इस्लामपूर (सांगली) : शहरातील नव्याने चव्हाट्यावर आलेल्या भाजी मंडईच्या वादाने साध्य काय याच्या खोलात गेल्यावर जे हाती लागेल ते जुजबी असेच आहे. त्याला फार महत्त्व वगैरे न देता सध्याची नेमकी गरज काय? याचा विचार होऊन प्रश्न समन्वयाने मिटावा अशीच लोकांची अपेक्षा आहे.
शंभर वर्षांपूर्वीचा वारसा सांगून मंडई आहे तशी आणि तिथेच राहण्याने प्रगतीत अडथळा निर्माण होणार असेल तर त्याचा विचार होणे आवश्यक आहे. अर्थात मंडई आहे त्या जागेवरून पूर्णतः हलवावी अशीच भूमिका असायला हवी असेही नाही. सध्याचे गणेश मंडईचे स्वरूप पाहता ती त्रासदायक नक्कीच आहे. पण प्रशासन आणि पदाधिकारी मिळून काहीतरी वेगळा विचार करू पाहत असतील तर नागरिकांनीदेखील त्याच्या 'दुसऱ्या' बाजूचा विचार करण्याची गरज आहे.
नव्या मंडईसाठी प्रशासनाने दीड कोटी रुपये खर्च केले आहेत. ती जागा, इमारत, गाळे सध्या वापराविना पडून आहेत. खरे नुकसान कुणाचे? गणेश मंडईच्या स्थलांतराच्या मुद्याला दोन्ही बाजू आहेत. जागा हलणार आहे. व्यापार, व्यवसाय नाही. त्याच्या नावाने राजकारण होत असेल तर त्याचाही विचार होण्याची गरज आहे. नव्या ठिकाणी सर्वच व्यापाऱ्यांची नीटशी व्यवस्था होणार नाही, हे सत्य असले तरी हा बदल स्वीकारण्याची मानसिकता करावीच लागेल. पहिल्या टप्प्यात सर्वच व्यापाऱ्यांना न हलवता टप्पे ठरवावेत. त्यांना पुरेशी जागा, सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. हे सर्वांना विश्वासात घेऊन करावे म्हणजे राजकारण आडवे येत असेल तर थांबेल. कुणाचा अहंकारही दुखावला जाणार नाही आणि प्रश्नही सुटेल.
एकीकडे अतिक्रमणे वाढत आहेत. प्रशासन डोळेझाक करीत असल्याची ओरड करायची. दुसरीकडे भाजी मंडईमुळे होणारे अडथळे विचारात घेऊन महत्वाचा निर्णय घेतला की विरोध करायचा हे थांबले पाहिजे. अतिक्रमण हटवण्यासारखे निर्णय असे सहजासहजी होत नाहीत. त्यामागे मोठी प्रक्रिया असते. मंडई स्थलांतराकडे सकारात्मकतेने पाहून सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. कोरोना संसर्गाच्या काळात शहराच्या विविध भागात नागरिकांना सहजपणे भाजीपाला पुरवता यावा अशी व्यवस्था करणे गरजेचे असताना तसा प्रयोग केला गेला आणि तो यशस्वी झाला.
आताही एखाद्या मध्यवर्ती भागात मंडई न ठेवता ज्या त्या भागात ती सोय उपलब्ध करुन दिल्यास प्रश्न सोडवणे सोपे होऊन जाईल. त्यासाठी प्रशासनच नव्हे तर लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, नागरिकांचाही पुढाकार अपेक्षित आहे. गणेश, छत्रपती शिवाजी मंडईबाबत असेच सकारात्मक निर्णय होणे अपेक्षित आहे.
राजकीय साथ आवश्यक!
शहरात अनेक गंभीर प्रश्न आहेत, ज्यासाठी प्रशासनाने इच्छाशक्ती दाखवावी असे नागरिकांना वाटते. पण कोणताही मोठा मुद्दा हाताळताना अशा बाजूंना तोंड द्यावे लागते. तेव्हा नागरिक, प्रशासनातील समन्वयाला 'राजकीय' साथ मिळणे आवश्यक असते. त्याची नव्याने सुरवात 'भाजी मंडई' च्या विषयापासून व्हायला हरकत नाही !
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.