कुर्डू (सोलापूर) : रेशन दुकानमधून सध्या मोफत देण्यात येणारा तांदूळ कार्डधारकांना विविध कारणे सांगून कमी दिला जात आहे. तर कार्डधारकांबरोबर रेशन दुकानदार भांडण करूनही त्याला मोफत योजनेचा तांदूळ निम्माच दिला जात असल्याचा प्रकार पिंपळखुंटे (ता. माढा) येथे घडला आहे. रेशन दुकानदार अशोक कचरे यांच्याविरुद्ध कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात तक्रारही देण्यात आली आहे. पिंपळनेर (ता. माढा) येथील रेशन दुकानदार धान्यवाटप करत नसल्याने त्याचा परवाना रद्द केल्याचे प्रकरण ताजे असताना शासकीय योजनेचे धान्य अशा आपत्कालीन परिस्थितीतही दिले जात नसल्याने त्यांना कोणाचा वरदहस्त आहे का? असा प्रश्न समोर येत आहे.
मारहाण केल्याची पोलिसांत तक्रार
पिंपळखुंटे येथील अशोक राजेंद्र कचरे यांच्या रेशन दुकानात अक्षय भारत मदने (वय 30) हा मोफत मिळणारे धान्य आणण्यासाठी गेला असता धान्य कमी देण्यावरून दुकानदार कचरे व मदने यांच्यामध्ये झटापट झाल्याने मदने यांनी या दुकानदाराची तक्रार माढा तहसीलदारांकडे केल्याने "तू माझी तक्रार का केली' असे म्हणून मदने यांची गच्ची धरून त्यांना चापटाने मारहाण केल्याची तक्रार पोलिसांत केली आहे.
एक किलो धान्य कपात
"कोरोना' व्हायरसच्या प्रादुर्भावास रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाउन असताना गरिबांनी उपाशी राहू नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून पिवळ्या व केशरी कार्डधारकांना मानसी पाच किलो तांदूळ देण्यात येत आहे. परंतु, तालुक्यातील रेशन दुकानदारांकडून मानसी पाच किलो धान्य दिले जात नाही. कोरोनामुळे हे धान्य मोफत वाटप करायचे आहे. यासाठी मालवाहतूक भाडे, हमाली, कमिशन, शासनाकडून काही मिळत नसल्याचे कारण सांगून मानसी एक किलो धान्य कपात केले जात असल्याचा प्रकार व्होळे (ता. माढा) येथे घडला आहे.
हेही वाचा - लॅाकडाऊन `यांच्या`साठी संकट नव्हे सुवर्णसंधी
दुकानदार ऐकत नाहीत
ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी कुंदन वजाळे यांनी वरिष्ठांकडे चौकशी करून दुकानदाराला सांगितले, परंतु ते दुकानदार ऐकत नसल्याचे सांगण्यात आले आहे. तर, काही ठिकाणी रेशन कार्डमधील एकूण व्यक्तींची नावे असतानाही तुमच्या कार्डमध्ये माणसे कमी आहेत अशी विविध कारणे सांगून काही ठिकाणी रेशन दुकानदारांकडून कमी माल दिला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे शासनाच्या योजना शेवटच्या स्तरापर्यंत पोचत नसल्याचे अशा आपत्कालीन काळातही स्पष्ट दिसून येत आहे.
योग्य ती कारवाई केली जाईल
ज्या गावात जे रेशन दुकानदार प्रधानमंत्री गरीब योजनेतून लाभार्थींना दिले जाणारे धान्य कमी देत असतील, तर त्यांच्याविरोधात पुरवठा शाखेशी संपर्क साधून तक्रार करावी. त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आवाहन केले.
- राजेश चव्हाण,
तहसीलदार, माढा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.