School Fee Canva
सोलापूर

शिक्षणमंत्र्यांची नुसतीच घोषणा ! मुलांच्या फीमाफीसाठी पालकांचा तंटा

शिक्षणमंत्र्यांची नुसतीच घोषणा ! मुलांच्या फीमाफीसाठी पालकांचा तंटा

तात्या लांडगे

काही इंग्रजी माध्यमांच्या शाळा स्वत:चा नफा पाहत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. ट्यूशन फीशिवाय अन्य कोणतेही शुल्क शाळांनी घेऊ नये, अशी पालकांची मागणी आहे.

सोलापूर : कोरोना महामारीच्या (Covid-19) काळात ऑनलाइन शिक्षणामुळे पालकांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. काही इंग्रजी माध्यमांच्या शाळा (English Medium School) स्वत:चा नफा पाहत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. ट्यूशन फीशिवाय अन्य कोणतेही शुल्क शाळांनी घेऊ नये, अशी पालकांची मागणी आहे. परंतु, शिक्षणाधिकारी (Education Officer) म्हणतात, फीसंदर्भातील निर्णय पालक आणि शाळा यांनीच एकमेकांच्या समन्वयातून घ्यायचा आहे. त्यामुळे आता शाळांच्या विरोधात पालकांनी फी माफीसाठी तंटा सुरू केला आहे. (Anger among parents over non-compliance of education minister's fee waiver order through schools)

सोलापूर शहर-जिल्ह्यात जवळपास साडेतीनशे इंग्रजी माध्यमाच्या खासगी विनाअनुदानित शाळा आहेत. शाळा बंद असल्याने मुलांमध्ये शारीरिक व मानसिक आजार वाढत असल्याचे चित्र आहे. या पार्श्‍वभूमीवर त्यांना ऑनलाइन शिक्षणाची गोडी लागावी म्हणून पालकांनी (इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील मुले) त्यांच्यासाठी स्मार्टफोन खरेदी केले. मात्र, आता नव्या शैक्षणिक वर्षाची सुरवात झाल्यानंतर लगेचच 15 दिवसांत शाळांनी पालकांकडे फीसाठी तगादा सुरू केला आहे. काही शाळा एकरकमी तर काही शाळांनी दोन टप्प्यात फी भरावी, अशी भूमिका घेतल्याच्या तक्रारी पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे केल्या आहेत. परंतु, दोन वर्षांतून एकदा फीवाढीचा (किमान 10 ते 15 टक्‍क्‍यांपर्यंत) निर्णय खासगी शाळा घेऊ शकतात, असे शासनाचे धोरण आहे. जिल्ह्यातील बहुतेक शाळांनी तीन वर्षांपासून फी वाढ केली नसल्याचा दावा शाळांनी केला आहे. परंतु, शाळा चालविताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी फी वेळेत भरावीच लागेल, अशी भूमिकाही शाळांनी घेतली आहे. शिक्षकांचे मानधन, ऑनलाइन शिक्षणाची यंत्रणा उभारणीसाठी मोठा खर्च असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. तर पालकांनी मुलगा शाळेत येत नसल्याने ट्यूशन फीशिवाय अन्य कोणतीही फी घेऊ नये, शासनाने दिलेल्या 15 टक्‍के सवलतीची अंमलबजावणी करावी, अशा मागण्या केल्या आहेत.

फीसंदर्भात पालकांचे गाऱ्हाणे...

  • 2020-21 आणि 2021-22 या शैक्षणिक वर्षातील 50 टक्‍के फी माफ करावी

  • फी दिली नाही म्हणून एकाही विद्यार्थ्याचे ऑनलाइन शिक्षण बंद करू नये

  • पालकांनी फी न भरल्याने ज्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण बंद केले आहे, त्यांचे शिक्षण सुरू करावे

  • शाळेने मुलांना स्टेशनरी घेऊन जाण्याची सक्‍ती करू नये

  • चालू शैक्षणिक वर्षाची फी भरण्यासाठी किमान तीन ते चार टप्पे करावेत; ट्यूशन फीशिवाय अन्य कोणतीही फी घेऊ नये

...तर शाळांची काढून घेतली जाईल मान्यता

पालकांच्या तक्रारीनंतर खासगी इंग्रजी माध्यमाच्या सर्वच प्रकारच्या शाळांसाठी फीसंदर्भात स्वतंत्रपणे पत्र काढले आहे. त्यानुसार फी भरली नाही म्हणून एकाही विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित ठेवता कामा नये. फी कमी करणे, टप्पे पाडून देणे हा विषय शाळा आणि विद्यार्थ्यांच्या पालकांमधील विषय असल्याने त्यात विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची खबरदारी शाळांनी घ्यावी. वारंवार सांगूनही संबंधित शाळांनी शासनाच्या निर्देशाचे पालन न केल्यास त्यांची मान्यता काढून घेण्याचा प्रस्ताव संचालकांकडे पाठविला जाईल, असा इशारा प्राथमिक शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी "सकाळ'शी बोलताना दिला. तर महापालिकेचे प्रशासनाधिकारी व तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समितीकडे पालकांनी तक्रार नोंदवाव्यात, त्यानुसार खातरजमा करून कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

शहर-जिल्ह्यातील इंग्रजी शाळांची सद्य:स्थिती

  • पूर्व प्राथमिक (एलकेजी-युकेजी) : 346

  • एकूण विद्यार्थी : 10,235

  • पहिली ते आठवीच्या शाळा : 346

  • विद्यार्थी संख्या : 66,149

शालेय शिक्षणमंत्र्यांची नुसतीच घोषणा

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (School Education Minister Varsha Gaikwad) यांनी 15 टक्‍के फी माफीसंदर्भात शाळांना निर्देश दिले. मात्र, ज्या शाळांना शक्‍य आहे, त्यांनी त्यासंदर्भातील निर्णय घ्यावा, असे अधिकार दिले. त्यामुळे बहुतेक शाळांनी त्याची अंमलबजावणीच केली नाही. त्यामुळे आता पालक आक्रमक झाले असून इंग्रजी माध्यमाच्या शाळांची फी कमी करण्याची मागणी होऊ लागली आहे. काही पालकांनी शहरातील काही शाळांसमोर ठिय्यादेखील मांडला होता.

"आरटीई' नियमानुसार कोणत्याही शाळांना कागदपत्रे अथवा फी न भरल्याने शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही. त्यासंदर्भात शाळांना पत्र पाठविले असून त्यानुसार कार्यवाही करणे अपेक्षित आहे. परंतु, पालकांच्या तक्रारीत तथ्य आढळल्यास संबंधित शाळांची मान्यता रद्द केली जाईल.

- संजयकुमार राठोड, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

मागीलवर्षी कोरोनाचे संकट आल्यानंतर पालकांना फीमध्ये सवलत दिली. मात्र, अजूनही जवळपास 70 टक्‍के पालकांनी पूर्ण फी दिलेली नाही. यंदा 15 टक्‍के फी कमी करून मुलांना प्रवेश दिला जात आहे. फीअभावी कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबणार नाही, परंतु पालकांनी मागील वर्षीची व यंदाची फी भरावी.

- संतोष गड्डम, संचालक, व्हॅलेंटाईन सर्कल इंग्लिश मीडियम स्कूल, सोलापूर

इंग्रजी माध्यमाच्या शाळांसमोर अडचणी असतानाही त्यांनी तीन वर्षांत एकदाही फी वाढविलेली नाही. जिल्हाभरातील 130 इंग्रजी माध्यमांशी संलग्नित आमची संस्था काम करत असून संस्थेने ठराव करून फीसंदर्भात पालकांना सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पालकांनीही सहकार्य करावे, जेणेकरून शाळांसमोरील अडचणी कमी होतील.

- हरीश शिंदे, संस्थापक अध्यक्ष, मेस्टा (एफ) संघटना, सोलापूर

कोरोनामुळे पालकांसमोरील अडचणी वाढल्याने मुलांच्या शैक्षणिक फीसाठी टप्पे देण्यात आले आहेत. 2016 पासून एकदाही आमच्या शाळेने फीवाढ केलेली नाही. सध्या सर्वच विद्यार्थ्यांचे ऑनलाइन क्‍लासेस चालू असून फी भरली नाही म्हणून कोणालाही शिक्षणापासून वंचित ठेवले नाही. मात्र, पालकांनी फी भरून सहकार्य केलेच पाहिजे.

- प्रकाश नवले, उपप्राचार्य, सिंहगड पब्लिक स्कूल, केगाव

मागील वर्षापासून मुलगा शाळेत गेलाच नाही. तरीही, शाळांनी इमारत देखभाल-दुरुस्ती, ग्रंथालय फी अशा प्रकारचे शुल्क देण्याची मागणी केली आहे. काही शाळांनी मुलांचे ऑनलाइन शिक्षण थांबविले आहे. कोरोनाच्या संकटामुळे शाळांनी नफा-फायदा न पाहता मुलांचे हित पाहावे. केवळ ट्यूशन फी घ्यावी, त्यातही सवलत द्यावी.

- परिणिता शिंदे, पालक

कोरोनामुळे सध्या शाळा ऑनलाइन सुरू असून मुलांचा अभ्यास घेण्यापासून समस्या सोडवण्यापर्यंतचे काम पालकांनाच करावे लागत आहे. पालकांना मोबाईल बिलाचा अतिरिक्त खर्च होत आहे. सध्या शाळा बंद असल्याने आम्ही संपूर्ण फी भरणार नाही. शाळांनी पालकांना वेठीस धरणे बंद करावे.

- शर्वरी रानडे, पालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुण्यात एकाच वेळी दोघांनी संपवले जीवन, तरुण-तरुणीचे मृतदेह सापडले, घटनेने खळबळ

Latest Marathi News Updates : विजेचा धक्का लागून शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

Mumbai Politics: पलावात आमदारांनी घर घ्यावे, म्हणजे उठलं की जाता येईल, ठाकरे गटाचा शिंदेसेनेच्या आमदारांना टोला

"माझ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध" पंचायत फेम अभिनेत्यावर पत्नीने केलेले गंभीर आरोप

Demat Account: शेअर बाजाराची क्रेझ कमी होत आहे का? डीमॅट अकाउंट बंद करण्याचे प्रमाण वाढले, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT