वडवलीत पर्यावरणीय नियमांकडे दुर्लक्ष
महामार्गालगत तेलमिश्रित सांडपाणी सोडल्याचा प्रकार; वाहनविक्रेत्याविरोधात कारवाईची मागणी
तलासरी, ता. ३१ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत गृप ग्रामपंचायत वडवली, तलासरी हद्दीत एका नामांकित कंपनीच्या वाहनविक्रेत्याचे दुकान आहे. याच दुकानातून पेट्रोल, डिझेल व तेल मिश्रित सांडपाण्यावर कोणतेही शास्त्रीय नियोजन न करता ते पाणी थेट महामार्गालगत असलेल्या मोकळ्या जागेत सोडत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीतीदेखील स्थानिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
या दुकानात नेहमीच मोठ्या प्रमाणात चार चाकी वाहन दुरुस्ती व देखभालीसाठी येतात. या वेळी वाहनांच्या धुलाईनंतर निर्माण होणाऱ्या दूषित सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी कोणतेही शोषखड्डे, सुसज्ज ड्रेनेज व्यवस्था तसेच पाण्यातून तेल वेगळे करणारी यंत्रणा उभारण्यात आलेली नाही. परिणामी तेल मिश्रित पाणी खेट महामार्गालगत साचत असून, येथील बहुतेक रस्ता हा निसरडा झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावर अपघात होण्याची शक्यताही स्थानिकांनी व्यक्त केली आहे. महत्त्वाचे म्हणजे, या साचलेल्या दूषित पाण्यामुळे परिसरात एक वेगळ्याच प्रकारची दुर्गंधी पसरून डासांची उत्पत्ती होऊ शकते, असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे डेंगी, मलेरिया यासारख्या आजारांचा धोका वाढू शकतो व हे दूषित पाणी जमिनीत मुरल्यास भूजल प्रदूषित होण्याचा धोकाही ही येथील स्थानिक नागरिकांनी वर्तवला आहे. या प्रकारामुळे वडवली व परिसरातील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच ग्रामपंचायत, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तत्काळ दखल घेत संबंधित व्यवस्थापनावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, याप्रकरणी वाहनविक्री दुकानाचे व्यवस्थापक दिपेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, येत्या दोन दिवसांत सांडपाणी बाहेर सोडणे पूर्णपणे थांबवून शोरूमच्या आवाराताच गटारासाठी खड्डा तयार केला जाईल. त्यानंतर त्या खड्ड्यात हे सांडपाणी सोडण्याची योग्य व्यवस्था केली जाईल, असेही पाटील यांनी सांगितले.
----------------------
कोट.
सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. तसेच नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांना नोटीस बजावून कायद्यानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
- वृषाली हरड, वडवली-सवणे, ग्रामविकास अधिकारी
कोट.
या दुकानातून वाहनाच्या धुलाईनंतरचे सांडपाणी थेट उघड्यावर सोडले जाते. यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असून, प्रशासनाने तत्काळ चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी.
मिथुन वाडिया, स्थानिक ग्रामस्थ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.