भिवंडीत स्वीकृत नगरसेवकांसाठी मोर्चेबांधणी
वाढलेल्या जागांमुळे इच्छुकांची भाऊगर्दी
भिवंडी, ता. ३१ (वार्ताहर) : राज्य सरकारच्या नवीन नियमानुसार महापालिकांमधील स्वीकृत सदस्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. याच धर्तीवर भिवंडी महानगरपालिकेत आता पाचऐवजी नऊ स्वीकृत सदस्य नियुक्त केले जाणार आहेत. या नव्या बदलामुळे पालिकेच्या राजकारणात इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून, पक्षश्रेष्ठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भिवंडी महापालिकेतील पक्षीय संख्याबळानुसार स्वीकृत सदस्यांच्या जागांचे वाटप पुढीलप्रमाणे असणार आहे. यात काँग्रेसला सर्वाधिक तीन जागा मिळणार आहेत, तर भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला दोन जागा येतील. याव्यतिरिक्त शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), समाजवादी पक्ष आणि कोणार्क विकास आघाडी या चारही पक्षांना प्रत्येकी एक जागा मिळणार आहे. या जागांसाठीची नावे संबंधित पक्षांच्या गटनेत्यांमार्फत पीठासन अधिकाऱ्यांकडे सोपवली जातील.
काँग्रेसमध्ये तीन जागांसाठी मोठी स्पर्धा आहे. आमदार रईस शेख यांच्या समर्थकांचा या निवडीत वरचष्मा राहण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. भाजपचे शहराध्यक्ष रवी सावंत यांनी स्वतः निवडणूक लढवली नसल्याने ते प्रबळ दावेदार मानले जात आहेत. याशिवाय अॅड. हर्षल पाटील आणि अॅड. प्रेषित जयवंत यांचीही नावे चर्चेत आहेत. मात्र, ‘एक व्यक्ती एक पद’ आणि ‘पराभूतांना संधी न देण्याच्या’ भाजपच्या धोरणामुळे कोणाची वर्णी लागते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक मदनबुवा नाईक यांची उमेदवारी कापल्याने त्यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षाकडून त्यांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि समाजवादी पक्षामध्येही अनेक इच्छुक असून, पक्षादेशाबाबत अद्याप साशंकता कायम आहे.
कोणाच्या वाट्याला किती जागा?
पक्ष संभाव्य जागा
काँग्रेस ०३
भाजप ०२
शिवसेना ०१
समाजवादी ०१
राष्ट्रवादी (शप) ०१
कोणार्क आघाडी ०१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.