तुर्भे, ता, ३१ (बातमीदार) : वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) अंतर्गत असलेल्या कांदा-बटाटा-लसूण घाऊक बाजारात सध्या मोठ्या प्रमाणावर परदेशी लसणाची आवक सुरू झाली आहे. आकाराने मोठा, आकर्षक व चमकदार दिसणारा हा लसूण सध्या बाजारात २०० ते २५० रुपये प्रतिकिलो भावाने विकला जात आहे. त्याला हॉटेल व्यावसायिक, तसेच चायनीज खाद्यपदार्थ बनविणाऱ्या व्यावसायिकांकडून मोठी मागणी आहे. मात्र, कागदोपत्री हा लसूण अफगाणिस्तान आणि इराण येथून आयात झाल्याचे दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात हा माल चीनमधून आलेला असल्याचा संशय व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
भारत सरकारने २०१४ पासून चिनी कृषीमालावर, विशेषतः लसणावर बंदी घातली आहे. उच्च प्रमाणात कीटकनाशके वापरणे, तसेच बुरशीजन्य दूषिततेचा धोका असल्याने आरोग्याच्या कारणास्तव चिनी लसूण भारतीय बाजारातून हद्दपार करण्यात आला होता. व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, यापूर्वी चिनी लसूण नेपाळमार्गे भारतात आणला जात होता, मात्र आता आयातदारांनी नवा मार्ग अवलंबला आहे. त्यानुसार चीनमधून लसूण थेट अफगाणिस्तान किंवा इराणमध्ये पाठवला जातो. तेथे उतरवल्यानंतर तोच लसूण अफगाणी लसूण म्हणून आवश्यक कागदपत्रांच्या आधारे जेएनपीए बंदरातून भारतात आयात केला जात आहे. त्यानंतर हा लसूण वाशी एपीएमसी बाजारात मोठ्या प्रमाणावर दाखल होत आहे.
हा लसूण आकाराने मोठा, अतिशय पांढरा व चमकदार असल्याने ग्राहक सहज आकर्षित होत आहेत. अनेक ग्राहक नकळत हा बंदी असलेला चिनी लसूण खरेदी करत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. परिणामी देशी लसूण उत्पादकांचे मोठे नुकसान होत असून, स्थानिक व्यापाऱ्यांनाही आर्थिक फटका बसत आहे.
चौकशीची मागणी
याबाबत कांदा-बटाटा व्यापारी मनोहर तोतलानी यांनी बाजार समितीकडे तक्रार करत, संशयास्पद मार्गाने दाखल होत असलेल्या लसणाच्या आयातीची चौकशी करून संबंधित आयातदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. एपीएमसी प्रशासनाने मात्र आयातीदरम्यान योग्य कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच मालाला प्रवेश दिला जात असल्याचे स्पष्ट केले आहे.
नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न
परदेशी लसणाच्या वाढत्या आवकीमुळे एकीकडे ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, दुसरीकडे देशी लसूण उत्पादकांच्या उत्पन्नावरही गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आयात प्रक्रियेची सखोल चौकशी करावी, अशी जोरदार मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.
वाशीतील कांदा-बटाटा बाजारात अफगाणिस्तानमधून जेएनपीएमार्गे लसूण दाखल होतो. सर्व आवश्यक कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतरच संबंधित लसणाला बाजारात प्रवेश दिला जातो.
- बी. जी. टावरे, उपसचिव, कांदा-बटाटा मार्केट, एपीएमसी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.