शिवरायांच्या शौर्यकथांनी रंगला मकरोत्सव
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २९ : टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारा मकरोत्सव हा सांस्कृतिक सोहळा यंदा २४ व २५ जानेवारीला टिळकनगर विद्यामंदिर शाळेच्या भव्य पटांगणात उत्साहात पार पडला. सुमारे ८०० ते ९०० रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा दोन दिवसांचा कार्यक्रम अत्यंत दिमाखात पार पडला.
उत्सवाच्या पहिल्या दिवशी शिवचरित्रातील वैभवशाली प्रसंगांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. सुप्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या लेखणीतून हा कार्यक्रम साकारला. मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर आणि डोंबिवलीकर अभिनेता अभिजित श्वेतचंद्र यांनी अभिनयाद्वारे स्वराज्यवीरांच्या कथा जिवंत केल्या. शिवचरित्रातील विविध स्वराज्यवीरांच्या शौर्यकथा प्रभावी सादरीकरणातून उलगडत गेल्या. अभिनयसंपन्न सादरीकरणातून प्रत्येक वीराची कथा एखाद्या चित्रपटापेक्षाही अधिक प्रभावीपणे सादर केली. सुप्रसिद्ध लोककलाकार, संगीतकार व कीर्तनकार अवधूत गांधी यांनी सादर केलेल्या भजन, भारूड व पोवाड्यांनी वातावरण भारावून टाकले. उत्कृष्ट संहिता, अनुभवी कलाकार, नेत्रदीपक प्रकाशयोजना आणि अंगावर रोमांच उभे करणारे पार्श्वसंगीत यांचा सुरेख संगम अनुभवताना उपस्थित रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
मकरोत्सवाचे दुसरे पुष्प २५ जानेवारीला “हसले मनी चांदणे” या पद्मश्री माणिक वर्मा यांच्या अजरामर गीतांच्या कार्यक्रमाने गुंफले गेले. माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सूत्रधार व संयोजक ज्येष्ठ संगीतकार कौशल इनामदार यांनी कार्यक्रमामागील संकल्पना उलगडत माणिक वर्मा यांच्या आठवणी सांगितल्या. सुप्रसिद्ध निवेदिका अस्मिता पांडे यांनी आपल्या ओघवत्या निवेदनातून गीतांचा इतिहास रसिकांसमोर मांडला. माणिक वर्मा यांच्या कन्या राणी वर्मा यांनी आईच्या आठवणींसह अनेक दिग्गज कलाकारांसोबतच्या अनुभवांचे मनमोकळे कथन केले.
वादक कलाकारांची उत्तम साथ
माणिक वर्मा यांच्या निवडक अजरामर गीतांचे सादरीकरण आजच्या आघाडीच्या गायिका संपदा माने, केतकी चैतन्य व मधुरा कुंभार यांनी केले. वादक कलाकारांनीही उत्तम साथ दिली. विशेषतः सुप्रसिद्ध ढोलकीवादक कृष्णा मुसळे यांच्या ढोलकीवादनाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. कार्यक्रमादरम्यान मंडळातर्फे अवघ्या आठ वर्षांच्या डोंबिवलीकर जलतरणपटू ओम भंगाळे याचा विश्वविक्रम प्रस्थापित केल्याबद्दल सन्मान करण्यात आला. मकर संक्रांतीचे औचित्य साधून साकारण्यात आलेले भव्य व आकर्षक नेपथ्य सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक राम जोशी यांनी साकारले होते.
................................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.