डेंगी, मलेरिया, चिकुन गुनिया या रोगांबरोबरच "झिका व्हायरस'चा वाहक असलेला एशियन टायगर हा डास शहरातील गणेशनगर येथे नुकताच आढळला.
सोलापूर : डेंगी (Dengue), मलेरिया (Malaria), चिकुन गुनिया (Chikungunya) या रोगांबरोबरच "झिका व्हायरस'चा (Zika virus) वाहक असलेला एशियन टायगर हा डास (Asian Tiger Mosquito) सोलापूर शहरातील पुणे नाका परिसरातील गणेश नगर येथे नुकताच आढळला आहे. सोलापूर शहरात सामान्यपणे आजपर्यंत क्युलेक्स (Culex), एडीस (Aedes) व ऍनॉफेलेस (Anopheles) या जातीचेच डास आढळत होते. मात्र, एशियन टायगर हा अत्यंत धोकादायक व जीवघेणा डेंगीसारख्या रोगांचा प्रसारक असलेला डास शहरात आढळला आहे. यामुळे कोरोनापाठोपाठ (Covid-19) डेंगीच्या साथीची शक्यता असून, आरोग्य यंत्रणेसमोर एशियन टायगरचे आव्हान उभे राहिले आहे. (Dangerous mosquito of Asian tiger species found in the city-ssd73)
पावसाळा सुरू झाला की अनेक आजार सुरू होतात. पावसाचे साठणारे पाणी, अस्वच्छता, चिखल यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. सोलापूर शहरात सांडपाणी वाहून जाण्याच्या सदोष यंत्रणेमुळे शहरभर डबकी साचलेली आहेत. अशातच शुक्रवारी रात्री सोलापूर शहरातील पुणे नाका नवीन पाण्याची टाकी परिसरातील गणेश नगर येथील एका अपार्टमेंटमध्ये एका नागरिकाला एक वेगळाच डास आढळला. त्याने कुतूहल म्हणून या डासाचे फोटो काढले व आपल्या डॉक्टर मित्राला पाठवले. त्यांनी या डासाबद्दल अधिक माहिती घेतली असता, तो एडीस ऍलबिपिक्टस (adis albipictus) अर्थात एशियन टायगर डास या प्रजातीचा असल्याचे आढळले. हा डास सामान्य डासांपेक्षा चार ते पाचपट मोठा असून, डोळ्यांना अगदी सहज दिसतो. त्याच्यावर पांढरे पट्टे असल्यामुळे त्याला एशियन टायगर असे म्हटले जाते. हा डास सामान्यपणे दक्षिण आशियामध्ये आढळतो. तो डेंगी, मलेरिया, चिकुन गुनियासोबतच झिका व्हायरसचा देखील वाहक ठरू शकतो.
शहरात जागोजागी स्मार्ट सिटी अंतर्गत कामे सुरू असून त्या ठिकाणी पाणी साचते. त्याचबरोबर नाले, कचरा डेपो अशा ठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे. सध्या राज्यात ठिकठिकाणी आलेला महापूर आणि संभाव्य अतिवृष्टी यामुळे संभाव्य साथीच्या रोगांना तोंड देण्यासाठी सोलापूर महापालिकेने तातडीने उपाययोजना करायला हव्यात; अन्यथा कोरोनाप्रमाणे नव्या अन्य साथीच्या आजारांना सामोरे जावे लागू शकते.
महापालिका आरोग्य यंत्रणा अनभिज्ञ
सोलापूर शहरात आढळलेल्या या डासाबद्दल महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता, सोलापूर शहरात प्रामुख्याने क्युलेक्स, एडीस आणि ऍनॉफेलेस या प्रजातींचे डास आढळतात असे सांगिण्यात आले. मात्र, सध्या एशियन टायगर प्रजातीचा हा डेंगीसोबत झिका व्हायरस रोगाचा वाहक असलेला डास शहरात वावरतोय याची महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेला कल्पना नाही. तर दुसरीकडे, सध्या शहरात डेंगीचे 92 रुग्ण उपचार घेत आहेत.
महापालिकेचा सर्व्हे पारदर्शक आहे का?
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून पावसाळ्याच्या तोंडावर येणाऱ्या साथीच्या रोगांबद्दल माहिती घेण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण करण्यात आले असून, याबद्दलचा अहवाल आयुक्तांना सादर केला आहे. शहरातील डेंगी, चिकुन गुनिया, मलेरिया या रोगांचे किती रुग्ण आहेत, शहराच्या कोणत्या भागात रुग्ण अधिक आहेत, तसेच साथीच्या रोगांना बळी पडणारा संभाव्य परिसर कोणता याचा सर्व्हे नुकताच झाला आहे. हा सर्व्हे संपूर्ण शहराचा आहे का व तो पारपदर्शक आहे का, असा प्रश्न या आढळलेल्या डासामुळे उपस्थित झाला आहे.
एशियन टायगर डासाची वैशिष्ट्ये
झिका व्हायरस व डेंगीसारख्या प्राणघातक रोगांचा प्रसारक
माणसाच्या शरीरातून प्रथिने मिळेपर्यंत रक्त शोषण करतो, दीर्घ चावा घेतो
हा दिवसाही चावा घेतो त्यामुळे याच्यापुढे मच्छरदाणी निरुपयोगी ठरते
अंगावर काळे-पांढरे पट्टे व सामान्य डासांपेक्षा चार ते पाचपट मोठा आकार
ठळक बाबी
शहरी वसाहतींमध्ये सर्वांत जास्त आढळणारा रोग डेंगी
बेडूक व गप्पीमाशांच्या कमी झालेल्या प्रमाणामुळे वाढला डासांचा प्रादुर्भाव
खिडक्यांना जाळी व दरवाजांना जाळीदार पडदे लावणे हा एक उपाय
पावसाळ्यात पूर्ण शरीर झाकेल असे लांब बाह्यांचे कपडे वापरावेत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.