मुंबईः प्रसिद्ध गोकुळदास तेजपाल (जीटी) रुग्णालयात दाखल कोरोनाग्रस्त आरोपीने पलायन केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय कुरार येथील कोविड वॉर्डात सुरक्षा रक्षकानेच तेथे दाखल विवाहितेचा विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. या घटनांमुळे कोविड रुग्णालयांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
भायखळा परिसरात राहात असलेला आरोपी छोटू लालमन वर्मा (25) याला काही दिवसांपूर्वी भायखळा पोलिसांनी अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्या अंतर्गत अटक केली होती. तुरूंगात असताना तो कोरोना बाधिताच्या संपर्कात आला. त्यामुळे त्याच्यातही कोरोना संदर्भातील लक्षणे 4 नोव्हेंबरला दिसू लागल्यानंतर अखेर त्याला रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार त्याला उपचारासाठी तातडीने आझाद मैदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जीटी रुग्णालयात दाखल केले. कोरोना असल्यामुळे त्याला तेथील पहिल्या मजल्यावरील कोविड वॉर्डात ठेवण्यात आले होते. तो कोविड वार्ड असल्याने तेथे सुरक्षा रक्षकांना ठेवण्याची परवानगी नव्हती. म्हणून आरोपीवर लक्ष ठेवण्यासाठी दोन शिपायांना रुग्णालयाच्या खाली गस्तीला ठेवले होते. मात्र रुग्णालयाच्या कोविड वार्डाबाहेर सुरक्षा रक्षक नसल्याचे पाहून वर्मा याने गुरूवारी पहाटे रुग्णालयातून पळ काढला.
आरोपी रुग्ण पळाल्याचे कळताच, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार भायखळा पोलिसांसह स्थानिक आझाद मैदान पोलिसांना याची माहिती देण्यात आली. त्यानुसार आझाद मैदान पोलिसांनी याप्रकरणी भादंवि कलम 224, 188, 269 अंतर्गत गुन्हा दाखल केला असल्याचे वरिष्ठ अधिका-याने सांगितले. आरोपी हा कोरोना बाधित असल्यामुळे तो इतरांच्या संपर्कात आल्यास त्यांना देखील कोरोनाची लागण होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यामुळेच पोलिसांची पथक मुंबईत या आरोपीचा शोध घेताहेत.
कुरार येथील खासगी रुग्णालयाच्या कोविड वॉर्डातून सेंटरमध्ये सुरक्षा रक्षकानेच विवाहितेचा विनयभंग केल्यामुळे तेथे महिला असुरक्षित असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. कुरार येथे कोविड महिला रुग्णांसाठी पठाणवाडी जंक्शन परिसरातील नामाकिंत रुग्णालयाच्या पहिल्या माळ्यावर विशेष व्यवस्था करण्यात आली होती. या रुग्णालयात 35 वर्षीय कोविडची लक्षणे आढळलेल्या महिलेला क्वॉरंटाईन करण्यात आले होते. याच रुग्णालयात आरोपी सूरेश कोचेवाड (21) हा सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. रुग्णालयात महिला दाखल झाल्यापासून सुरेशची त्या महिलेवर वाईट नजर होती. गुरूवारी त्याची ड्युटी ही रुग्णालयाच्या पाठच्या गेटवर होती. काही कामानिमित्त सुरेश हा रुग्णालयाच्या पहिल्या माळ्यावर बसणाऱ्या सुपरवायझरकडे गेला होता. त्यावेळी त्याने त्या महिलेला पाहिले.
त्यानंतर तो चहा पिण्याच्या नावाखाली वारंवार महिलेच्या कक्षाच्या बाहेरून चकरा मारत होता. त्यानंतर रात्री 2 वाजता रुग्णालयात नागरिकांचा वावर कमी झाल्यानंतर पुन्हा चहाच्या नावाखाली महिलेच्या क्वॉरंटाईन कक्षाबाहेरून जाताना कुणी नसल्याचे पाहून तो महिलेच्या खोलीत शिरला. त्यावेळी झोपलेल्या महिलेशी त्याने अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महिलेने आरडा ओरडा केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अशी घटना घडली असल्याबाबत विचारले असता एका आयपीएस अधिका-याने या वृत्ताला दुजोरा दिला. याप्रकरणी आरोपीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आला आहे.
-------------------------------------
(संपादनः पूजा विचारे)
women security in covid hospitals is great concern crime against women recorded
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.