Nagesh Jadhav has succeeded to the post of Assistant Commandant
Nagesh Jadhav has succeeded to the post of Assistant Commandant 
सोलापूर

लहानपणी आर्मीत जायचं स्वप्न उराशी बाळगलेल्या सामान्य शिपायाच्या मुलाची यशाला गवसणी !

सुस्मिता वडतिले

सोलापूर : आपल्या आजूबाजूला अनेक मोठ-मोठ्या पदांवर यश मिळवलेल्या व्यक्ती असतात. त्यांना पाहून काहींच्या मनात नक्कीच येते, की आपल्यालाही अशी चांगली पोस्ट मिळावी. त्या लोकांना पाहून मनात एक नवा संचार येतो. नवी उमेद मिळते. त्या वेळी अशा लोकांचे यश पाहून अनेकजण हे स्वप्न पाहतात आणि त्याच्या तयारीला लागून हमखास यश मिळवतात. त्यातीलच एक सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्‍यातील भोयरे गावात राहणारा नागेश गौतम जाधव.

त्यालाही लहानपणापासून आर्मीमधील जवान पाहिल्यावर असे वाटायचे, की पुढे जाऊन आपणही आर्मीमध्ये जायचं. त्या वेळेपासून आयुष्यात समाजासाठी आणि देशासाठी आपल्याकडून सेवा घडावी, असे स्वप्न पाहिले; ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्याने जिद्दीने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी तयारीला लागला. इच्छाशक्ती, अपार कष्ट करण्याची तयारी आणि विचारांची दूरदृष्टी असेल तर अशक्‍य असं काहीही नसतं. त्याच प्रतिकूल परिस्थितीवर मात करत नागेशने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली असून, त्याला CAPF असिस्टंट कमांडंट (ग्रुप ए) या पदावर नियुक्ती मिळणार आहे. 

सध्याच्या स्पर्धेच्या काळात अनेक युवक आणि युवती महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेकडे वळत आहेत. त्याच पद्धतीने नागेशने ध्येयपूर्तीसाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. जिद्द, मेहनत, कुटुंबातील आणि मित्रांचे मार्गदर्शन या बळावर त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. आयुष्यात काही तरी करायचं, ही खूणगाठ मनाशी बांधली की सारं काही शक्‍य होऊन जातं, याच निर्धारानं नागेश यशाच्या मार्गाकडे वाटचाल करत राहिला. 

नागेशने 2016 पासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यास सुरवात केली. 2017-18 ला यूपीएससी सीएससी प्रीलियम्सची परीक्षा दिली. 2017-19 ला एमपीएससी प्रीलियम्स आणि मेन्सची परीक्षा दिली. परंतु त्याला सलग तीन वर्षे अपयशच मिळाले. त्यामुळे त्याला मानसिक ताण जाणवू लागला होता. अशा परिस्थितीमध्ये त्याला घरच्यांची खूप साथ मिळाली. त्या वेळी त्याने न डगमगता मनाशी जिद्द बाळगून 2018-19 च्या CAPF(AC) यूपीएससीकडून घेतली जाणारी परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल 5 फेब्रुवारी 2021 ला लागला. यूपीएससीच्या परीक्षेत त्याला भारतातून 203 रॅंक मिळाली आहे. हेच त्याच्या यशस्वितेचे गमक ठरले आहे. अथक परिश्रमाने नागेशने स्वतःचे एक विश्‍व निर्माण केले. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू करून आपण चांगल्याप्रकारे स्वावलंबी होऊ शकतो, हा दांडगा विश्वास नागेशमध्ये दिसून येतोय. 

नागेशचे शालेय शिक्षण मंगळवेढा आणि मोहोळमध्ये झाले असून, महाविद्यालयीन शिक्षण सोलापूरमध्ये घेतले आहे. त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवीचे शिक्षण सांगलीमध्ये पूर्ण केले. इंजिनिअरिंगचे शिक्षण झाल्यानंतर तो कॅम्पस प्लेसमेंटला न जाता 2016 ला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी दिल्लीला राहायला गेला. एकीकडे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून एखादी चांगली पोस्ट काढण्याची जिद्द तर दुसरीकडे घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे आर्थिक भार सांभाळणे त्याला अवघड जायचे. यामुळे त्याने शैक्षणिक कर्ज घेऊन शिक्षण पूर्ण केले. परंतु ते कर्ज फेडणे अजूनही सुरू आहे. त्याला शिक्षण घेताना अनेक अडचणी आल्या; परंतु त्यावेळी त्याला घरच्यांची आणि मित्रांची खूप साथ मिळाली. त्या वेळी नागेशला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. हाच त्याच्या आयुष्याला योग्य वळण देणारा मार्ग ठरला आहे. 

नागेश हा शेतकरी कुटुंबात राहणारा असून त्याच्या घरातील पहिली अशी व्यक्ती आहे, जी पदवीचे शिक्षण घेऊन आज "क्‍लास वन ऑफिसर' बनली आहे. त्यांची तीन एकर कोरडवाहू शेती असून शेतीचे काम त्याचे काका पाहतात. त्याचे वडील मूकबधिर मुलांच्या शाळेत शिपाई म्हणून काम करतात तर आई गृहिणी आहे. त्याला दोन बहिणी असून पहिल्या बहिणीचा विवाह झाला आहे तर दुसरी बहीण पुण्यात एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे.

अपार कष्ट करण्याची तयारी आणि विचारांची दूरदृष्टी असेल तर अशक्‍य असं काहीही नसतं, हे नागेशने सिद्ध करून दाखवलं आहे. शेतकरी कुटुंबातील मुलगा यूपीएससी परीक्षेत यश मिळवल्याबद्दल गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तुमच्या स्वप्नांना मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाचं बळ मिळालं की ते खरे होतात. मग तुमची किंवा तुमच्या कुटुंबीयांची पार्श्वभूमी काय आहे, हे नगण्य ठरतं, हे नागेशच्या यशामधून दिसून येत आहे. 

CAPF असिस्टंट कमांडंट (ग्रुप-ए) नागेश जाधव म्हणाले, आपण पाहिलेलं स्वप्न जेव्हा सत्यात उतरले जाते, तेव्हा कुटुंबाच्या डोळ्यातील आनंदाश्रू हे आपण मिळवलेलं मोठं यश असतं, हे सांगून जातं. समाजाचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. सध्या स्पर्धेचे युग आहे, त्यामुळे वेळेला महत्त्व द्या; कारण जसा जसा वेळ जाईल तसा तुमच्या मनावरील ताण वाढत जाईल. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना संयम खूप महत्त्वाचा असतो. अपयश आल्यावर खचून न जाता अभ्यासात सातत्य ठेवल्यास यशाला नक्कीच गवसणी घालता येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT