तृतीयपंथींच्या कलाकृतींना मागणी
काळा घोडा महोत्सवात तीन दिवसांत ९० हजारांच्या वस्तूंची विक्री
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्या घटकांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी मुंबई महापालिका विविध योजना सातत्याने अमलात आणत असते. याच अनुषंगाने मुंबईतील प्रसिद्ध ‘काळा घोडा’ कला महोत्सवात ‘उमंग’ या तृतीयपंथी बचत गटाच्या दालनाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘उमंग’ बचत गटाने हस्तकलेच्या वस्तू तयार केल्या आहेत. अवघ्या तीन दिवसांत या बचत गटाने ९० हजार रुपयांच्या वस्तूंची विक्री केली आहे.
गरजू महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेच्या नियोजन विभागाकडून सातत्याने विविध योजना राबविण्यात येत असतात. याअंतर्गत तृतीयपंथींना सामाजिक प्रतिष्ठा आणि हक्काचा रोजगार मिळवून देण्यासाठी फेब्रुवारी २०२४ मध्ये के पश्चिम विभागात ‘योगी राणी’ आणि त्यांच्या नऊ सहकाऱ्यांनी मिळून ‘उमंग बचत गट’ची स्थापना केली. पालिकेतर्फे या गटाला सुरुवातीला १० हजार रुपयांचे अनुदान आणि आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले. योगी राणी यांच्याकडे असलेली आभूषणे बनविण्याची कला त्यांनी सहकाऱ्यांनाही शिकवली.
उमंग बचत गटाचा प्रवास आता ‘काळा घोडा’सारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या महोत्सवापर्यंत पोहोचला आहे. यंदाच्या उत्सवात नियोजन विभागाच्या संचालक डॉ. प्राची जांभेकर यांच्या पुढाकाराने या उमंग बचत गटाला काळा घोडा उत्सवात प्रदर्शनासाठी दालन उपलब्ध करून देण्यात आले.
आम्हाला आमची कला आणि कौशल्य दाखविण्यासाठी या उत्सवात मोठी संधी मिळाली. तीन दिवसांत ९० हजार रुपयांची विक्री होणे, ही आमच्या उदरनिर्वाहासाठी मोठी बाब आहे. आम्हाला अशी संधी मिळाल्यास आम्ही सन्मानाने जगू शकतो, असे उमंग गटाच्या योगी राणी यांनी सांगितले.
‘उमंग’चे कौतुक
ज्यूट बॅग्स, आकर्षक आभूषणे आणि विविध शोभेच्या वस्तूंनी सजलेल्या या दालनाला ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण महोत्सवात ‘सर्वात कमी दर आणि सर्वोत्तम डिझाइन्स’ असलेले दालन म्हणून उमंग बचत गटाचे कौतुक झाले.
फोटो - 099
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.