मिरा-भाईंदरमध्ये मतदानाची टक्केवारी घटण्याची भीती
भाईंदर, ता. १७ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार याद्यांमध्ये प्रचंड त्रुटी असल्याचे समोर आले असून, याचा थेट परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रारूप याद्यांमधील चुकांवर शेकडो हरकती घेऊनही प्रशासनाने त्यामध्ये अपेक्षित सुधारणा न केल्याने राजकीय वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी आयुक्तांची भेट घेऊन सुमारे ३० हजार मतदारांची नावे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेल्याची माहिती दिली. धक्कादायक प्रकार म्हणजे उत्तनमधील १,२०० मतदारांची नावे नऊ किमी अंतरावर असलेल्या भाईंदर पूर्वेच्या जेसल पार्क प्रभागात समाविष्ट झाली आहेत. इतक्या लांबवर मतदार मतदानासाठी जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. २०१७ च्या निवडणुकीत केवळ ४७ टक्के मतदान झाले होते. आता या गोंधळामुळे मतदानाचा आकडा ५० टक्क्यांच्याही खाली जाण्याची दाट भीती व्यक्त होत आहे.
हक्काची मते दुसऱ्या प्रभागात गेल्याने इच्छुक उमेदवार हैराण झाले असून, याचा निकालावर मोठा परिणाम होऊ शकतो. आता याद्या अंतिम झाल्या असल्याने केवळ न्यायालयीन लढा हाच एकमेव पर्याय उरला असल्याचे बोलले जात आहे.