Pandharpur Development Plan Gets Green Signal; Massive Infrastructure Upgrade Ahead
sakal
पंढरपूर : बहुचर्चित असलेल्या पंढरपूर कॉरिडॉरला (मंदिर परिसर वाणिज्य विकास आराखडा) आज अंतिम प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या कामासाठी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांची सनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसा शासन अध्यादेश नियोजन विभागाच्या सहसचिव गीतांजली बाविस्कर यांच्या स्वाक्षरीने आज पारित करण्यात आला आहे. आता लवकरच पंढरपूर कॉरिडॉरच्या कामाला सुरुवात होणार आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येतात. येथे येणाऱ्या भाविकांना उत्तम सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने श्री विठ्ठल मंदिर परिसरात कॉरिडॉर तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. कॉरिडॉरच्या प्रस्तावित कामांसाठी राज्य सरकारने सुमारे ३ हजार ९९३ कोटी ९० लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. कॉरिडॉरच्या कामासंदर्भात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यानंतर आज नियोजन विभागाने कॉरिडॉरसंदर्भात अध्यादेश पारित केला आहे.
पंढरपूरमधील कॉरिडॉरचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी जिल्हा समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसेच या संपूर्ण कामाचे नियंत्रण जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहे. पंढरपूर कॉरिडॉर, शहर विकास आणि पुनर्वसन व बाधितांचा मोबदला अशा तीन टप्प्यांमध्ये कामांची विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक टप्प्यासाठी वेगवेगळ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
सरकारने तरतूद केलेल्या निधीनुसार विकास आराखड्यातील सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही या अध्यादेशामध्ये देण्यात आल्या आहेत. आषाढी यात्रेच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पंढरपूर विकास आराखड्याच्या कामाचे भूमिपूजन करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने तयारी सुरू केल्याची माहिती आहे.
वारकऱ्यांसाठी समग्र सोयीसुविधांचा विकास, बाधित व्यावसायिकांना संधी उपलब्ध करून देणे, मंदिर परिसर कॉरिडॉर या कामांसाठी ५७९ कोटी ७० लाख रुपये, नगर प्रदक्षिणामार्गाचा विकास करणे, नदीघाटांचा विकास व सुशोभीकरण, वाहनतळ व व्यापारी संकुल, शहर सुशोभीकरण, शहरास जोडणारे रस्ते व पूल, पालखीतळांचा विकास या कामांसाठी सुमारे १ हजार ३८७ कोटी ९१ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर तिसऱ्या टप्प्यातील भूसंपादन व पुनर्वसन करणे, पुनर्वसनामुळे बाधित इमारतींना मोबदला देण्यासाठी २ हजार २६ कोटी ७२ लाख रुपये, याप्रमाणे पंढरपूर विकास आराखड्यासाठी राज्य शासनाने आर्थिक तरतूद केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.