Jayant Patil 
पश्चिम महाराष्ट्र

Ajit Pawar NCP : राष्ट्रवादीतील बंडानंतर सांगलीत काय सुरू आहे ? महानाट्यास प्रारंभ करेक्ट कार्यक्रम बाकी..

जिल्ह्याचे राजकारण आजच्या घडीला जयंत पाटील यांच्याभोवतीच फिरते, हे नाकारता येत नाही.

शेखर जोशी, shekhar.vjosh@gmail.com

Ajit Pawar - अजितदादांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचाच ‘कार्यक्रम’ झाला आहे. राज्यभर उलथापालथ सुरु आहे. अशावेळी शरद पवारांच्या नेतृत्वाखालील विखुरलेल्या राष्ट्रवादीला सावरण्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या खांद्यावर आली आहे. ‘मी टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम करतो’ असं जयंतराव नेहमी सांगतात.

आता राष्‍ट्रवादी पुनर्बांधणीचा ‘कार्यक्रम’ राबवण्याचे आव्हान आहे. जिल्ह्यातील त्यांच्या राजकीय भूमिकेत अमुलाग्र बदल होतील, अशीही शक्यता आहे. भाजपच्या साथीने काँग्रेसला खिंडीत गाठणाऱ्या जयंतरावांना आता भाजपला पूर्ण शह देण्यासाठी काँग्रेसला साथ द्यावी लागेल. जयंतरावांच्या मदतीची ‘बेरीज’ सोडून भाजपला इथे नव्याने गणित मांडावे लागेल.

अजितदादांच्या बंडानंतर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे नेते तूर्त तरी शरद पवार यांच्या पाठीशी मजबुतीने उभे आहेत. ही मजबुती किती काळाची, हे लवकरच कळेल. कारण, काही लोक ‘वेट अँड वॉच’ करत आहेत. तूर्त चारही आमदार त्यांच्यासोबत आहेत. मिरजेतून इद्रिस नायकवडींचा गट अजितदादांसोबत गेला आहे. अजून उलथापालथ होऊ शकते. महानाट्याचा हा प्रारंभ आहे, खूप पल्ला बाकी आहे.

जिल्ह्याचे राजकारण आजच्या घडीला जयंत पाटील यांच्याभोवतीच फिरते, हे नाकारता येत नाही. पतंगराव कदम, आर. आर. पाटील, मदन पाटील यांच्या हयातीत आणि पश्‍चातही त्यांनी जिल्ह्यावर वर्चस्व राखण्याचा ‘कार्यक्रम’ आखला होता. त्याला यश आले होते. या घडामोडींत जयंतरावांची इमेज ‘कार्यक्रम करणारा नेता’ अशी झाली.

त्यांनी स्वतःच्या नेतृत्वाचा विस्तार करताना वसंतदादा घराण्याची कोंडी करत लोकसभा आणि विधानसभेला त्यांचा पाडाव होईल, अशी छुपी व्यूहरचना केल्याचे कधीच लपून राहिले नाही. त्यासाठी भाजपला रसद पुरवली, असाही आरोप झाला. एका टप्प्यावर त्यांनी घनिष्ठ सहकारी, माजी आमदार संभाजी पवार यांचाही ‘कार्यक्रम’ केला.

जिल्ह्याच्या या खेळात ते ‘दादा’ ठरले, मात्र आता लढाई राज्याच्या राजकारणातील दादा सोबत जुंपली आहे. तिथे ते अधिक व उघडपणे आक्रमक दिसताहेत. ही आक्रमकता त्यांचा राज्यातील ‘कॅनव्हास’ विस्तारणारी ठरेल की पवारांच्या ‘पॉवर गेम’मध्ये त्यांची कोंडी होईल, हे काळच ठरवेल.

राष्ट्रवादीतील दुफळी नाट्यातील पहिला अंक सुरु आहे. अजून महानाट्य बाकी आहे. जयंतरावांसाठी तूर्त जमेची बाजू अशी की जिल्ह्यातील बहुतांश नेत्यांनी शरद पवार आणि त्यांचे नेतृत्व स्विकारून पुढे जाण्याचे ठरवले आहे. अगदी आबांच्या कुटुंबियांनी जयंतरावांशी सवता-सुभा असताना ‘मोठे पवार’ नेते म्हणून निवडले आहेत.

पूर्वी राष्ट्रवादीत असलेले आणि तेंव्हा अजितदादांचे नेतृत्व मानणारे सध्याचे भाजपमधील नेते मात्र सुखावले आहेत. त्यात विलासराव जगताप, राजेंद्रअण्णा देशमुख, पृथ्वीराज देशमुख आणि खुद्द खासदार संजयकाका पाटील यांचा समावेश आहे. त्यामुळे जयंतरावांनी या लोकांच्या डोक्यावर हात ठेवला नाही तरी त्यांना दादांचा आशीर्वाद मिळणार आहे. भाजप नेत्यांसाठी ती जमेची बाजू असेल.

जयंतरावांनी जिल्ह्यात सातत्याने भाजपला छुपी साथ दिली होती. जिल्ह्यातील भाजपला ‘जयंत जनता पार्टी’, असे नाव पडले होते. राज्यातही त्यांचे भाजप नेत्यांशी सख्या राहिले, मात्र अजितदादांनी भाजपसोबत जाण्याची उघड मांडणी केल्यावर त्यांना त्याला साथ दिली नाही. ईडी धडकली तरी ते त्यावर ठाम राहिले.

यामागे अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास ते तयार नाहीत, हे स्पष्ट आहे. ते थेट भाजपमध्ये जातील, अशाही वावड्या होत्या. त्यालाही त्यांनी छेद दिला. संस्थात्मक बांधणी, मतदार संघातील ताकद, समर्थक आमदारांचा विश्‍वास या पातळीवर जयंतराव उजवे आहेत. अजितदादा त्यांच्या या बलस्थानावर हल्ला करतील का, याकडेही लक्ष असेल.

या स्थितीत जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील छुपा संघर्ष थांबले का, हे पहावे लागेल. विशेषतः वसंतदादांचे नातू विशाल पाटील हे लोकसभा लढवू इच्छितात, त्यांच्या पाठीशी जयंतराव प्रामाणिक ताकद उभी करतील का? विश्‍वजीत कदम यांच्या नेतृत्व विस्तारापुढे आव्हान उभे करण्याच्या खेळी थांबवतील का, असे महत्वाचे प्रश्‍न उपस्थित होत राहतील.

जयंतरावांच्या प्रत्येक खेळीकडे आता ‘मायक्रो लेन्स’मधून पाहिले जाईल. कारण, राज्याच्या राजकारणात वेगळा ‘कार्यक्रम’ होऊ घातलाय, तो जयंतरावांच्या आवडीच्या ‘कार्यक्रमा’पेक्षा भव्य आहे.

भाजपला फायदा-तोटा

अजितदादा भाजपसोबत येण्याचा भाजपला काही ठिकाणी मोठा फायदा होणार आहे. कारण, भाजपमधील अनेक नेते दादांचे थेट नेतृत्व मानणारे आहेत. मिरजेत पालकमंत्री सुरेश खाडे यांना इद्रिस नायकवडी यांची उघड साथ मिळू शकते.

सांगली लोकसभा मतदार संघात मात्र खासदार संजय पाटील यांना जयंतरावांची ‘छुपी’ साथ अपेक्षित होती, त्याबाबत संभ्रमावस्था राहील. काकांना अजितदादांची मात्र साथ मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: गोराईत रडार, दहिसरमध्ये विकास; राज्य सरकारचा मोठा निर्णय, गृहनिर्माण प्रकल्पांना गती

IPL 2026 Auction : गडी पेटला... सर्फराज खानने २२ चेंडूंत चोपल्या ७३ धावा, ३३१.८२ चा स्ट्राईक रेट; सेलिब्रेशन तर भन्नाटच Video Viral

प्रेक्षकांना कसा वाटला 'वचन दिले तू मला' मालिकेचा पहिला भाग? नेटकरी म्हणतात, 'एपिसोड छान होता पण...'

Kolhapur Muncipal : मनपा निवडणूक आचारसंहिता लागू होताच कारवाई; कोल्हापुरात इच्छुकांचे फलक हटवले

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरच्या औरंगाबाद खंडपीठात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी

SCROLL FOR NEXT