संतांनी जे सांगितले ते समजावून घेऊन आचरणात आणले की जीवन सुखी आणि समाधानी होते; पण यात अडचण असते ती हे समजावून घेण्याची. भाषा जरी मराठी असली तरी ती प्रचलित नसल्याने अर्थ कळत नाहीत. अर्थ कळला तरी या आध्यात्मिक परिभाषेतील मूळ संकल्पनांचे आकलन होत नाही. त्यामुळे संत साहित्य समजावून घेण्यासाठी गुरूंची आवश्यकता भासते. अशा असंख्य अभ्यासकांचे गुरू म्हणजे मुरगूडचे डॉक्टर काका. त्यांच नाव डॉ. श्रीकृष्ण देशमुख असे असले तरी महाराष्ट्र त्यांना ‘डॉक्टर काका’ या नावाने ओळखतो.
आजपर्यंत त्यांनी वेदांत आणि संत साहित्यावरील सुमारे ५२ ग्रंथ लिहिले आहेत. विषय कितीही क्लिष्ट असला तरी सोप्या भाषेत मांडणी केल्याने काकांचे लिखाण सर्वसामान्यांना समजावून घेणे सोपे जाते. एखाद्या मुद्द्याचे विश्लेषण करताना ते संतांची मराठी भाषेतील वचने, अभंग यांची जोड देतात. त्यामुळे त्यांचे लिखाण अधिक प्रभावी आणि अर्थबोध करणारे होते. समर्थ रामदासांचा दासबोध हा ग्रंथराज आहे. अनेकजण दासबोधाचा अभ्यास करतात. अशा अभ्यासकांसाठी काकांनी लिहिलेली ‘दासबोध चिंतनिका’ अत्यंत्य उपयुक्त आहे.
संत साहित्य असो किंवा वेदांत यांतील मूळ संकल्पना समजल्याशिवाय त्याचा अर्थ लक्षात येत नाही. या संकल्पनांचे अर्थ विशद करणारा ‘परमार्थ विज्ञान’ हा आध्यात्मिक शब्दकोष आहे. याचे लिखाण काकांनी केले. ‘बृहदारण्यकवार्तिकाभाष्य’ हा सुरेश्वराचार्य यांनी लिहिलेला ग्रंथ काकांनी मराठीमध्ये अनुवादित केला. त्यामुळे एक सुरेख आध्यात्मिक चिंतन साधकांसाठी उपलब्ध झाले. काकांनी १० उपनिषदांवर ओविबद्ध टीका लिहिली आहे. बाळूमामांचं ओबीबद्ध चरित्रही त्यांनी लिहिले आहे. ‘चांगदेव पासष्ठी’वरही त्यांनी भाष्य केले.
ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा आणि एकनाथी भागवत या वारकरी संप्रदायाच्या प्रस्थानत्रयीवर त्यांचे गुरु श्री शंकर महाराज खंदारकर यांनी लिहिलेले भाष्य काकांनी संकलित करून प्रकाशित केले आहे. संत सोहिरोबानाथ यांच्या निवडक १०० अभंगांवर काकांनी विस्तृत भाष्य केले असून ते ‘अंतरीचा ज्ञानदिवा’ या नावाने प्रकाशितही केले आहे. आद्य कवी मुकुंदराज यांच्या परमामृत या ग्रंथावरील काकांची टीका प्रसिद्ध आहे. केवलानंद सरस्वती यांच्या ‘अद्वैतसिद्धी भावदर्शन’ या दुर्मिळ ग्रंथाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशनही प्रदीर्घ कालखंडानंतर काकांनी केले. सर्वांच्या तोंडी असणाऱ्या गणपती, शंकर इत्यादी देवतांच्या आरत्यांचा भावार्थ त्यांनी पुस्तिकेच्या रूपाने प्रकाशित केला आहे.
संत वाड्मय आणि वेदांत जनसामान्यांपर्यंत पोहोचावा यासाठी काकांनी मुरगूडला ‘शिवगड आध्यात्म चॅरिटेबल ट्रस्ट’ची स्थापना केली. काकांच्या कामाची दखल घेऊन त्यांना वारकरी भूषण, आद्य शंकराचार्य पुरस्कार यांच्यासह अनेक राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार मिळाले आहेत. उज्जैन येथे झालेल्या संत साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. परदेशातही त्यांची प्रवचने झाली आहेत. त्यांची १० हजार ध्वनीमुद्रीत प्रवचने आहेत. वेदांत आणि संत साहित्यातील अगाध ज्ञान सोप्या भाषेत सामान्य माणसांपर्यंत पोहचवणारे डॉ. श्रीकृष्ण देशमुख काका म्हणजे सामान्य माणूस आणि वेदांत यांना जोडणारा ज्ञानसेतू आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.