Ujani Dam
Ujani Dam Canva
सोलापूर

"उजनी'ला राष्ट्रीय प्रकल्प दर्जा मिळाल्यास पर्यटनवाढीस चालना

अभय दिवाणजी

जिल्ह्याची वरदायिनी ठरलेल्या उजनी (यशवंत सागर) जलाशयास राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मान्यता मिळाल्यास केंद्र शासनाकडून भरीव निधीची तरतूद करणे सोयीचे होईल.

सोलापूर : जिल्ह्याची वरदायिनी ठरलेल्या उजनी (यशवंत सागर) (Yashwant Sagar) जलाशयास (Ujani Dam) राष्ट्रीय प्रकल्प (National Project) म्हणून मान्यता मिळाल्यास केंद्र शासनाकडून भरीव निधीची तरतूद करणे सोयीचे होईल. जलदगती सिंचन लाभ (एआयबीपी), पंतप्रधान सिंचन योजना, एसआयएमपी अशा केंद्र सरकारच्या (Central Government) सिंचनविषयक विविध योजनांमधून कोट्यवधींचा निधी मिळू शकेल. यातून जिल्ह्याच्या सिंचन क्षमतेत तर वाढ होईलच, त्याचबरोबर राष्ट्रीय प्रकल्पात उजनीचा समावेश झाल्यास पर्यटनाचे आणखी नवे द्वार खुले होऊन पर्यटकांचे आकर्षण वाढल्याने रोजगाराची नवे दालने उघडतील. यासाठी मात्र दोन्ही खासदार आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा आग्रह, संघटित प्रयत्नांची गरज आहे. कृष्णा-भीमा स्थिरीकरण तसेच टाटांच्या धरणातील पाणी भीमा खोऱ्यात आणले गेले तर उजनीतील जलसाठा कायमस्वरूपी स्थिर राहील. उजनीतील जलपर्यटनाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडले आहे, त्यासाठी सर्वांनाच एकत्र यावे लागेल, हे तितकेच खरे आहे. (If Ujani Dam gets the status of a national project, it will boost tourism)

स्वातंत्र्यानंतर हरितक्रांतीतून स्वावलंबनाचे स्वप्न पूर्ण झाले. सह्याद्रीच्या कुशीत असणारा प्रदेश जास्त पावसाचा तर सपाटीवरील भागात पिण्याच्या पाण्याची वानवा. घाटमाथ्यावर पडणाऱ्या जास्तीच्या पावसाचे पाणी टाटा पॉवरमार्गे (Tata Power) (कोकण मार्गाने) समुद्रास मिळते. तर कृष्णा खोऱ्यातील सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे परिसरातील धरणांची क्षमता व नवनिर्मितीची मर्यादा यामुळे पुराचे पाणी कर्नाटक (Karnataka) व आंध्र प्रदेशातून (Andhra Pradesh) पुन्हा समुद्रासच मिळते. सामाजिक न्याय तत्त्वाने इतर राज्यांनासुद्धा पाणी दिलेच पाहिजे. सर्वचे सर्व पाणी अडविणे शक्‍यही नाही. लवादाच्याही मर्यादा ओलांडणे योग्य होणार नाही. कायदा व व्यवहार हा जनहितासाठी राबविण्याचा ध्यास असणारे महाराष्ट्राचे शिल्पकार (कै.) यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांनी हरितक्रांतीचे पहिले पाऊल उचलून महाराष्ट्रास (Maharashtra) वरदान ठरलेल्या बहुउद्देशीय कोयना धरणाची (Koyna Dam) निर्मिती केली. सिंचनाची सोय झाली, वीजनिर्मिती सुरू झाली, घरा-घरांत व शेतीच्या बांधावर विजेचे जाळे पोचविले. यातून मोठी रोजगार निर्मिती झाली. महाराष्ट्राचा समतोल विकास व्हावा, कोणताही प्रादेशिक भेदभाव, आवड-निवड अथवा कमी-अधिक असा दुजाभाव न करता सिंचनाचे अनेक मोठे प्रकल्प त्यांनी मार्गी लावले. यामध्ये सोलापूरकर अतिशय नशीबवान ठरले. 500 मिलिमीटरच्या घरात अशाश्वत पर्जन्यमान म्हणून दुष्काळी भाग अशी ओळख भीमा नदीवरील उजनी प्रकल्पाने बदलून टाकली. (कै.) यशवंतराव चव्हाण यांनी दूरदृष्टीने वास्तववादी योजनांचे स्वप्न पाहून निर्मितीचा घेतलेला ध्यास हेच त्यांचे मोठेपण. त्यामुळेच राज्यात अनेक मोठे प्रकल्प सुरू झाले. काही पूर्ण झाले तर काही अद्यापही प्रगतिपथावरच आहेत.

उजनीबाबत बोलायचे झाल्यास, गेल्या 60 वर्षांत परिस्थितीनुरूप सिंचन धोरणात बदल होऊन बारमाहीऐवजी आठमाही धोरण स्वीकारले. पाणी वापराचे फेरनियोजन झाले. अवर्षण प्रवण तालुक्‍यातील क्षेत्रासाठी उपसा सिंचन योजना आखल्या गेल्या. आशिया खंडातील सिंचनाचा सर्वांत लांब बोगदा अशी भीमा-सीना जोड कालव्याची ओळख निर्माण झाली. यामुळे सीना नदीकाठच्या शंभर किलोमीटर अंतरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. सुशिक्षित पिढी आधुनिक तंत्राचा वापर करीत शेती व्यवसायाकडे वळाली. पाण्याबाबतची जागृती झाली. पाणी वापर वाढत गेला. पाणी उपलब्धतेची मर्यादा पाहता काटकसरीने कार्यक्षम वापरासाठी तुषार सिंचन, ठिबक सिंचन, अतिसूक्ष्म, थेट मुळाशी पाणीपुरवठा यांची उपयुक्तता सिद्ध केली. भीमा-सीना-माण नदीवर उजनी प्रकल्पातील पाण्याद्वारे भरता येणारे सुमारे 50 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, एक मध्यम प्रकल्प तर काही लघु प्रकल्प यासाठी लाभधारकांतून सतत पाणी सोडण्याची मागणी आहेच.

60 वर्षांपूर्वी उजनी प्रकल्पाचा आराखडा केवळ सिंचन प्रकल्प म्हणून केला गेला असला तरी आता बदललेल्या परिस्थितीत व विकासाच्या प्रक्रियेतील त्याचे महत्त्व पाहता "बहुउद्देशीय प्रकल्प' असल्याचे सिद्ध झाले आहे. सिंचनामुळे कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल झाला. यातून उत्पादनात वाढ, आर्थिक उलाढाल, साखर कारखानदारी, दुग्ध व्यवसायातील धवलक्रांती, कुक्कुटपालन अशा शेतीपूरक व्यवसायांनी शेतकऱ्यांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावला. शैक्षणिक क्षेत्राचा विस्तार याबरोबरच जिल्हा व परिसरातील धार्मिक अधिष्ठान असलेली दैवते, मोठ्या प्रमाणात झालेली पर्यटनवृद्धी, औद्योगिक वसाहती, औष्णिक वीज उत्पादन केंद्र अशा एक ना अनेक प्रकल्पांचा व विकास कामांचा आधारवड उजनी धरण बनले. उजनी प्रकल्पाच्या शेवटच्या भागातील कालवे व काही उपसा सिंचन योजना आशाळभूत नजरेने आजही पूर्णत्वाची वाट पाहात आहेत. केंद्र व राज्यस्तरावर या जिल्ह्याचे राजकीय महत्त्व आगळेवेगळे आहे. जिल्ह्याच्या दोन्ही खासदारांपैकी एक धर्माचे अधिष्ठान तर दुसरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजघराण्याशी नाते संबंध असल्याने केंद्रस्तरावर त्यांना आदराचे स्थान आहे.

सर्वपक्षीय संघटित प्रयत्नांची गरज

विदर्भातील गोसीखुर्द प्रकल्पाच्या धर्तीवर उजनी प्रकल्प हा राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करून घेण्यासाठी सर्वच लोकप्रतिनिधींनी संघटितपणाने ताकद पणाला लावली पाहिजे. केंद्रस्तरावर या प्रकल्पाचे महत्त्व पटवून देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन संघटित होणे हाच एकमेव पर्याय जाणवतो. राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मान्यता मिळवण्यासाठी आवश्‍यक त्या तांत्रिक माहितीचे संकलन व अभ्यासपूर्ण मांडणी आवश्‍यक आहे. यासाठी जिल्हास्तरावर कार्यक्षम व संवेदनशील अधिकाऱ्यांची गरज आहे. केंद्रीय सिंचन मंत्र्यांकडे यासाठी पाठपुराव्याची गरज आहे. (कै.) यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीमुळे साकारलेल्या प्रकल्पास आणखी गती देण्यासाठी नेटाने प्रयत्न झाले पाहिजेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Election : शहिदांचा अन् जवानांचा अपमान सोलापूरकर करणार का? फडणवीसांची प्रणिती शिंदेवर जोरदार टीका

Nude Image Generator : अ‍ॅपलने अ‍ॅप स्टोअरवरुन काढून टाकले न्यूड इमेज बनवणारे Apps; इन्स्टावर जाहिराती दिसल्यानंतर कारवाई

Shrikant Shinde: 'पंजा'ला मतदानावरून ठाकरे X शिंदे, 'शिल्लक सेना' उल्लेख करत डागली तोफ

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: 'नागपूर एअरपोर्ट बॉम्बने उडवू'; धमकीचा मेल आल्याने खळबळ

SCROLL FOR NEXT