कोल्हापूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरगुती कार्यक्रम परवानगी घेऊन करण्यास मुभा होती. मात्र, आता घरगुती कार्यक्रमही सार्वजनिक स्वरूपात करण्याचा निर्बंध जारी करण्यात आला आहे. ‘घरगुती कार्यक्रम परवानगी घेऊन’ ही तरतूदही त्यामुळे रद्द झाली आहे. घरगुती कार्यक्रमास परवानगी देण्याची जबाबदारी असलेले अग्निशमन अधिकारी रणजित चिले यांनी परवानगीसाठीचे अर्ज स्वीकारणेच बंद केले आहे.
मंडप, जेवणावळी सक्तीने बंद
महानगरपालिका क्षेत्रातील मंगल कार्यालये, लॉन व मॉलची सोमवारी (ता. १६) अग्निशमन विभागाच्यावतीने तपासणी केली आहे. मंगल कार्यालय, लॉन व सांस्कृतिक हॉलच्या व्यवस्थापकास मंगळवारी (ता. ३१)पर्यंत कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन न करण्याची सूचना केली. यावेळी धैर्यप्रसाद मंगल कार्यालय, महासैनिक दरबार हॉल, राजगौरव मंगल कार्यालय, महालक्ष्मी मंगल कार्यालय, मुस्कान लॉन, रामकृष्ण मंगल कार्यालय, स्टार बझार, डी मार्ट, अक्षता मंगल कार्यालय, रिलायन्स मॉल इत्यादी ठिकाणी तपासणी करण्यात आली. सदर मोहीम मुख्य अग्निशमन अधिकारी रणजीत चिले यांचे मार्गदर्शनाखाली उपमुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे व स्थानक अधिकारी मनिष रणभिसे यांनी पार पाडली. रविवारी रात्री एका अपार्टमेंटच्या आवारात अपार्टमेंटमधील रहिवाशांनी स्टेज घालून एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ही माहिती अग्निशमन दलाला कोणीतरी कळवली. या दलाने पोलिसांना त्याची माहिती दिली. त्यामुळे पोलिसांनी तेथे जाऊन कार्यक्रम न करण्याच्या सूचना दिल्या व स्टेजही काढायला लावले. अर्थात या निर्बंधामुळे घरातल्या घरात कार्यक्रम करण्यावर गदा आणली जाणार नाही.
घरातले लोक घरातल्या घरात कार्यक्रम करू शकतात. पण, मंडप, जेवणावळी, लोकांना जेवणासाठी आमंत्रण हे प्रकार सक्तीने बंदच ठेवावे लागणार आहेत. यानिमित्ताने ठिकठिकाणचे लोक एकत्र येऊन संसर्ग होऊ नये, ही त्यामागची भूमिका आहे. सार्वजनिक समारंभ जरूर बंद झाले आहेत. पण, परवानगी घेऊन घरगुती, धार्मिक कार्यक्रमांना थोडी मुभा होती. त्याचा गैरफायदा घेत काहींनी कोरोनाची गांभीर्यताच कमी केली. घरगुती, धार्मिक कार्यक्रम असे म्हणत कालपर्यंत काही जणांनी जेवणावळीसह आपले कार्यक्रम केले. आता परवानगी घेऊन घरगुती कार्यक्रम ही तरतूदच रद्द केली गेली आहे. त्यामुळे घरगुती समारंभ खरोखरच घरातल्या घरात व फक्त घरातल्या लोकांसमवेतच करता येणार आहेत.
कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती आहे. संसर्गातून कोरोना पसरत जातो, हे वास्तव आहे. त्यामुळे सार्वजनिक समारंभ रद्द केले गेले आहेत. घरगुती कार्यक्रम देखील पै-पाहुणे, स्नेही यांनी बोलावून आता करता येणार नाहीत. त्यासाठी परवानगी दिली जाणार नाही, असे नव्हे तर कोणाला परवानगीच मागता येणार नाही. जर कोठे सार्वजनिक कार्यक्रम, जेवणावळी चालू असतील तर लोकांनी तत्काळ कळवावे.
- रणजित चिले, अग्निशमन दल अधिकारी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.