धारावीत ‘उड्डाण-२०२६’ वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
धारावी, ता. २ (बातमीदार) : धारावीतील महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्ट संचालित राजे शिवाजी विद्यालय, छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय (मराठी, हिंदी, उर्दू माध्यम) तसेच मनोहर जोशी महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या अंगभूत क्षमतेला निखारण्यासाठी ट्रस्टच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन ‘उड्डाण-२०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम शुक्रवार (ता. ३१) रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत पी.एम.जी.पी. कॉलनी, धारावी येथील भव्य प्रांगणात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित कव्वालीसह सावित्रीबाई फुले यांचे कन्या शिक्षणातील योगदान, नारीशक्ती, वृद्धाश्रमांचा वाढता कल, मोबाईलचे वाढते व्यसन अशा विविध सामाजिक व ज्वलंत विषयांवर आधारित रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
या कार्यक्रमाला आयकर अधिकारी रामकृष्ण झा, संदीप पांडे, स्थानिक नगरसेविका आशा काळे, धारावी पोालिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजू बिडकर, डब्ल्यूपीपी स्वयंसेवी संस्थेच्या रमा मॅडम, महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष व माजी आमदार बाबूराव माने हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
२५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वीणा राजेंद्र दोनवलकर यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा या वेळी गौरव करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी संस्थेचे सचिव दिलीप शिंदे, ट्रस्टचे कोषाध्यक्ष प्रमोद माने, मुख्याध्यापिका वीणा दोनवलकर, इंग्रजी माध्यमाच्या प्राचार्या व विश्वस्त स्वाती होलमुखे, प्राथमिक विभागाच्या प्राचार्या श्रद्धा माने, मनोहर जोशी महाविद्यालयाच्या प्राचार्या मृणाल रसाळ, माजी मुख्याध्यापक पोटे सर, सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ वाघमारे, विलास गोरेगावकर, परशुराम इंगोले, सुरेश सावंत, अंकुश कारंडे, अधिक्षक चंद्रकांत म्हात्रे, रिझवान सर तसेच शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष व माजी आमदार बाबूराव माने यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवत कला, शिक्षण व क्रीडा क्षेत्रात वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान केली. उपस्थित कला-प्रेमींनी या जोशपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेत विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.