डिपॉझिटच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या
अवघ्या दोन तासांत तीन आरोपींना अटक
ठाणे, ता. ३१ : कारच्या डिपॉझिट रकमेवरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर भीषण हत्येत झाल्याची खळबळजनक घटना शिळफाटा परिसरात घडली आहे. अमन शेख या तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करून त्याच्या मित्राचे अपहरण करणाऱ्या तीन आरोपींना शिळ-डायघर पोलिसांनी अवघ्या दोन तासांत फिल्मी स्टाइलने अटक केली.
तक्रारदार महमंद फैसल मतीउल्लाह शेख याने आरोपी सैफ अली खान याच्याकडून वॅगनआर कार भाड्याने घेतली होती. कार परत केल्यानंतर सैफने डिपॉझिटची रक्कम परत न केल्यामुळे दोघांमध्ये वाद होता. २९ जानेवारी रोजी दुपारी ३च्या सुमारास पैसे देण्याच्या बहाण्याने सैफने तक्रारदाराला शिळफाटा येथील रिगल हॉटेलजवळ बोलावले. तक्रारदार फैसल हा त्याचे मित्र अमन शेख, अबुतालीब आणि सत्तिन यांच्यासह तेथे पोहोचला. आरोपी सैफ अली खान हा त्याचे साथीदार शोएब आणि आरिफसह कारमधून आला. वादावादी दरम्यान आरिफने अमन शेखचे हात पाठीमागून पकडले, तर सैफ आणि शोएबने त्याच्या छातीवर चाकूने सपासप वार करून त्याची हत्या केली. मध्यस्थी करणाऱ्या अबुतालीबवरही चाकूने हल्ला करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले. हत्या केल्यानंतर आरोपींनी तक्रारदार फैसलला जबरदस्तीने कारमध्ये टाकून पळवून नेले. त्याच्या खिशातील सात हजार रुपये लुटून ‘आता याचाही काटा काढू’ अशी धमकी देत त्याला मारहाण करण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलसि निरीक्षक श्रीराम पौळ यांनी दोन तपास पथके रवाना केली. गुप्त बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी पाठलाग सुरू केला. देसाई नाका परिसरात आरोपींना घेरून पोलिसांनी सैफ अली खान (२९), शोएब खान (२०) आणि आरिफ खान (२८) या त्रिकुटाला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी अपहृत फैसलची सुखरूप सुटका केली असून, गुन्ह्यात वापरलेली कार आणि शस्त्रे जप्त केली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.