ज्येष्ठांसाठी डिजिटल बस पास
टीएमटीची नवी योजना; प्रक्रिया, खर्च, कालमर्यादा ठरणार डोकेदुखी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेने (टीएमटी) ज्येष्ठ नागरिकांसाठी डिजिटल बस पास योजना जाहीर केली आहे. त्यानुसार पास काढून ज्येष्ठांना बसचा प्रवास अर्ध्या तिकिटात करता येणार आहे. मात्र या योजनेतील अटी-शर्ती पाहता अनेक ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सुविधा प्रक्रिया, खर्च आणि कालमर्यादेमुळे उपयुक्त ठरण्याऐवजी त्रासदायक ठरू शकते, अशी वस्तुस्थिती समोर येत आहे.
टीएमटीच्या जाहिरातीनुसार, डिजिटल बस पास मिळविण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना संबंधित आगारात प्रत्यक्ष जाऊन अर्ज करावा लागणार आहे. अर्जासाठी ओळखपत्राची प्रत, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो तसेच शुल्क भरणे अनिवार्य करण्यात आले आहे. वयोवृद्ध नागरिकांसाठी आगारात प्रत्यक्ष जाणे, रांगेत उभे राहणे आणि कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. या योजनेअंतर्गत डिजिटल कार्डसाठी जीएसटीसह ७७ रुपये शुल्क आकारण्यात येणार असून, पास फक्त एका वर्षासाठी वैध राहणार आहे. त्यामुळे दरवर्षी पुन्हा अर्ज व शुल्क भरण्याची प्रक्रिया करावी लागणार आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांवर आर्थिक तसेच प्रक्रियात्मक ओझे वाढण्याची शक्यता आहे.
जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे अर्ज मंजूर झाल्यानंतर २० दिवसांनी मोबाईलवर डिजिटल पास उपलब्ध होणार आहे. मात्र अनेक ज्येष्ठ नागरिकांकडे स्मार्टफोन नसणे किंवा मोबाईलवर डिजिटल पास वापरण्यात अडचणी येणे, हीही वास्तव स्थिती आहे. याशिवाय डिजिटल पासशिवाय टीएमटी बसमधून सवलतीचा प्रवास करता येणार नसल्याचे जाहिरातीत स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे अर्ज प्रक्रियेदरम्यान किंवा पास मिळेपर्यंत ज्येष्ठ नागरिकांना पूर्ण तिकीट भरावे लागण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. टीएमटीची ही योजना केवळ ठाणे महापालिकेच्या हद्दीतील बससेवेपुरती मर्यादित आहे. त्यामुळे स्थानिक प्रवासापुरती मर्यादा असलेल्या या पासचा वापर किती प्रमाणात होईल, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
अडचणी वाढणार
डिजिटल सुविधा वाढविण्याचा उद्देश स्वागतार्ह असला, तरी वयोवृद्धांच्या गरजा, त्यांची क्षमता आणि प्रत्यक्ष वापरातील अडचणी लक्षात घेऊन अधिक सुलभ व पर्यायी व्यवस्था आवश्यक असल्याचा सूर उमटत आहे. वयाची अट नसली तरी वृद्धापकाळात असलेल्या प्रवाशांना प्रत्यक्ष आगारात खेटा मारण्याची वेळ ओढऊ शकते. दरवर्षी पास नूतनीकरण करावे लागणार असल्याने डोकेदुखी वाढणार आहे. परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये ६५ वयाचा पुरावा दिल्यानंतर अर्धे तिकीट दिले जाते. मात्र टीएमटीने नवीन योजना आणून ज्येष्ठांच्या अडचणीत वाढ केल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.