लांबच्या भाड्याला प्राधान्य, खोपोलीत स्थानिक प्रवाशांकडे दुर्लक्ष
खालापूर, ता. १ (बातमीदार) : खोपोली शहरात काही रिक्षाचालकांकडून जवळचे भाडे नाकारले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या असून, लांब पल्ल्याच्या भाड्यालाच प्राधान्य दिले जात असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तालुक्यातील सर्वाधिक विकसित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खोपोलीत रेल्वे स्थानक, कारखानदारी, महाविद्यालये, रुग्णालये तसेच गगनगिरी महाराजांचा मठ यांमुळे शहर कायम वर्दळीचे असते.
मागील काही वर्षांत खोपोली शिळफाटा ते खोपोली गावापर्यंत मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले असून, व्यवसाय व उद्योगधंद्यांना चालना मिळाली आहे. शहरात सध्या ९०० पेक्षा अधिक तीन आसनी रिक्षा कार्यरत आहेत. मात्र, काही रिक्षाचालक शहरातील मोगलवाडी, नेहरू गार्डन, विनानगर आदी परिसरात जाण्यासाठी भाडे घेण्यास नकार देत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून होत आहेत. यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
चौकट
लांब पल्ल्याच्या भाड्यासाठी रिक्षाचालकांची स्पर्धा
मुंबईहून इमॅजिका पार्कला जाण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक रेल्वेमार्गे खोपोलीत येतात. लांबचे व फायदेशीर भाडे मिळत असल्याने अशा प्रवाशांसाठी रिक्षाचालकांमध्ये स्पर्धा दिसून येते. परिणामी स्थानिक प्रवाशांकडे दुर्लक्ष होत असून, ही प्रवृत्ती रोखण्यासाठी कठोर कारवाईची गरज व्यक्त होत आहे.
कोट :
“ठराविक रिक्षाचालकच जवळचे भाडे स्वीकारतात. अनेक जण सरळ भाडे नाकारतात किंवा फोनवर बुकिंग असल्याचे सांगून दुर्लक्ष करतात. खोपोली रेल्वे स्थानकावर रिक्षांची शिस्तबद्ध लाइन लावून लोकल भाडे नाकारणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी.”
- आसावरी घोसाळकर, तालुका अध्यक्ष, सुतार पत्रिका
कोट :
“जवळचे भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात थेट पोलिस ठाण्यात तक्रार करता येते. योग्य कारण नसल्यास संबंधितांचा परमिट रद्द होऊ शकतो. यापूर्वीही अशा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.”
- एकनाथ पिंगळे, अध्यक्ष, एकता चालक-मालक रिक्षा संघटना
फोटो- आसावरी घोसाळकर आणि एकनाथ पिंगळे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.