Sangli LokSabha Elections 2024 esakal
पश्चिम महाराष्ट्र

लोकसभेचं रणांगण अवघ्या 75 दिवसांवर; भाजपकडून 'रणनीती'ला सुरुवात, काँग्रेसचा सावध पवित्रा, कोण मारणार बाजी?

लोकसभा निवडणूक (Sangli Loksabha Election) मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल.

अजित झळके

सांगली लोकसभा मतदार संघातून भाजपचे खासदार संजय पाटील विरुद्ध काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्यात लढत होईल, असे वरवरचे चित्र दिसते आहे.

सांगली : लोकसभा निवडणूक (Sangli Loksabha Election) मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल. या महासंग्रामास आता उणेपुरे ७५ दिवस बाकी आहेत. सलग दोन महाविजयानंतर भाजपने सांगली लोकसभा मतदार संघात नियोजनबद्ध व नव्याने बांधणी सुरू केली आहे.

सन २०१४ चा धक्कादायक पराभव आणि २०१९ ला जागा सोडण्याची नामुष्की आलेल्या काँग्रेसने पुढची निवडणूक काट्याची होईल, असा प्रयत्न करत शांतपणे जुळणी सुरू केली आहे. निवडणूक तोंडावर आली, तरी चित्र मात्र अस्पष्ट आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी या राज्यातील प्रमुख पक्षांत पडलेल्या उभ्या फुटीनंतर राज्यात होणारी ही पहिली मोठी निवडणूक आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची ताकद सध्या तरी मोठी आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे बळ आमदार अनिल बाबर यांच्यामुळे अधिक आहे. अशा वेळी बेरीज-वजाबाकीची नवी समीकरणे असतील. सांगली लोकसभा मतदार संघात सलग दोनवेळा ऐतिहासिक विजयानंतर प्रचंड आत्मबळ वाढलेली भाजप विरुद्ध नव्याने अवसान आणत लढण्यास सज्ज झालेला काँग्रेस, असा सरळ सामना येथे रंगणार आहे.

राष्ट्रवादीने मंथन बैठकांमध्ये सांगलीवर विचार केलेला नाही, त्या अर्थी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सांगलीसाठी इच्छुक नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. भारत राष्ट्र समितीने काही चेहरे पक्षात घेत बाहूवर बेंडकुळ्या दाखवण्याचा प्रयत्न केला, मात्र तेलंगणा विधानसभेत पराभवानंतर त्यांचे अवसान गळाले आहे. त्यामुळे सरळ लढतीत तिसरा पर्याय असेल का, याबाबत सध्या साशंकता आहे.

दुहेरी लढत होणे काँग्रेससाठी फायद्याचे ठरेल, असे ढोबळ संकेत आहेत. तिरंगी लढत झाली तर भाजपला फायदा होऊ शकतो. त्यामुळे ऐनवेळी ‘एमआयएम’ने पत्ता ओपन केला तर आश्‍चर्य वाटायला नको, अशी परिस्थिती आहे. मतांचे ध्रुवीकरण करून काँग्रेसची ताकद कमी करण्यासाठी हा डाव खेळला जाऊ शकतो, असे आरोप याआधी झाले आहेत.

मुद्दे कोणते?

टेंभू आणि म्हैसाळ सिंचन योजनांच्या विस्तारीकरणाला मान्यता, राष्ट्रीय महामार्गांचे जाळे हे भाजपसाठी प्रमुख स्थानिक मुद्दा असणार आहेत. लटकलेले ड्रायपोर्ट, कवलापूर विमानतळ, औद्योगिक विस्तारीकरणाला बसलेली खीळ आदी मुद्द्यांवर विरोधक रान उठवतील.

काका पॅटर्न

सांगली मतदार संघात भाजपने नियोजनबद्ध मांडणी सुरू केली आहे. खासदार संजय पाटील पक्षातील नेत्यांशी साडेचार वर्षे संघर्ष करतील, मात्र शेवटच्या चार-सहा महिन्यांत सगळे पंक्चर्स काढण्याची कला त्यांना अवगत आहे. आधी आमदार गोपीचंद पडळकरांशी जुळवून घेतले. राज्यातून आदेश आल्यानंतर कडेगाव आणि आटपाडीच्या देशमुखांची फार वळवळ होत नाही, यावर त्यांचा विश्‍वास आहे.

पालकमंत्री खाडे आणि आमदार गाडगीळ हे कट्टर भाजप नेते आहेत, त्यामुळे त्यांची बेरीजच गृहीत धरली जाते. उरला विषय विलासराव जगताप यांचा, जतमध्ये दुसऱ्या फळीत खासदार पाटील यांनी संपर्क वाढवत नवी मांडणी केली आहे. शिवाय, लोकसभेला ताकद दाखवा आणि विधानसभेला दावा करा, असा सरळ संदेश असल्याने विधानसभेचे इच्छुक ‘पहिला पक्ष, मग उमेदवार’ या धोरणाने कामाला लागले आहेत.

विशाल सावध

काँग्रेसची उमेदवारी विशाल पाटील यांनाच मिळेल, असे आमदार डॉ. विश्‍वजित कदम यांनी जाहीर केले आहे. ते जिल्ह्याचे आणि राज्याचे नेते आहेत. त्यामुळे फारशी उलथापालथ झाली नाही तर विशालच लढतील. ते सध्या सावध आहेत. त्यांना आधी वसंतदादा कारखान्याची निवडणूक निर्विघ्न पार पाडायची आहे. कारण, पुढच्या संचालक मंडळाच्या काळातच हा कारखाना ‘दत्त इंडिया’कडून संचालक मंडळाच्या ताब्यात येणार आहे. ते जिल्ह्यात फिरताहेत. संपर्क वाढवला आहे, मात्र संजयकाकांएवढा वेग अजून पकडलेला नाही. राज्यातील बदललेल्या स्थितीत जयंत पाटील यांची ‘प्रामाणिक साथ’ विशाल यांना अपेक्षित आहे. त्यावर बरीच गणिते अवलंबून असतील.

वरवरचे अन् आतले

सांगली लोकसभा मतदार संघातून भाजपचे खासदार संजय पाटील विरुद्ध काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्यात लढत होईल, असे वरवरचे चित्र दिसते आहे. त्यात तिसरे नाव येते, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचे. आतील घडामोडी मात्र नव्या मांडणीचे संकेत देत आहेत. भाजपकडून नव्या नावाची चाचपणी सुरू झाल्याचे चित्र समोर आणले जात आहे. माजी आमदार पृथ्वीराज देशमुख जिल्हाभर फिरताहेत. संजयकाका नको, असा सूर काहीजण आळवत आहेत आणि तेच पुन्हा काकांसमवेत लाडू खात आहेत. काँग्रेसमध्ये विशाल पाटील यांच्याशिवाय अन्य नाव चर्चेत नाही, मात्र डॉ. जितेश कदम यांचे समर्थक ‘भावी खासदार’ असा फलक लावून निराळे संकेत देऊ पाहत आहेत. त्यामुळे वरवरचे अन् आतले रंग वेगवेगळे आहेत.

चंद्रहार पाटील यांचे आव्हान

चंद्रहार पाटील लोकसभा लढू इच्‍छितात. त्यांनी दंड थोपटले आहेत. मात्र त्यांना अद्याप पक्ष ठरवता आलेला नाही. सध्या ते जयंतरावांचे नेतृत्व मानतात. अजितदादा गटानेही त्यांना आमंत्रण दिले आहे. मात्र दोघांकडेही लोकसभेचे तिकीट नाही. त्यामुळे पैलवानांची कोंडी झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT