सायबर दृष्टी सेलचा डिजिटल साक्षरता प्रवास
ग्रामीण ते शहरी नागरिकांपर्यंत सायबर सुरक्षेचा जागर
कल्याण, ता. १ (वार्ताहर) : तंत्रज्ञानाच्या युगात सायबर गुन्हेगारीचे आव्हान मोठे असताना, बी. के. बिर्ला नाइट कॉलेजच्या ‘सायबर दृष्टी सेल’ने एक अनोखा डिजिटल साक्षरता प्रवास सुरू केला आहे. ग्रामीण भागापासून ते शहरातील गजबजलेल्या ठिकाणांपर्यंत नागरिकांना सायबर सुरक्षिततेचे धडे देत, या विद्यार्थ्यांनी डिजिटल सुरक्षेचा संदेश घराघरात पोहोचवला आहे.
प्रत्यक्ष मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिके या साक्षरता प्रवासाची सुरुवात रुंदे आणि आंबिवली येथील एनएसएस शिबिरातून झाली. विद्यार्थ्यांनी केवळ व्याख्याने न देता शालेय विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रत्यक्ष मोबाईलवर UPI सेटअप, फसव्या लिंक्स कशा ओळखायच्या आणि फोन हरवल्यास काय करावे, याचे लाइव्ह प्रात्यक्षिक दिले. त्यानंतर कल्याणच्या ‘काळा तलाव’ परिसरात नागरिकांशी थेट संवाद साधून क्यूआर कोड स्कॅम आणि पासवर्ड संरक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
सार्वजनिक ठिकाणी जनजागृतीचा धडाका मोहिमेचा विस्तार करत विद्यार्थ्यांनी खडकपाडा येथील डी-मार्ट, वसंत व्हॅली आणि सिंडिकेट परिसरातील राणी लक्ष्मीबाई उद्यानात जागरूकता सत्रे घेतली. बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांना ‘सायबर सेफ्टीच्या सात सवयी’ सांगतानाच, चॅटजीपीटी सारख्या एआय साधनांचा सकारात्मक वापर कसा करावा, याचेही मार्गदर्शन केले. या मोहिमेचे नेतृत्व विद्यार्थी समन्वयक लक्ष्मी सिंह आणि प्रसाद जावळे यांनी केले. त्यांच्या सोबतीला दिव्या नायर, प्राची चौहान, यशराज गायकवाड, मुरतझा सेवक, वेदांग सगभोर यांच्यासह मोठ्या चमूने विशेष योगदान दिले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बिपिनचंद्र वडेकर आणि शिक्षक समन्वयक डॉ. रूपेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वी झाला.
कौतुकास्पद मोहीम
डिजिटल सुरक्षितता ही आजच्या काळाची अनिवार्य गरज आहे. आमच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक जबाबदारी ओळखून सुरू केलेली ही मोहीम कौतुकास्पद आहे, असे प्राचार्य डॉ. बिपिनचंद्र वडेकर यांनी म्हटले. अधिक व्यापक मोहिमेचे नियोजन सायबर दृष्टी सेल थांबणार नसून, भविष्यात उल्हासनगर, वासिंद, आसनगाव, केडीएमसी क्षेत्र, हिवरे बाजार आणि टिटवाळा मंदिर परिसरात हा उपक्रम नेण्याचे नियोजन आहे. नागरिकांना डिजिटल जगात आत्मनिर्भर आणि सजग बनवणारा हा प्रवास खऱ्या अर्थाने एक ‘लोकचळवळ’ ठरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.