पनवेल, ता. ३१ (वार्ताहर) : पनवेल शहर आणि उरण पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या २४ तासांत तीन भीषण अपघात झाले आहेत. या अपघातांत एका चालकाचा स्वत:च्या ट्रेलरखाली येऊन मृत्यू तसेच हिट ॲण्ड रन प्रकरणासह स्कुटीवरून पडून एकाचा मृत्यू झाला आहे. अपघातांच्या या घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
उरणमधील धुतुम परिसरात गुरुवारी (ता. २९) मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडलेल्या पहिल्या अपघातात बृजभान यादव हा चालक जेएनपीएकडून पनवेलच्या दिशेने ट्रेलर घेऊन जात होता. या वेळी तो आयओटीएल शेजारील ब्रिजच्या उतारावर असताना त्याने ट्रेलर थांबवला. परंतु त्याने हँडब्रेक न लावता तो खाली उतरून ट्रेलरच्या समोर गेला. उतारावर उभ्या असलेल्या ट्रेलरवर जास्त वजन असल्याने हा ट्रेलर अचानक पुढे गेला. त्यामुळे बृजभान हा ट्रेलरखाली चिरडला गेल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी उरण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी घटना पनवेल शहरात शुक्रवारी (ता. ३०) सकाळी ९.१५ वाजता घडली. एका टॅक्सीने रिक्षाला जोरात धडक दिली. त्यानंतर टॅक्सीने एका पादचाऱ्यालाही चिरडले. या धडकेत त्याचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर टॅक्सीचालकाने जखमीला मदत न करता तसेच पोलिसांना माहिती न देता घटनास्थळावरून पलायन केले. पनवेल शहर पोलिसांनी टॅक्सीचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शुक्रवारी सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास पनवेलमध्ये घडलेल्या तिसऱ्या अपघातात तक्का रोड येथील रहिवासी मंगेश शंकर कांबळे (वय ५२) हे स्कुटीवरून पनवेल रेल्वे स्थानकाच्या दिशेने जात होते. या वेळी ते अचानक स्कुटीवरून पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पनवेल शहर पोलिस ठाण्यात नोंद आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.