कोल्हापूर : साहेब पुरात बुडलेला ऊस तेवढा तोडून न्या. आज तोडतो-उद्या तोडतो असे ते म्हणाले; पण आता कारखाना बंद होतोय. तरीही आमच्या उसाला तोड देत नाही. ३० गुंठ्यातील ऊस तोडणीविना रानात दम तोडतोय, अशी विनंती करून-करून दमलेल्या शेतकऱ्यांना शेवटी दीड वर्ष लेकराप्रमाणे सांभाळलेल्या उभ्या उसाला शेतातच पेटवून द्यावे लागले. अर्जुनवाडा (ता. राधानगरी) येथील भारती शिवाजी पाटील व सचिन विश्वास पाटील या चुलती-पुतण्यांवर ही वेळ आली.
ऑगस्टमध्ये जिल्ह्याला पुराचा मोठा फटका बसला. राज्यात सर्वाधिक फटका कोल्हापूरला बसला. यामध्ये शेतीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये पूरबाधित ऊस तोडणीला प्राधान्य द्या, चांगला ऊस ३० टक्के आणि पुरातील ७० टक्के ऊस तोड करावी; पण नदीकाठच्या शेतकऱ्यांचा पुरात बुडालेला ऊस तत्काळ तोडून नेला पाहिजे, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या होत्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर माना डुलवून होकार देणारे साखर कारखान्यांचे प्रतिनिधी व मुख्य कार्यकारी संचालकांनीही आमच्या क्षेत्रातील उसाचे एक कांडे शिल्लक राहणार नाही, असा अविर्भाव दाखवला होता. प्रत्यक्षात मात्र वेगळेच चित्र दिसून आले आहे.
अखेर ३० गुंठे ऊस दिला पेटवून
अर्जुनवाडात विश्वास पाटील, अमर पाटील यांचे एक एकर ऊस शेती आहे. दुधगंगा नदीकाठी असणाऱ्या या उसाला पुरात मोठा फटका बसला. त्यामुळे हा ऊस गाळपाच्या पहिल्या दोन आठवड्यातच तोडणे अपेक्षित होते. एक एकरपैकी दहा गुंठे ऊस बिद्री परिसरात असणाऱ्या एका कारखान्याने तोडला आहे, तर उर्वरित ३० गुंठे ऊस काही दिवसात तोडतो म्हणून सांगितले होते. मात्र, या दोन्ही शेतकऱ्यांनी दोन महिने पाठपुरावा करूनही ऊसतोड मिळाली नाही.
ऊस तोडणीविना रानात दम तोडतोय
आज हा कारखाना बंद होणार असल्याचे समजले. त्यामुळे आपला ऊस शेतातच राहणार, या धास्तीने या शेतकऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांशी चर्चा करून ऊस तोडण्याची विनंती केली; पण त्यांनी त्या शेतकऱ्याला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे नाराज झालेल्या शेतकऱ्यांना स्वत:च्या हाताने शेतात उभा असलेला ऊस काळजावर दगड ठेवून पेटवावा लागला. कारखान्याच्या या कारभाराचा फटका या दोन शेतकऱ्यांना बसला. कारखान्यांकडून त्यांना नुकसानभरपाई मिळाली पाहिजे, अशी मागणी होत आहे.
नैराश्यामुळे ऊस दिला पेटवून
तीन आठवडे ऊस पाण्यात राहिला. बिद्रीतील एका कारखान्याकडे उसाची नोंद आहे. ऊस तोडणीसाठी वारंवार मागणी केली. आज-उद्या सांगत दोन महिन्यांनंतरही ऊस तोडला नाही. आता कारखाना बंद होणार आहे. त्यामुळे आलेल्या नैराश्यामुळे ऊस पेटवून देण्याशिवाय पर्याय राहिला नाही.
- अमर पाटील, (भारती पाटील यांचा मुलगा), अर्जुनवाडा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.