सोलापूर : तांत्रिक कारण दाखवित आयुक्तांनी 2017-18 मधील भांडवली निधीतून होणाऱ्या सुमारे 15 कोटींच्या कामाला शुक्रवारी स्थगिती दिली. या निर्णयामुळे सर्वपक्षीय आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये सत्ताधारी भाजपसह, शिवसेना, कॅंाग्रेस, राष्ट्रवादी कॅंाग्रेस, वंचित बहुजन आघाडी, एमआयएमचा समावेश आहे.
आधी हे वाचा - नगरसेवकांना आयुक्तांचा झटका...
ज्या कामांचे वर्कअॅार्डर दिलेले नाहीत अशी कामे स्थगित करण्यात येत असल्याचे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे. त्यामुळे नगरसेवकांत संतापाची लाट उसळली आहे. अत्यंत चुकीचा निर्णय असून, त्यामुळे नगरसेवकांना मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. नगरसेवकांनी वेळेत कामे सुचवली, त्यानुसार विभागीय कार्यालयातून पुढील प्रक्रिया होणे अपेक्षित होते. त्यांच्या चुकीचा फटका जनतेला का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या संदर्भात सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्षाच्या गटनेते, प्रतिनिधींनी आपली भूमिका `सकाळ` ला सांगितली.
हेही वाचा - लेटलतिफांची उडणार झोप...
आयुक्तांच्या विरोधात आंदोलन करणार
आयुक्तांच्या निर्णयामुळे शहरातील विकासकामे थांबणार आहेत. अत्यंत चुकीचा निर्णय असून, त्या विरोधात आम्ही तीव्र आंदोलन करू आणि हा निर्णय रद्द करण्यास भाग पाडू.
- श्रीनिवास करली, सभागृह नेता (भाजप)
प्रशासनाची चूक
आयुक्तांच्या निर्णयामुळे आम्हाला मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. अनेक कामे आता सुरु होणार होती, ती आता स्थगित केल्यामुळे आम्हाला मतदारांना उत्तरे द्यावी लागणार आहेत. प्रशासनाच्या चुकीचा फटका नगरसेवकांना कशाला1
- गुरुशांत धुत्तरगावकर, नगरसेवक (शिवसेना)
विकासकामे रखडतील
आम्हाला जनतेने विकासकामे करण्यासाठी निवडून दिले आहे. या निर्णयास आमचा तीव्र विरोध असेल. आयुक्तांनी स्थगिती उठवली नाही तर त्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल. कारण या निर्णयामुळे विकासकामे रखडणार आहेत.
- चेतन नरोटे, गटनेता, कॅंाग्रेस
सकारात्मक मार्ग काढावा, अन्यथा....
नगरसेवकांनी वेळेत कामे सुचवली. त्यानुसार कार्यवाही करणे विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांची जबाबदारी होती. मात्र त्यांनी त्यात चालढकल केली. त्याचा फटका विकासकामांना बसू नये. याबाबत आयुक्तांना सकारात्मक मार्ग काढण्याची विनंती करणार आहे, अन्यथा सर्वपक्षीयांसोबत आमचाही सहभाग असेल.
- रियाज खरादी, गटनेता, एमआयएम
नागरिकांसह आंदोलन
अत्यंत चुकीचा निर्णय. ही स्थगिती उठविण्यासाठी आयुक्तांना पत्र देणार. निर्णयात बदल झाला नाही तर महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर
प्रभागातील नागरिकांसह तीव्र आंदोलन करण्यात येईल.
- आनंद चंदनशिवे, गटनेता, वंचित बहुजन आघाडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.