दिड्डम्‌... दिड्डम्‌... सत्यम्‌... सत्यम्‌..! मानकऱ्यांच्या साक्षीने अक्षता सोहळा संपन्न
दिड्डम्‌... दिड्डम्‌... सत्यम्‌... सत्यम्‌..! मानकऱ्यांच्या साक्षीने अक्षता सोहळा संपन्न Sakal
सोलापूर

दिड्डम्‌... दिड्डम्‌... सत्यम्‌... सत्यम्‌..! अक्षता सोहळा संपन्न

सकाळ वृत्तसेवा

'हर्र हर्र महादेव, एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र...'च्या जयघोषाने श्री सिद्धेश्‍वर मंदिर परिसर दुमदुमून गेला.

सोलापूर : मुखी श्री सिद्धरामय्या... 'हर्र हर्र महादेव, एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र...'च्या जयघोषाने श्री सिद्धेश्‍वर मंदिर (Siddheshwar Temple, Solapur) परिसर दुमदुमून गेला. 'दिड्डम्‌... दिड्डम्‌... सत्यम्‌... सत्यम्‌...' या संमती वाचनाने तर मानकरी व पोलिस प्रशासनाच्या उपस्थितीत श्री सिद्धरामेश्‍वरांच्या योगदंडाशी कुंभार कन्येचा विवाह सोहळा पार पडला. 150 वर्षांपूर्वी योगदंड मिरवणुकीने यात्रा साजरी करण्यात येत होती. यंदा कोरोनामुळे (Covid-19) या 150 वर्षांपूर्वीच्या परंपरेचा अवलंब करण्यात आल्याचे दिसून आले. (The marriage ceremony of Siddheshwar Maharaj's potter bride was celebrated with enthusiasm)

दरवर्षी सातही नंदीध्वजांची (Nandi Dhwaj) मिरवणूक पंचरंगी ध्वज, हलगी-तुताऱ्यांच्या निनादात, घोड्याचा ऑडी नाच अन्‌ आकर्षक नाशिक ढोलपथक, बैलगाडी, श्री सिद्धरामेश्‍वरांची बग्गी, पालखी अन्‌ भक्तांची बाराबंदी अशा भक्तिमय वातावरणात शाही मिरवणुकीने लाखो भाविकांच्या साक्षीने 'दिड्डम्‌... दिड्डम्‌... सत्यम्‌... सत्यम्‌...'च्या मंगलाष्टकाने अक्षता सोहळा होत असतो. मात्र यंदा कोरोनामुळे मंदिर समिती पदाधिकारी, मानकरी, पुजारी अशा 100 जणांच्या उपस्थितीत धार्मिक विधी झाले. पहिल्या व दुसऱ्या नंदीध्वजांची हिरेहब्बू वाड्यातच सजावट करून सकाळी 9 वाजता विधिवत संक्षिप्त स्वरूपात पूजा करण्यात आली. दत्त चौक, सोन्या मारुती, माणिक चौक, विजापूर वेस, पंचकट्टा या साडेतीन किलोमीटरच्या मार्गावरून संबळच्या निनादात फुलांच्या रथात पालखी तर बग्गीत योगदंडाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये पालखी, योगदंड रथ व 50 मानकऱ्यांसमवेत सहा गाड्यांमध्ये पोलिसांचा ताफा होता. ही मिरवणूक श्री सिद्धेश्‍वर प्रशालेजवळ आली असता प्रशालेपासून ते संमती कट्ट्यापर्यंत पालखी खांद्यावर घेऊन मानकऱ्यांनी संमती कट्टा येथील श्री उमेश्‍वर लिंगास प्रदक्षिणा घातली. त्यानंतर सुगडीपूजनासाठी सज्ज झाले. त्यापाठोपाठ तलाव परिसरात 11.10 वाजता गंगापूजन, संमतीपूजन करून शंखनादाने परंपरेप्रमाणे सुहास शेटे (Suhas Shete) यांनी संमतीवाचनास सुरुवात केली. 11.45 वाजता अक्षतासोहळा संपन्न झाला. सोहळ्यानंतर अमृत लिंगास पंचामृताने अभिषेक करून शेटे यांना हिरेहब्बू (Hirehabbu) यांच्याकडून विडा देण्यात आला. त्यानंतर गर्भ मंदिरातील श्री सिद्धरामेश्‍वरांच्या गदगीची मल्लिकार्जुन शिवाचार्य (Mallikarjun Shivacharya) व हिरेहब्बू यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली.

या अक्षता सोहळ्याप्रसंगी खासदार जयसिद्धेश्‍वर महास्वामी (Jaysiddheshwar Mahaswami), आमदार विजयकुमार देशमुख (Vijaykumar Deshmukh), आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde), देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी (Dharmaraj Kadadi), पोलिस आयुक्त हरीश बैजल (Harish Baijal), छाया बैजल, सुदेश देशमुख, बसवराज शास्त्री, सागर हिरेहब्बू, विकास हिरेहब्बू, संजय हिरेहब्बू, ऍड. मिलिंद थोबडे, सोमनाथ मेंगाणे, मल्लिनाथ मसरे, सुधीर थोबडे, संदेश भोगडे, योगीनाथ कुर्ले, सुरेश म्हमाणे, गंगू कल्याणकर, सोमनाथ सरडे, मल्लिकार्जुन कुंभार आदी मानकऱ्यांसह मंदिर समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

दिवसभरातील धार्मिक उपक्रम

  • हिरेहब्बू वाड्यात सकाळी 9 वाजता खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी व मानकऱ्यांच्या उपस्थितीत नंदीध्वजांची महापूजा

  • पालखी व योगदंड मिरवणुकीला 9.47 वाजता प्रारंभ.

  • पालखी, योगदंड रथासोबत सहा गाड्यांमध्ये पोलिसांचा ताफा 10.10 वाजता दत्त चौकात.

  • 10.20 वाजता मिरवणूक मार्कंडेय मंदिरासमोर.

  • 10.40 वाजता योगदंड व पालखी संमती कट्ट्यावर दाखल.

  • 10.45 वाजता सुगडी पूजनास प्रारंभ.

  • 11.10 वाजता गंगापूजन.

  • 11.25 वाजता संमतीपूजन आणि अक्षता सोहळ्यास प्रारंभ

  • 11.30 वाजता अक्षता सोहळा संपन्न.

सुगडी पूजन

संमत्ती कट्ट्यावर नंदीध्वजांचे आगमन झाल्यानंतर श्री सिद्धरामेश्‍वरांच्या अक्षता सोहळ्यापूर्वी कुंभार कन्येकडून दिलेल्या 11 मातीच्या गाडग्यांमध्ये ज्वारी, बाजरी, ऊस, बोर, पेरू आदी पदार्थ घालून देशमुख व हिरेहब्बू परिवाराच्यावतीने सुगडी पूजन करण्यात आले. त्यानंतर हिरेहब्बूंकडून कुंभार कन्येच्या कुटुंबाला मानाचा विडा देण्यात आला.

गंगापूजन व लिंगपूजन

68 लिंगांपैकी संमती कट्ट्यावर असलेल्या 12 व्या श्री उमेश्‍वर लिंगाची पूजा व कुंभारांनी दिलेल्या मातीच्या घागरीत पाणी भरून गंगापूजन करण्यात आले. शेटे व हिरेहब्बू परिवाराच्या वतीने विधिवत लिंगपूजा व गंगापूजन करण्यात आले.

संमतीपूजन

अक्षता सोहळयाप्रसंगी मंगलाष्टका म्हणून श्री सिद्धरामेश्‍वरांनी रचलेल्या ओवी म्हटल्या जातात, त्यास संमतीवाचन असे म्हणतात. वाचनापूर्वी शेटे परिवाराकडून हे संमती पुस्तक हिरेहब्बू व देशमुख यांच्याकडे पूजनासाठी देण्यात आले. या संमती पुस्तकाला हळदीकुंकू लावून, अक्षता व फुले वाहून तुपाच्या दिव्यांनी मोरआरती करून संमतीपूजन करण्यात आले. त्यानंतर ही पुस्तिका शेटे परिवाराकडे सुपूर्द केल्यानंतर तम्मा शेटे यांनी संमती वाचन केले.

बातमीदार : प्रमिला चोरगी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आसामच्या काही भागांमध्ये पूर

SCROLL FOR NEXT