्षोभाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रफुल्ल पाटील यांनी सांगितले.

Latest Marathi News Live Update : मतदार यादीच्या विक्रीतून १० लाखाचा महसूल

मी उशिरा झालेलं बाळ... इशा केसकरने सांगितला बालपणीचा कटू अनुभव; 'सहा महिन्याची असल्यापासून मी पाळणाघरात...'

Thar Stunt Viral Video : धावत्या थारच्या टपावर उभं राहून नाचत होती मुलं; समोरुन ट्रक येताच ड्रायव्हरने ब्रेक मारला अन्... थरारक व्हिडिओ

Pune Crime: पिस्तुले तयार करणाऱ्या कारखान्यांवर छापा; पुणे पोलिसांची मध्य प्रदेशातील उमराटी गावात कारवाई!

Pune News : लोकप्रतिनीधींचा दबाव महापालिकेला पडला ३ कोटीला; ठेकेदाराला रक्कम देण्यास स्थायीची मान्यता!

SCROLL FOR NEXT