वाळूज(सोलापूर)ः मनगोळी (ता.मोहोळ) गावाला स्वातंत्र्यापासून रस्ताच नसल्याने अद्याप एकही एसटी गावात पोहोचली नाही. निवडणूकीवर शंभर टक्के बहिष्कार टाकल्यानंतर रस्ता मिळाला नाही. अशा प्रकारचे रस्ता नसलेले हे एकमेव गाव मानले जाते. रस्त्याअभावी शिक्षणासाठी पायपीट,रुग्णांचे हाल व अगदी गावातील मुलामुलींचे लग्न जुळत नाहीत. आजुबाजुची गावांना जोडणारा रस्ता नसल्याने वाहने व एसटी गावात येत नाही. त्यामुळे या गावात मुली देण्यास इतर गावचे लोक तयार होत नाहीत. गावातील मुलांचे विवाह करण्याची अडचण झाली आहे.
गेल्या विधानसभेच्या मतदानावर ग्रामस्थांनी शंभर टक्के बहिष्कार घातला होता. त्यावेळी प्रशासन आणि नेत्यांची दिलेली आश्वासने पोकळ ठरली आहेत.अद्यापही गावाला ना रस्ता झाला नसल्याने एसटी आलेली नाही. निवडणूकीच्या वेळी गटविकास अधिकारी,तहसिलदार यांच्यासह वरीष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच दिवशी गावाला भेटी देऊन रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. निवडणूका होऊन वर्ष होत आले तरी रस्त्याचा प्रश्न काही मार्गी लागलेला नाही.
मनगोळी हे गाव मोहोळ तालुक्याच्या उत्तर टोकावरील मोहोळ, माढा व बार्शी या तीन तालुक्यांच्या सीमेवर आहे. गावची लोकसंख्या 500 असून येथे 241 मतदार आहेत. लोकसंख्या कमी असल्याने भैरववाडी व मनगोळी ही ग्रुप ग्रामपंचायत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झाली तरीही गावाला येण्या-जाण्याकरिता साधा कच्चा रस्ता आणि वाहतुकीची सुविधा नाही. रस्त्याअभावी कोणत्याही वाहतुकीची सोय नाही. येथील नागरिकांना प्राथमिक उपचारांकरिता वाळूजच्या उपकेंद्रात किंवा नरखेड येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात जाता येत नाही.
रुग्ण, गरोदर मातांना दवाखान्यात उपचाराकरिता चालत किंवा दुचाकीवर बसून आदळत आपटत जावे लागते. काहीवेळा महिलांना प्रसुतीसाठी नरखेड किंवा मोहोळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेताना वाटेतच काही महिलांच्या प्रसूती झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच मनगोळीकरांना रेशनदुकानातील धान्य, किराणा बाजार या मूलभूत सुविधांसाठी सुध्दा शेजारील वाळूज व शेजारील बार्शी तालुक्यातील तडवळे या गावाला जावे लागते. पंचायत समितीमधील कामे, महसूल विभागातील उतारे, खरेदी विक्रीसाठी मोहोळ येथे तालुक्याच्या ठिकाणी जाण्याकरिता मनगोळीपासून वाळूजपर्यंत किंवा शेजारील तडवळे(ता.बार्शी) येथे चालत जावे लागते.
त्यामुळे मनगोळी येथील ग्रामस्थ प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराला वैतागले आहेत.
प्रशासनाने आमच्या रस्त्याची दखल घेतली नाही,तर यापुढे सर्वच निवडणूकीच्या मतदानावर शंभर टक्के बहिष्कार घालणार, असे रामभाऊ भाऊ खांडेकर,उमेश वाघ,राहूल शेंबडे,पांडुरंग खांडेकर , शिवाजी येमले,आप्पा गायकवाड, संपदा गायकवाड,परमेश्वर नवले,अशोक खांडेकर ,चंद्रकांत खांडेकर,बाळासाहेब खांडेकर,मनोज सुसले,राहूल खांडेकर,प्रशांत खांडेकर,गणेश खांडेकर,बळी सुसलादे,रमेश खांडेकर,अण्णा खांडेकर यांच्यासह ग्रामस्थांनी सांगीतले.
शिक्षणासाठी चालत जाण्याची वेळ
"विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शेजारच्या वाळूज (ता.मोहोळ), तडवळे(ता.बार्शी), धानोरे किंवा मानेगाव(ता.माढा) येथे चालतच किंवा सायकलवर पायवाटेने ये-जा करावी
लागते.त्यासाठी रस्ताच नाही. त्यामुळे आमची मुले,मुली पुढे शिकतच नाहीत. मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न अवघड झाला आहे.
-अर्चना येमले सरपंच, मनगोळी-भैरववाडी ग्रुपग्रामपंचायत
मुलांची लग्ने जुळत नाहीत
आमच्या मनगोळी गावाला रस्ताच नसल्याने वाहतुकीचा सोय नाही. त्यामुळे मुलां-मुलींची सोयरीक जुळवायला पाहुणे आले,तर गावाला रस्ता नाही. येण्याजाण्यासाठी एसटी नाही म्हणून आमच्या गावात पोरगी द्यायला धजावत नाहीत. त्यामुळे लग्न जुळवायचं अवघड झालं आहे."
- राहूल शेंबडे,ग्रामस्थ मनगोळी ता.मोहोळ
रस्त्याचा प्रस्ताव प्रलंबित
"सदर रस्त्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी प्रलंबित आहे. अजून कोणत्याही योजनेमधून मंजुरी मिळालेली नाही.
- अजिंक्य येळे,गटविकास अधिकारी पंचायत समिती मोहोळ.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.