वडाळा येथील डॉक्टराचे अपहरण करून पाच लाख रुपयांची रक्कम ताब्यात घेऊन लुबाडल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने सात जणांना अटक करून गुन्हा उघडकीस आणला आहे.
सोलापूर : ओंकार क्लिनिक वडाळा (ता. उत्तर सोलापूर) (North Solapur) येथील क्लिनिक चालक डॉ. अनिल कुलकर्णी (Dr. Anil Kulkarni) यांना पाच अज्ञात इसमांनी फिल्मी स्टाईलने अपहरण (Kidnap) केले होते. जवळपास सात तासांच्या चित्तथरारक प्रवासानंतर त्यांची सुटका करण्यात आली होती. सुटका करण्यापूर्वी त्यांच्याकडून जवळपास पाच लाख 88 हजार रुपयांचा ऐवज किडनॅपरांनी काढून घेतला. ही घटना बीबीदारफळ- कोंडी रोडवर मंगळवारी 21 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने सात जणांना अटक करून गुन्हा (Crime) उघडकीस आणला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉ. अनिल व्यंकटेश कुलकर्णी हे मंगळवारी (ता. 21) रात्री वडाळ्यातून सोलापूरला येत असताना त्यांचे वाहन (क्र. एमएच 13 बीएम 9367) अडवून दरोडेखोरांनी त्यांना मारहाण करत अपहरण केले होते. त्यांना मोहोळ, पंढरपूर, भुणी, इंदापूर, बारामती, जेजुरी, सासवड मार्गे वारजे माळवाडी, पुणे येथे नेले. त्यांच्याजवळील एकूण 5 लाख 88 हजार 420 रुपयांची रक्कम काढून घेत त्यांना वारजे मळेवाडी पुणे येथे सोडून दिले. या प्रकरणी डॉ. कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र मांजरे यांचे विशेष पथक तपासासाठी नेमले. तेव्हा पोलिसांनी संशयित विकास सुभाष बनसोडे (वय 21, रा. पानमळा वसाहत, सिंहगड रोड, पुणे), सिद्धार्थ उत्तम सोनवणे (वय 42, रा. पानमळा), रोहित राजू वैराळ (वय 28, वडगाव बु., पुणे), रामचंद्र बालाजी कांबळे (वय 28, साईधाम, ता. हवेली, जि. पुणे), वैभव प्रवीण कांबळे (वय 21), भारत दत्तात्रय गायकवाड (वय 21, रा. वडाळा, ता. सोलापूर), मुराद हनीफ शेख (वय 21, रा. वडाळा, ता. सोलापूर) यांना ताब्यात घेतले.
चौकशीमध्ये संशयिताने त्याच्या मामाचा मुलगा हा मौजे वडाळा ता. उत्तर सोलापूर यांच्या मदतीने अपहरणाचा कट रचल्याचे सांगितले. हे संशयित इनोव्हा गाडीने सोलापूर शहरात येऊन हॉटेल ऍम्बेसिडर येथे थांबले होते. त्यानंतर अपहरण केल्याचे कबूल केले. पोलिसांनी संशयिताकडून रोख 2 लाख 50 हजार रुपये, इनोव्हा कार (क्र. एमएच 42 एन 4554), एक दुचाकी (एमएच 13 डीजे 8587), सात मोबाईल असा एकूण 8 लाख 13 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला. ही कामगिरी जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र मांजरे, पोलिस अंमलदार नारायण गोलकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, अक्षय दळवी, चालक समीर शेख यांनी बजावली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.